उत्सव दिव्यांचा : भावनांचे अंतरंग साकारणारी रांगोळी!

उत्सव दिव्यांचा : भावनांचे अंतरंग साकारणारी रांगोळी!

मित्रांनो! तीस वर्षांनंतर हा प्रसंग आठवण्याचे कारण म्हणजे रांगोळी. एक उत्साहाचे, मांगल्याचे, अतिथींच्या स्वागताचे, सण-सोहळ्यांचे प्रतीक. सुखाचा क्षण, आनंदाचा सोहळा असेल, तर रांगोळी हमखास काढली जाते. मग, तो आषाढी-कार्तिकी वारीचा सोहळा असो की दसरा-दिवाळीचा सण रांगोळीशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. ऐरवीसुद्धा गावातील एखाद्या घराच्या अंगणात सडा टाकलेला असतो. त्यावर सुरेख रांगोळी काढलेली असते. शहरातील गृहनिर्माण सोसायटीतील काही सदनिकेच्या दाराजवळ, बैठ्या घरासमोरील अंगणात, बंगल्याच्या प्रवेशद्वारासमोरसुद्धा रांगोळी असते. काहींनी रांगोळीचे चित्र (छाप) दरवाजाजवळ चिकटवलेले असते. यावरून रांगोळीचे महत्त्व अधोरेखित होते. पण, ही रांगोळी येते कुठून? बनवतात कशी? याचा कधी विचार केलाय? सांगतो. मित्राबरोबरच्या संवादात ‘शिरगोया’चा उल्लेख आहे. शिरगोया म्हणजे शिरगोळा नावाचा दगड. गारगोटीसारखा दिसणारा. त्याला खान्देशातील तावडी बोलीत शिरगोया म्हटले जाते. तावडीत ‘ळ’चा ‘य’ होत असल्याने रांगोळीला ‘रांगोयी’ म्हटले जाते. शब्द व उच्चार बोलीतील असो की प्रमाण भाषेतील. अर्थ आणि भाव एकच रांगोळी. आणि त्यातून उमटतात ते रांगोळी काढणाऱ्याच्या मनातील भावरंग, भावतरंग.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घरी आल्यावर आईने शिरगोळ्याला खलबत्त्यात कुटून बारीक केले. त्याची पावडर झाल्यावर चाळणीतून गाळून घेतले. जाड राहिलेले खडे पुन्हा खलबत्त्यात गेले. लोखंडी मुसळीच्या साह्याने बारीक होऊ लागले. पुन्हा चाळणीने गाळले. ती गाळलेली पावडर म्हणजेच रांगोळी तयार झाली होती. त्यातील बारीक कण चमकत होते. या चकाकण्याच्या गुणामुळेच शिरगोळा ओळखायला शिकलो होतो. नाहीतर गारगोटीसुद्धा त्याच्यासारखीच दिसते. फरक फक्त इतकाच, की गारगोटी टणक असते. ती सहजासहजी फुटत नाही. शिरगोळा ठिसूळ असतो. त्यापासून सहज रांगोळी तयार करता येते. पांढऱ्या शुभ्र रांगोळीत कुंकू मिसळले की लाल रंगाची रांगोळी तयार होते. हळद मिसळली की पिवळी, गुलाल मिसळला की गुलाबी, बुक्का मिसळला की काळी. नीळ पावडर मिसळली की निळी रांगोळी मिळते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिवाय, दुकानावर सुद्धा काही रंग मिळायचे, त्यापासून हवी त्या रंगाची रांगोळी तयार व्हायची आणि अंगण सजायचे. आता बाजारपेठेत दुकानांमध्ये, पथारीवाल्यांकडे, हातगाडीवाल्यांकडे सर्व रंगांतील रांगोळी मिळते. पावडर स्वरूपातील रांगोळीचे रंगही असतात. त्यापासूनसुद्धा रांगोळी काढली जाते. केरळी बांधवांप्रमाणे मराठी माणसेही फुले व फुलांच्या पाकळ्यांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या, आकाराच्या रांगोळ्या काढू लागले आहेत. सण-उत्सवाचा आनंद द्विगुणित करीत आहेत. आपल्यालाही दिवाळीचा आनंद अधिक द्विगुणित करण्यासाठी घरासमोर रांगोळी काढायची आहे. दिवाळीचे प्रकाशपर्व उद्यापासून सुरू होतेय. त्यामुळे वसुबारसच्या दिवशी कोणती रांगोळी काढायची, काय संकल्पना मांडायची, ते ठरवायचे आहे. अंगण रांगोळीने सजवायचे आहे.
(क्रमश:)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com