esakal | पिंपरी: संस्कृतीला काळिमा फासणाऱ्या नराधमांचा स्वैराचार रोखा
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी: संस्कृतीला काळिमा फासणाऱ्या नराधमांचा स्वैराचार रोखा

पिंपरी: संस्कृतीला काळिमा फासणाऱ्या नराधमांचा स्वैराचार रोखा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी: मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील सामूहिक बलात्कार आणि क्रूर लैंगिक अत्याचाराच्या बातम्यांमुळे शहरातील महिला संतप्त झाल्या आहेत. वानवडी येथील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कारातील आरोपींना पोलिसांनी तातडीने सर्व आरोपींना अटक केली. मुंबईतील साकीनाका येथील ३२ वर्षे महिलेवर बलात्कार करून जे क्रूरकर्म करण्यात आले. त्यामुळे निर्भया घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. शहरातील महिला वर्ग संतप्त झाला आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया.

हेही वाचा: नोव्हेंबरपासून दररोज पाणीपुरवठा, आयुक्तांची माहिती

अपर्णा दराडे(अखिल भारतीय जनवादीमहिला संघटना): ‘‘कायद्याचे राज्य संपुष्टात आले आहे काय? बलात्काराच्या घटना आणि त्यातील क्रौर्य लांछनस्पद आहे. समाजातील सभ्य संस्कृती नष्ट झाली आहे. मन सुन्न करणाऱ्या घटना रोखण्यासाठी किती आंदोलने सतत करायची? अद्दल घडवणाऱ्या शिक्षा वेळेवर का होत नाहीत? शहरात कठोर प्रतिमा असलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली दक्षता टीम सरकारने तयार करावी.’’

अॅड. मनीषा महाजन (आकुर्डी) : आधुनिक जगातील या समाजात अजूनही स्त्रियांना उपभोगाची वस्तू समजले जात आहे. स्वामी विवेकानंद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाची प्रगती मोजायची असेल तर त्या समाजातील स्त्रियांची प्रगती किती झाली याच्यावरून मोजता येईल असे म्हटले आहे. अशा घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आणि एकंदर स्त्रियांच्या प्रगतीला खीळ बसविणारे आहेत. पुरुषभान रुजविणे आणि महिलांना सुद्धा मन आहे, शरीर आहे आणि ते यातना दिल्यास दुखतं याची जाणीव पुरुषांमध्ये येणे खूप गरजेचे आहे.

त्यामुळे खऱ्या अर्थाने पुरुषसत्ताक मनोवृत्ती बदलण्यासाठी प्राथमिक स्तरावर, शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षण सर्वाना दिले पाहिजे. कायद्याने कठोर शिक्षा केल्या तरी स्त्री पुरुष यांच्या लैंगिक संबंधाची निकोप पातळी अद्यापही समाजात रुजलेली नाही आणि या सुन्न करणाऱ्या घटना घडत आहेत. सामाजिक न्याय, सामाजिक सन्मान महिलांच्या वाट्याला येण्यासाठी पुरुषांची वैचारिक पातळी वाढविणे गरजेचे आहे.

लता भिसे(भारतीय महिला फेडरेशन) : ‘‘अलीकडच्या घटनांमध्ये मुलींना, महिलांना मारून टाकायचे प्रकार वाढले आहेत.त्यामुळे जबाब आणि पुरावे मिळत नाहीत. अशा घटनांचे खटले रेंगाळतात.आरोपींना जामीन मिळतात.पुरावे नष्ट करण्यासाठी अवधी मिळतो.ताबडतोबीने निकाल लागले तर कायद्याची भीती निर्माण होईल. पुरुषसत्ताक वृत्तीमुळे मर्दानगीच्या विकृत आणि क्रूर कल्पना वाढत आहेत. पुरुषांनी बायकांचे संरक्षण करण्याचा ट्रेंड होता, तो संपला आहे. भावना चाळवणाऱ्या लैंगिक क्लिप समाजमाध्यमावर सहज उपलब्ध होत आहेत. त्यातील पवित्र नात्याच्या विकृत संबंधाचे चित्रण रोखले पाहिजे.’’

loading image
go to top