पिंपरी-चिंचवडकरांना दिवसाआड पाणी हे भाजपचेच पाप - अजित गव्हाणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Gavhane

पिंपरी-चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या क्षेत्रात मुबलक पाऊस असूनही शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठ्याची वेळ येते.

NCP Meeting : पिंपरी-चिंचवडकरांना दिवसाआड पाणी हे भाजपचेच पाप - अजित गव्हाणे

पिंपरी - पिंपरी-चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या क्षेत्रात मुबलक पाऊस असूनही शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठ्याची वेळ येते, यापेक्षा शहरवासीयांचे दुर्दैव ते काय? नागरिकांच्या तोंडचे आणि हक्काचे पाणी पळविण्याचे हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचेच पाप आहे. या पापाला माफी नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी गुरुवारी (ता. २४) मोशी येथे केली.

मोशीतील रामकृष्ण मंगल कार्यालय येथे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाचव्या मासिक सभेत गव्हाणे बोलत होते. याप्रसंगी भाऊसाहेब भोईर, विठ्ठल ऊर्फ नाना काटे, रविकांत वर्पे, प्रशांत शितोळे, कविता आल्हाट, मयूर कलाटे, वसंत बोराटे, राहुल भोसले, शाम लांडे, विनोद नढे, पंकज भालेकर, राजेंद्र जगताप, विक्रांत लांडे, प्रविण भालेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

गव्हाणे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळातील १५ वर्षात पिंपरी-चिंचवडकरांना कोणत्याच संकटांना सामोरे जावे लागले नाही. कारण शहराचे पालक या नात्याने शहराच्या उत्तम नियोजनासाठी अजित पवार यांचे बारीक लक्ष असायचे. मात्र; २०१७ मध्ये भाजपने सत्ता काबीज केली आणि त्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरवासीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.

प्रशस्त रस्ते, मुबलक पाणी, कचऱ्याचे नियोजन, वैद्यकीय सेवा, मनोरंजनासाठी नाट्यगृहे, उद्याने आणि इतर आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी राष्ट्रवादी पक्षाने सातत्याने प्रयत्न करून शहरविकासाचा आलेख सातत्याने उंचावत ठेवला. मात्र; २०१७ मध्ये शहरात सत्तापरिवर्तन झाले आणि शहराचा विकास ठप्प झाला. सत्तांध भाजप नेत्यांवर कोणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे विकासाची दिशा भरकटून पिंपरी चिंचवडमधील सर्वसामान्य जनतेचे हाल सुरू झाले. या हालअपेष्टांचा हिशोब नागरिक मतांच्या रूपाने केल्याशिवाय राहणार नाही, असे गव्हाणे यांनी सांगितले. राष्ट्रवादीने शहराचा केलेला विकास आणि भाजपने केलेले शहर भकास हे चित्र प्रत्येक कार्यकर्त्यांनी घराघरात पोहोचविण्याचे आवाहन गव्हाणे यांनी यावेळी केले.

सदर बैठकीच्या निमित्ताने ८ डिसेंबर रोजी रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणाऱ्या अधिवेशनाविषयी तसेच १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी व बूथ कमिटी सक्षमीकरण तसेच सदस्य नोंदणी अभियानाबाबत विषयवार चर्चा करण्यात आले.

विनायक रणसुभे यांनी प्रास्ताविक केले. वसंत बोराटे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन दीपक साकोरे यांनी केले.