पिंपरी-चिंचवडकरांनो, खरी माहिती द्या अन् कोरोनामुक्त व्हा! 

पीतांबर लोहार 
Monday, 12 October 2020

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम राबविण्यात आली. मात्र, काहींनी 'पॉझिटिव्ह येऊ', या भीतीपोटी खरी माहिती देण्याचे टाळले. काहींनी सर्वेक्षण पथक पाहून घराला कुलूप लावले. बंद घर बघून पथक परत गेले. अशा कारणांमुळे जवळपास पाच टक्के नागरिकांचे सर्वेक्षण होऊ शकलेले नाही. आता सर्वेक्षणाचा दहा दिवसांचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. त्याअंतर्गत तपासणीसाठी घरी येणारे कर्मचारी व स्वयंसेवकांना नागरिकांनी खरी माहिती द्यावी, तरच शहर कोरोनामुक्त होईल.

पिंपरी : कोरोना संसर्ग सुरू होऊन सात महिने उलटले आहेत. मात्र, कोरोनाचा उद्रेक कोणामुळे झाला, त्याला कोण जबाबदार, त्यासाठी महापालिका व सरकारने काय केले, नागरिक व लोकप्रतिनिधी काय करीत आहेत, असे प्रश्‍न आजही विचारले जात आहेत. वास्तविक, पुण्यापाठोपाठ शहरात कोरोनाचा प्रवेश झाला. पहिल्या दहा दिवसात अवघे बारा रुग्ण आढळले. नंतरच्या पंधरा दिवसांत एकही रुग्ण आढळला नाही. अन्य शहरांच्या तुलनेने कोरोना नियंत्रणात होता. बारापैकी नऊ रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. अवघे तीन रुग्ण उपचार घेत होते. पुढील आठ दिवसांत शहर कोरोनामुक्त होईल, अशी स्थिती मार्च महिन्याच्या अखेरीस निर्माण झाली होती. परंतु, अन्य शहरातून व देशातून परतलेल्या नागरिकांमध्ये लक्षणे दिसू लागली आणि पुन्हा रुग्ण वाढीला सुरुवात झाली. ती संख्या आता 85 हजारांच्या उंबरठ्यावर पोचली आहे. तिला आटोक्‍यात आणण्यासाठी एक हजार 314 पथकांद्वारे घरोघरी सर्वेक्षण सुरू केले. मात्र, काहींनी पथकाला माहिती दिली नाही. काहींनी चुकीची माहिती दिली. तपासणीदरम्यान स्वतःच्या नावासह पत्ता व संपर्क क्रमांक चुकीचे दिले. यावरून अनेक जण कोरोनाला आजही गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे. 

मार्गदर्शक तत्त्वे पाळा 
कोरोनाचा उद्रेक झाला, तेव्हापासून सरकारने साथरोग प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. त्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझर वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, गर्दी करू नये, दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फुटांचे अंतर ठेवावे, असे मार्गदर्शक तत्त्वे सांगितले आहेत. अधिकारी व स्वयंसेवकांकडून वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. अशांवर पोलिसांकडूनही दंडात्मक कारवाई सुरू आहे. तरीही मास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. आपबिती होऊनही अनेक जण बिनधास्तपणे वागत आहेत. आता सर्व "अनलॉक' झालंय म्हणत बेफिकिरीने वागत आहेत आणि संसर्ग झाला किंवा गंभीर परिस्थिती उद्‌भवल्यास यंत्रणेला दोषी धरले जात आहे. 

यंत्रणा सज्ज आहेच 
महापालिकेने स्वतःच्या आठ रुग्णालयांसह 16 ठिकाणी कोविड केअर सेंटर, तीन जम्बो रुग्णालये उभारली आहेत. ऑक्‍सिजनसह व्हेंटिलेटर बेडची सुविधा पुरेशी आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून रुग्णसंख्या कमी होत आहे. तूर्त आवश्‍यकता नसलेले कोविड सेंटर टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आगामी सण, उत्सव, अनलॉक स्थिती आणि बदलते हवामान यामुळे संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. परंतु, ही वेळ शहरावर व प्रशासनावर येऊच नये, पुन्हा रुग्ण वाढू नयेत, यासाठी नागरिकांनीच काळजी घ्यायला हवी. तर आणि तरच कोरोनामुक्तीच्या दिशेने आपले पाऊल पडू शकेल अन्यथा कोरोनाविरुद्धची लढाई सुरू राहणारच आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pitambar lohar writes about corona situation in pimpri chinchwad