esakal | उत्सव दिव्यांचा : झांबरी कार्टी नव्हे 'स्वच्छता लक्ष्मी'
sakal

बोलून बातमी शोधा

उत्सव दिव्यांचा : झांबरी कार्टी नव्हे 'स्वच्छता लक्ष्मी'

शहरातील घरांमध्ये तिची जागा मात्र गवत, प्लॅस्टिक यापासून बनविलेल्या ‘झाडूं’नी घेतली आहे. पण, दिवाळी सणाच्या निमित्ताने गावातील आणि शहरातील प्रत्येक घरात ‘झांबरी कार्टी’ बघायला मिळते.

उत्सव दिव्यांचा : झांबरी कार्टी नव्हे 'स्वच्छता लक्ष्मी'

sakal_logo
By
पीतांबर लोहार

‘पाहुणे आले, गडबड झाली, झांबरी कार्टी कुठे गेली..?’ हे कोडे अनेकांनी तुम्हाला घातले असेल किंवा तुम्ही अनेकांना विचारले असेल. सुरुवातीला तुम्हाला किंवा तुम्ही विचारलेल्या अनेकांना त्याचे उत्तर माहिती नसेल. इतरांपैकी कदाचित काहींनी बरोबर उत्तर दिलेही असेल. पण, अनेकांना कोड्यात टाकणारी ही ‘झांबरी कार्टी’ ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरात दिसते. शहरातील घरांमध्ये तिची जागा मात्र गवत, प्लॅस्टिक यापासून बनविलेल्या ‘झाडूं’नी घेतली आहे. पण, दिवाळी सणाच्या निमित्ताने गावातील आणि शहरातील प्रत्येक घरात ‘झांबरी कार्टी’ बघायला मिळते. नव्हे, तिचे आदराने स्वागत केले जाते. दैवताप्रमाणे पूजन केले जाते. त्याशिवाय दिवाळीचे लक्ष्मीपूजन पूर्ण होतच नाही. ही ‘झांबरी कार्टी’ म्हणजे केरसुणी, दिवाळीतील ‘लक्ष्मी’ होय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

प्रस्तुत कोड्यातील प्रसंग अचानक घरी पाहुणे आल्याचा आहे. आपल्या घरी पाहुणे येणार असल्याचे अगोदर कळाले, तर प्रत्येक गृहिणी घर टापटीप, नीटनेटके ठेवत असते. घरातील पसारा आवरत असते; जेणेकरून आल्याला अतिथीला घरात प्रसन्न वाटले पाहिजे. पण, अचानक पाहुणे आले आणि घरात सर्व पसारा पडलेला आहे. वस्तू इतरत्र विखुरलेल्या आहेत, तर गृहिणीची धांदल उडते. घर स्वच्छ करण्यासाठी, नीटनेटके करण्यासाठी तिची धडपड सुरू होते. या साऱ्या गडबडीत घरातील साफ करण्यासाठी उपयुक्त ठरणारी केरसुणी लवकर नाही सापडली, तर त्या गृहिणीच्या मनाची काय अवस्था होत असेल. कल्पनाही करवत नाही. काही बुजुर्ग म्हणतात की, ‘घराच्या स्वच्छ अंगणावरून घरातील वैभवाची प्रचिती येते.’ आणि हे खरेही आहे. कारण, आपल्या भारतीय संस्कृतीत घराची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी अप्रत्यक्षरीत्या गृहिणीकडे आहे. या गृहिणीलाच ‘गृहलक्ष्मी’ संबोधले आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘झांबरी कार्टी’सुद्धा ‘लक्ष्मी’च असते. तिलाच आपण अन्य दिवशी केरसुणी म्हणतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र केरसुणीरूपी लक्ष्मीचे पूजन करून दुसऱ्या दिवसापासून तिचा वापर घर झाडून काढण्यासाठी, साफसफाईसाठी सुरू करतो. म्हणजेच, घरातील केररूपी राक्षस अर्थात कचऱ्याचा राक्षस निर्मूलनाचे काम ‘लक्ष्मी’ करीत असते. म्हणूनच, ती स्वच्छतालक्ष्मी ठरते. म्हणतात ना, ‘स्वच्छता ज्याचे घरी, लक्ष्मी तिथे वास करी’. हा ‘लक्ष्मी’चा वास, निवास, सहवास आपल्या घरामध्ये नियमितपणे राहू द्यायचा असेल, तर ‘लक्ष्मी’चे आगमन घरामध्ये व्हायलाच हवे. त्यामुळेच दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठेत ‘लक्ष्मी’ विक्रीला आल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला ‘त्या’ विक्रीसाठी निदर्शनास येत आहेत. नागरिकही ‘लक्ष्मी’ खरेदी करीत आहेत. दिवाळीच्या निमित्ताने ‘लक्ष्मी’चे स्थान केरसुणीच्या रूपात असले, तरी त्याचा अर्थ दोन रूपाने घेऊया. कारण, असे म्हटले जाते की, ‘ज्या ठिकाणी किंवा ज्या घरात स्वच्छता राखली जाते. नियमितपणे साफसफाई केली जाते; त्या घरात ‘लक्ष्मी’चा म्हणजे ‘धन’रूपी लक्ष्मीचा वास निरंतर असतो.’ 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

म्हणजेच, त्या घरात नेहमी आर्थिक सुबत्ता असते. पैशांची अडचण कधीही भासत नाही. आणि ही ‘धनलक्ष्मी’ घरात प्रवेश करण्यासाठी घर स्वच्छ ठेवण्याचे काम केरसुणीरूपातील ‘लक्ष्मी’ करीत असते. त्यामुळेच कदाचित दिवाळीच्या प्रकाशपर्वात प्रत्येक घरात ‘स्वच्छतालक्ष्मी’ला मानाचे स्थान आहे आणि ही ‘स्वच्छतालक्ष्मी’ निसर्गाची देण आहे. कारण, शिंदीच्या झाडाच्या पानांपासून केरसुणी बनवली जाते. ही शिंदीची झाडे महाराष्ट्रातील डोंगररांगांच्या कुशीत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. हीच निसर्गाची देण आणि लक्ष्मीचा मान आहे. दिवाळीच्या निमित्ताने तिचे पूजन करूयात! आणि लक्ष्मीच्या पावलाने वैभव घरी आणूया..!
(क्रमशः)