
थंडीमुळे हुर्ड्याला होतोय उशीर; ग्रामीण भागात प्रमाण अधिक
टाकवे बुद्रुक (ता. मावळ) : मावळात थंडीच्या दिवसांत ज्वारीची कणसे तयार झाली की बरेचजण हुरड्या पार्ट्यांचा आस्वाद घेतात. सध्या हुरडा पार्ट्यांना वेळ लागणार असल्याने हौशी तरुण पोपटी पार्ट्या रंगवीत असल्याचे चित्र मावळ भागात दिसू लागले आहे. शेतात पावटा, वालाच्या शेंगांबरोबर इतर भाज्या असल्याने, तसेच भांबुर्डा ही वनस्पती सर्वत्र उपलब्ध होत असल्याने अनेकजण पोपटी पार्ट्यांचा बेत आखू लागले आहेत.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
हिवाळ्यातील हुरडा पार्ट्या तशी मावळंकर आणि मावळकरकारांच्या पाहुणे मंडळींसाठी मेजवानीच असते. मात्र, यंदा पाऊस लांबल्याने गहू, ज्वारीच्या पेरण्या उशिरा झाल्या त्यामुळे टपोरे दाणे भरलेली कणसे अद्यापही आलेली नाही. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांना आपापल्या शिवारात रब्बी पिकांबरोबर तरकारी भाज्या पिकवल्या आहेत. ज्वारी व हरभऱ्याचा वापर तर हुरडा व हुळा बनविण्यासाठी होणार आहे. मात्र, शिवारात पिकविलेल्या पावट्याच्या शेंगाचा, बटाटा, वांगी, हिरव्या मिरच्या, टोमॅटो यांचा वापर ग्रामीण भागातील तरुण पोपटी पार्ट्यांसाठी करू लागले आहेत. काही तरुण पोपटी पार्ट्यांसाठी लागणारे सर्व सामान विकत आणून त्याचा बेत आखत आहेत आणि आस्वादही घेत आहेत.
- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
असे असते नियोजन
ग्रामीण भागातील मुले पोपटी बनवण्याचे नियोजन दोन-तीन दिवस अगोदरच करतात. त्यासाठी प्रत्येकाला कामे वाटून दिली जातात. विकत आणण्यासाठी लागणारे साहित्यासाठी प्रत्येकाकडून थोडे-थोडे पैसे जमा करून एकजणास देऊन बाजारातून सर्व साहित्य आणले जाते. कोणी मडके आणतो, कोणी लाकडे आणतो, कोणी गोवऱ्या आणतो. तर कोणीएक शेतातील भाज्या आणतो. त्यातील एकजणास भांबुर्ड्याचा पाला आणण्यास शिवारात पाठवले जाते. त्यानंतर रात्री गुलाबी थंडीत पार्टी बनविण्याची तयारी सुरू होते. पार्टी बनवता बनवता गप्पागोष्टी व चेष्टामस्करीची फोडणी दिली जाते.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
अशी बनवितात पोपटी
एक तास अगोदर चिकन व बटाट्याला दही व मसाले, चवीनुसार मीठ लावून ठेवले जाते. एका तासानंतर मडके आणून स्वच्छ ते पाण्याने धुतले जाते. मडक्याच्या तळाशी धुतलेला भांबुर्ड्याचा पाला ठेवला जातो. वालाच्या शेंगा, त्यावर दही व मसाले लावून ठेवलेले चिकन ठेवले जाते. त्यावर अंडी, बटाटे, वांगी व टोमॅटो ठेवली जातात. त्यानंतर मडक्याचे तोंड भांबुर्ड्याच्या पाल्याने बंद केले जाते. मडके उलटे करून एका ठिकाणी ठेवले जाते. लाकडे व गोवऱ्या मडक्याच्या भोवती ठेवून आग लावली जाते. अर्धा ते पाऊण तासानंतर आगीतले मडके काढून आतील शिजलेल्या भाज्या, चिकन व अंडी एका मोठ्या थाळीत काढून पोपटी पार्टीचा आस्वाद घेतला जातो.