Positive Story : 3 लाखांच्या सोन्याची पर्स टाकली घंटागाडीत;18 टन कचरा उपसून दिली शोधून

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

दिवाळी निमित्ताने स्वच्छतेचे काम हाती घेतले होते. स्वच्छतेनंतर त्यांनी कचरा एका घंटागाडीत टाकला. मात्र, तीन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने असलेली पर्स त्यांना घरात सापडत नव्हती.

जुनी सांगवी : "मला पिंपळे गुरव येथून एका मित्राचा फोन आला. त्याने सांगितले की माझ्या मित्राच्या आईचे सोने असलेली पर्स घंटागाडीतील कचऱ्यात गेली आहे. कृपया आपण ते शोधण्याचा प्रयत्न करावा. आम्ही एकत्रित केलेल्या अठरा टन कचऱ्यातून त्या महिलेची सोने असलेली पर्स शोधून काढली व त्यांच्या स्वाधीन केली,'' असे आरोग्य कर्मचारी हेमंत लखन यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पिंपळे गुरव येथे राधा सेलूकर यांनी दिवाळी निमित्ताने स्वच्छतेचे काम हाती घेतले होते. स्वच्छतेनंतर त्यांनी कचरा एका घंटागाडीत टाकला. मात्र, तीन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने असलेली पर्स त्यांना घरात सापडत नव्हती. घरात सगळीकडे शोधाशोध केल्यानंतर ती कुठेच मिळून आली नाही. सोने कचऱ्यात गेल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे महिलेच्या घरच्यांनी आरोग्य विभागाकडे हा प्रकार सांगितला व पर्स शोधण्यासाठी विनंती केली. त्यानंतर आरोग्य कर्मचारी हेमंत लखन यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मोशी कचरा डेपोमध्ये अठरा टन कचरा उपसून पर्स शोधून काढली. त्यामुळे सेलूकर कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, आरोग्य विभागाचा प्रामाणिकपणा व दक्षतेमुळे सोने परत मिळाले. त्यामुळे पिंपरी युवा सेना विभाग संघटक नीलेश हाके व सहकाऱ्यांनी आरोग्य कर्मचारी हेमंत लखन, आरोग्य अधिकारी अजय जाधव व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. याप्रसंगी आनंद कांबळे, मोहसीन शेख, सूरज शिंगोटे उपस्थित होते. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: positive story returned the bag containing five grams of jewelery