
भोसरी : येथील पुणे-नाशिक महामार्गालगत डंपरच्या साहाय्याने कचरा टाकणाऱ्यांवर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणार असून, महापालिकेद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या 'ह' प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी रमेश भोसले यांनी दिली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
भोसरीतील लांडेवाडी येथे महापालिकेने भव्य ऐतिहासिक प्रवेशद्वार उभारले आहे. मात्र, या प्रवेशद्वारासमोरून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गालगत रात्री काही जणांकडून डंपरद्वारे कचरा टाकला जातो. काही वेळेस लघुउद्योगांमधील टाकाऊ वस्तूही या ठिकाणी टाकल्या जातात. यामध्ये भट्टीतील माती व काही रासायनिक द्रव्याचाही समावेश आहे. काही वेळेस या रासायनिक पदार्थांमुळे उग्र वासही महामार्गावर पसरतो. याबरोबरच राडारोडा, कचरा, गोठ्यातील शेण, त्याचप्रमाणे फळे-भाजी विक्रेत्यांद्वारे टाकाऊ भाजीपाला-फळे टाकली जातात. त्यामुळे रस्त्याच्याकडेला जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. येथून जाणाऱ्या वाहनचालकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतो.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
डंपरच्या साहाय्याने कचरा टाकणाऱ्यांवर आळा बसावा आणि डंपरने रस्त्यालगत कचरा टाकता येऊ नये, यासाठी रस्त्याच्याकडेला चर खोदण्यात आल्याची माहिती 'ह' प्रभागाच्या आरोग्य निरीक्षिका धनश्री जगदाळे यांनी दिली. मात्र, डंपरचालक ज्या ठिकाणी चर खोदले नाही, त्या ठिकाणी कचरा टाकत आहे. काही महिन्यांपूर्वी बंद झालेला हा प्रकार गेल्या पंधरा दिवसांपासून पुन्हा घडत आहे. रस्त्याच्या उर्वरित भागावरही चर खोदण्यात येणार आहेत, अशी माहितीही जगदाळे यांनी दिली.
कर्मचाऱ्यांवर डंपर घालण्याचा प्रयत्न
डंपरद्वारे कचरा टाकण्यात येत आहे, ही बाब एक महिन्यांपूर्वीच महापालिकेच्या कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आली. या कर्मचाऱ्याने डंपरचालकास हटकल्यावर डंपरचालकाने कर्मचाऱ्यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न केला. हे कर्मचारी वेळीच बाजूला झाल्याने मोठा अनर्थ टळला. डंपरचालकाने या कर्मचाऱ्यांना धमकावून तेथून पोबारा केल्याची माहिती 'ह' प्रभागाचे सहाय्यक आरोग्याधिकारी रमेश भोसले यांनी दिली.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुणे-नाशिक महामार्गालगत काही नागरिकांद्वारे टाकण्यात येणारा कचरा महापालिकेद्वारे वेळोवेळी उचलला जातो. डंपरद्वारे टाकण्यात येणारा कचरा जेसीबीच्या साहाय्याने उचलला जातो. मात्र, काही विकृत प्रवृत्तींच्या नागरिकांद्वारे या ठिकाणी कचरा टाकला जातो. येथे कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. कचरा टाकणाऱ्या डंपरचालकांवर आळा बसावा, यासाठी भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार देणार आहे.
- रमेश भोसले, सहाय्यक आरोग्याधिकारी, 'ह' प्रभाग
(Edited by : Shivnandan Baviskar)