Omicron variant
Omicron variantsakal media

पिंपरी : लॉकडाउन नको, काळजी घेऊ; ओमिक्रॉनबद्दल व्यवसायिकांचा निर्धार

ओमिक्रॉनचे सहा रुग्ण शहरात सापडल्याने किरकोळ व्यावसायिकांपासून उद्योजक अन्‌ व्यावसायिकांमध्ये धास्ती वाढली आहे.

पिंपरी : मागील लॉकडाउनमुळे औद्योगिक नगरीत अजूनही व्यावसायिक उभारीस आलेले नाहीत. बांधकाम आणि हॉटेल व्यवसायामध्येही अद्यापपर्यंत मंदी आहे. त्यातच, ओमिक्रॉनचे सहा रुग्ण शहरात सापडल्याने किरकोळ व्यावसायिकांपासून उद्योजक अन्‌ व्यावसायिकांमध्ये धास्ती वाढली आहे. परिणामी, संसर्गामुळे शहरात कडक निर्बंध आणि लॉकडाउन लागल्यास कामगार वर्ग रस्त्यावर येईल. अन्यथा, उद्योगांना टाळे लावण्याची वेळ येईल, अशी भीती व्यावसायिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे लॉकडाउन नको, आम्ही भरपूर काळजी घेऊ, असे त्यांचे म्हणणे आहे.

औद्योगिकनगरी म्हणून नावारूपास आलेल्या पिंपरी चिंचवड शहरात दहा हजारांवर लघु उद्योग आहेत. चार ते पाच लाख कामगार वर्ग आहे. अर्थचक्र रुळावर आल्यास गणिते सावरतील, या आशेवर व्यावसायिक आहेत. कडक निर्बंध आल्यास पोटापाण्यावरच गदा येईल, अशी भीती किरकोळ व्यावसायिकांमध्ये निर्माण झाली आहे. अद्यापपर्यंत, अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध नाही. किरकोळ व्यावसायिकांची रोजची जगण्याची कसरत सुरु आहे. अनेक आयटीयन्सवर अद्यापही नोकरीची टांगती तलवार आहे. अशा परिस्थितीत पुन्हा ओमिक्रॉन संसर्गाने डोके वर काढल्यास जगणे कठीण होऊन बसण्याची चिंता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. ओमिक्रॉन संसर्गाच्या चर्चेमुळे अनेक उद्योजकांना व्यवसायाची बसलेली घडी विस्कटण्याची भीती आहे. व्यावसायिक वाटचालीच्या चक्रव्यूहात अनेकजण अडकले आहेत. त्यामुळे, रखडलेले बांधकाम प्रकल्प, नव्याने होणाऱ्या घरांच्या विविध स्कीम काही प्रमाणात पुन्हा रेंगाळण्याची भीती बांधकाम व्यावसायिकांमध्ये निर्माण झाली आहे.

महागाईमुळे अाधीच जनता त्रस्त

पेट्रोल-डिझेल महागाईमुळे आधीच नागरिक त्रस्त झाले आहेत. वाहतूक खर्च महागला आहे. घरगुती सिलेंडरपासून सर्वच गणिते कोलमडली आहेत. खासगी तसेच शासकीय वाहतूक भाडेदरात वाढ झाली आहे. त्यामुळे, शहरात आतापासूनच विविध घटकांत लॉकडाउन आणि निर्बंध कडक होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

सरकारने कोविड मार्गदर्शक सूचना अधिक कडक कराव्यात. भविष्यात वाटल्यास सर्वांना कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस द्यावा. मात्र, लॅाकडाउन करु नये. अन्यथा, ॲाक्सिजनवर चालू असलेले उद्योगधंदे बंद होऊन, देश पुन्हा एकदा आर्थिक डबघाईस आल्याशिवाय राहणार नाही.

- जयदेव अक्कलकोटे, अध्यक्ष, चाकण एमआयडीसी उद्योजक संघटना

रिक्षाचालकांचा व्यवसाय पूर्णपणे बंद होता. उपासमारीची वेळ आमच्यावर आली होती. आता संसर्ग वाढल्यास रिक्षा व्यवसाय पूर्णपणे कोलमडेल. फायनान्सच्या त्रासाला आम्ही आधीच वैतागलो आहे. त्यामुळे पुन्हा लाॅकडाऊन करण्यात येऊ नये.

- संतोष उबाळे,

अध्यक्ष, बघतोय रिक्षावाला फोरम महाराष्ट्र राज्य

कोरोना काळानंतर कर्ज काढून व्यावसायिकांनी हॉटेल सुरु केले आहेत. अद्यापही व्यवसाय रुळावर नाही. बऱ्याच जणांची महावितरणची बिले थकली आहेत. इंधन महागले आहे. त्यामुळे, वाहतुकीचा खर्च परवडेनासा झाला आहे. सध्या विविध कामांसाठी लागणारे मजूर उपलब्ध होत नाहीत. मजुरीचे दर वाढले आहेत.

- महेश बारणे,

हॉटेल व्यावसायिक, वाकड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com