
पोलिस कर्मचाऱ्याचा 'ऑन ड्युटी' हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील पोलिस नाईक दिलीप दत्तात्रय बोरकर यांचे रविवारी (ता. ८) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 'ऑन ड्युटी' असतानाच ही घटना घडली. बोरकर हे सध्या शिरगाव चौकीत कार्यरत होते. रविवारी ते नेहमीप्रमाणे ड्युटीवर आले. त्यांना बीट मार्शलची जबाबदारी दिली होती. हद्दीत गस्त घालत असताना अस्वस्थ वाटू लागल्याने ते चौकीत आले. विश्रांती घेत असतानाच त्यांना पुन्हा त्रास झाला.
तातडीने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ते २००७ मध्ये पुणे पोलिस दलात भरती झाले होते. नुकतीच खात्यांतर्गत झालेली उपनिरीक्षक पदाची परीक्षाही त्यांनी दिली होती. बोरकर हे मूळचे हिंगोली येथील असून सध्या ते वाकड पोलिस लाईन येथे पत्नी व दोन मुलींसह राहत होते. बोरकर यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.