
पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयर्नमॅन अशी ओळख असलेले कृष्ण प्रकाश या व्हिडिओमध्ये भावूक झालेले दिसतात.
पिंपरी चिंचवड - पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयर्नमॅन अशी ओळख असलेले कृष्ण प्रकाश या व्हिडिओमध्ये भावूक झालेले दिसतात. एका मुलीची बाबाला साद घालणारी कविता ऐकून कृष्ण प्रकाश यांना अश्रू अनावर झाले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ऋतुजा शांतीलाल पाटील ही तरुणी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची भेट घेण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात आली होती. वडिलांच्या निधनानंतर आलेले अनुभव ऋतुजाने तिच्या झुळूक नावाच्या पुस्तकात शब्दबद्ध केले होते. त्यातलीच एक कविता तिने कृष्ण प्रकाश यांना ऐकवली. देवा घरचा बाबा ही कविता ऐकताच पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश भावूक झाले. त्यावेळी उपस्थित असणारे अधिकारीसुद्धा भावूक झाले होते.
पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची भेट घेण्यासाठी आलेली ऋतुजा पाटील ही मूळची सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातील जाशी गावची आहे. तिच्या वडिलांचा हृदयाच्या विकारामुळे मृत्यू झाला होता. वडिलांचे छत्र हरवल्यानंतर पोरकी झालेल्या ऋतुजाने झुळूक नावाचं पुस्तक लिहिलं. त्यात बाप नसलेल्या पौगंडावस्थेतील मुलीबद्दल लिहिलं आहे. हेच पुस्तक पोलिस आय़ुक्तांना देण्यासाठी ती आईसोबत आली होती.
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कृष्ण प्रकाश यांनी ऋतुजाकडून जेव्हा तिच्या बाबांबद्दल ऐकलं आणि तिने कविता सादर केली तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. कृष्ण प्रकाश यांनी म्हटलं की, मीसुद्धा एका मुलीचा बाप आहे. वडिलांशिवाय मुलींचा अवस्था कशी होईल याची कल्पना केली आणि भावूक झालो. मुलगा-मुलगीमध्ये भेदभाव करू नका. कुटुंबाची काळजी घ्या असंही ते म्हणाले. तसंच ऋतुजाचं भविष्यातील शिक्षण पूर्ण व्हावं यासाठी तिचं पालकत्वसुद्धा कृष्ण प्रकाश यांनी स्वीकारलं.