
पिंपरी : कामगारांची पुणे मुंबई दुचाकी रॅली पिंपरी चिंचवड पोलिसांनी अडवली
पिंपरी - एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन निषेध दीन म्हणून पाळत कामगार संघटना संयुक्त कृती समितीची पिंपरीतून मुंबईकडे निघालेली दुचाकी रॅली पोलिसांनी सकाळीच पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात अडवली आहे. कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष तथा कामगार नेते कैलास कदम आणि मानव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली रॅली मुंबईला जाणार होती. केंद्र सरकारने नवीन कामगार कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी केंद्र सरकारचा निषेध करीत कामगारांची पुणे-मुंबई दुचाकी रॅली निघणार होती.
प्रचलित कामगार कायदे रद्द करून केंद्र सरकारने चार नवीन कायदे करून देशभरातील सर्व संघटित, असंघटित कामगारांची सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक सुरक्षितता धोक्यात आणली आहे त्याचा निषेध सर्व कामगार संघटनांनी रस्त्यावर उतरून विरोध केला आहे. हे कामगार कायदे रद्द करावेत आणि पूर्वीचेच कामगार कायदे लागू करावेत या मागणीसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व कामगार संघटना रविवार दिनांक 1 मे रोजी पुणे मुंबई दुचाकी रॅली काढून निषेध करणार आहेत. पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथून या रॅलीस रविवारी सकाळी ६ वाजता सुरुवात झाली. दुपारी तीन वाजता मुंबईतील आझाद मैदान येथे या रॅलीचे सभेत रूपांतर होणार होते. यानंतर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना भेटून निवेदन देण्यात येणार होते. परंतु, रॅली निघताच पिंपरी पोलिसांनी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष तथा काॅंग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, कामगार नेते अनिल रोहम, वसंत पवार आदींना ताब्यात घेतले.
रॅलीला सुरुवात करण्यापूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि महात्मा फुले पुतळा तसेच महात्मा गांधी आणि कामगार संघटनांचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण केले. पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील सर्व भागातील कामगार संघटना आणि रायगड, ठाणे, नवी मुंबई व मुंबईतील कामगार कामगार संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होते. देशभरातील कोणत्याही कामगार संघटनांची मागणी नसताना कोरोना काळात देशभर सर्व उद्योग व्यवसाय ठप्प अससताना केंद्रातील भाजप सरकारने विरोधी पक्षांना किंवा कोणत्याही कामगार संघटनांना विश्वासात न घेता हुकूमशाही पद्धतीने नवीन कामगार कायदे संसदेमध्ये संमत केले. हा देशातील कष्टकरी कामगारांचा विश्वासघात आहे या नवीन कामगार कायद्यांमुळे कायम कामगार ही संज्ञा नष्ट होणार असून भविष्यात सर्व पिढ्यांचे आर्थिक, सामाजिक स्थैर्य यामुळे संपुष्टात येणार आहे. पूर्वीचे कामगार कायदे लागू करावेत यासाठी आणि कामगारांना सामाजिक, आर्थिक, सुरक्षितता मिळावी या मागणीसाठी पुणे - मुंबई दुचाकी रॅलीमध्ये सर्व संघटित व असंघटित कामगार सहभागी झाले असल्याचे कदम यांनी सांगितले. ज्येष्ठ कामगार नेते मानव कांबळे म्हणाले की, या रॅलीमध्ये पुरोगामी आणि डाव्या विचारसरणीच्या अनेक सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी देखील सहभाग झाले आहेत.
Web Title: Police Blocked A Two Wheeler Rally From Pimpri To Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..