esakal | बेड नसल्याने ऑक्सिजन लावून जमिनीवर झोपलेत रूग्ण; पिंपरीत आरोग्यव्यवस्थेची दैना!

बोलून बातमी शोधा

खाली जमिनीवरच झोपलेले रुग्ण

बेड नसल्याने ऑक्सिजन लावून जमिनीवर झोपलेत रूग्ण; पिंपरीत आरोग्यव्यवस्थेची दैना!

sakal_logo
By
विनायक होगाडे

पिंपरी : शहरात कोरोनाची भयानक स्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने आवारातच खाट आणि जमिनीवर झोपून ऑक्सिजन सिलेंडरसह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात आरोग्य व्यवस्थेचे असेच एक विदारक चित्र पाहायला पहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान कमी होण्याऐवजी वाढतच आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. अशावेळी आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचं चित्र पुन्हा पुन्हा समोर येत आहे. महापालिकेचे सर्वात मोठे असलेल्या वायसीएम रूग्णालयावर दिवसेंदिवस ताण पडत आहे. सगळ्या रूग्णांना वायसीएममध्येच उपचार हवे आहे. मागील आठवड्यापासून हे रूग्णालय कोविड रुग्णांसाठी समर्पित केले आहे.

शहरात बाधितांची संख्या वाढतच चालल्यामुळे सर्वच कोविड सेंटर व खासगी रुग्णालये पूर्ण भरलेला आहेत. सध्या दररोज दोन ते अडीच हजार रूग्ण शहरात नव्याने बाधित होत आहेत. बेड नसणे या समस्येला आता शहरातील कोविड रूग्णांचे ‘हेड क्वार्टर’ समजल्या जाणाऱ्या वायसीएमलाही सामोरे जावे लागत असल्याची स्थिती आहे. अनेक रुग्णालयात फिरुनही बेड मिळत नसल्याने या रुग्णांसाठी वायसीएमधील उपहारगृहाबाहेर काही रूग्णांसाठी बेड तयार केले तर यातील काही रुग्णांना श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने अशा स्थितीत काही रूग्णांना ऑक्सिजन सिलेंडरसह जमिनीवरच उपचार सुरू केले आहेत. रूग्ण संख्या दररोज वाढतच असल्याने आरोग्य कर्मचारी, डॉक्टर व परिचारिकांना सेवा करताना त्यांच्यावरही ताण पडला आहे. त्यामुळे त्यांनाही नैराश्य येत आहे. मात्र काहीच इलाज नसल्याची वस्तुस्थिती असल्याची एकूणच अंगावर काटा आणणारी स्थिती पहायला मिळत असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. अनेक रुग्णालयात फिरुनही बेड मिळत नसल्याने महापालिकेकडून कोरोना रुग्णांसाठी होत असलेल्या तोकड्या उपाययोजना चव्हाट्यावर आल्या आहेत.

रूग्णालयात नियमांचा फज्जा
सोमवारी सायंकाळी रूग्णालयात नियमांचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. रूग्णालयात दाखल करून घेण्यासाठी नातेवाईकांनी गर्दी झाली होती. अनेकजण बेड मिळण्यासाठी धावपळ करत होते. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजल्याचे दिसून आला. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाय करण्यासाठी कोणी पुढे आले नाहीत.