मोशी प्राधिकरण परिसरात वीजेचा लपंडाव; 'हे' आहे कारण

Power outage in Moshi Authority area
Power outage in Moshi Authority area

मोशी : प्रत्येक गुरुवारी वीज जाण्याबरोबरच सध्या मोशी प्राधिकरण परिसरातील पेठ क्रमांक 4 मध्ये आठवड्यातून किमान 3 ते 4 वेळा दोन ते तीन तास वीज जातेच जाते. त्यामुळे मोशी प्राधिकरण परिसरातील विविध व्यावसायिक व नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याने या वीजेच्या लपंडावाविषयी येथील स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्यापारी संकुले व निवासी भाग : 
मोशी प्राधिकरण परिसर म्हणजे व्यापारी संकुले, वीजेची आवश्यकता असलेले विविध व्यवसाय व नियोजनबद्ध वसवलेल्या निवासी परिसरातील एक सुंदर परिसरापैकी एक समजला जातो. त्यामुळे या ठिकाणी हजारो नागरिकांनी राहण्यासाठी येथे स्वतःचे बंगलो प्लाॅट घेऊन सुंदर बंगलो बांधले आहेत तर, असंख्य नागरिकांनी येथे उभारण्यात आलेल्या गगनचुंबी टाॅवर्समध्ये सदनिका घेतलेल्या आहेत. लोकसंख्या जास्त असल्याने विविध व्यवसायाच्या दृष्टीने असंख्य नागरिकांनी येथे असलेल्या  स्पाईन सीटी, प्रिव्हिया, जय गणेश साम्राज्य आदी मोठ्या व्यापारी संकुलामध्ये व्यापारी गाळे घेऊन विविध व्यवसायही करत आहेत. तर काही निवासी इमारतींच्या खाली असलेल्या व्यापारी गळ्यामध्ये विविध व्यवसाय करत आहेत.

वीजेची आवश्यकता असलेले व्यवसाय :
नागरीकांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या व्यवसायांपैकी मोशी प्राधिकरण परिसरामध्ये धान्याची गिरणी, दुध डेअरी, लाँड्री, झेरॉक्स, नाभिक आदी व्यवसाय आहेत. त्यापैकी 
वीजेची अत्यंत आवश्यकता असलेला नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा व्यवसाय म्हणजे धान्य दळण्याची गिरणी. मोशी प्राधिकरण परिसरात दोन तीन गिरणी आहेत. महिन्यातील काही गुरुवारी काहींना काही किरणास्तव किमान सकाळी 10 ते सायंकाळी 4 ते 5 पर्यंत वीज जातेच जाते. त्यामुळे दर गुरुवारी गिरणी मालकांच्या व्यवसायावर परिणाम होतो. शिवाय नागरिकांनाही वेळेत पीठे न मिळाल्याने अडचणीचा सामना करावा लागतो. असे येथील एका गिरणी मालकाने सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दुध डेअरी :
परिसरामध्ये  किमान पाच ते सहा दुध डेअरी आहेत. याबरोबरच अनेक किराणा मालाच्या दुकानांमधूनही हे दुग्धजन्य पदार्थ विक्रीस ठेवले जाता. दुध, दही, ताक, तुप, पनीर आदी दुग्धजन्य पदार्थ जास्त काळ टिकावेत म्हणून ते थंड फ्रीजमध्येच ठेवावे लागते. त्यामुळे येथेही विशेषत: वीज गेल्यास दुध नासणे यांसारख्या समस्येमुळे नुकसान स्विकारावे लागते. 

 नाभिक व्यवसाय :
अनेक नाभिक सध्या इलेक्ट्रॉनिक्स यंत्रांचा उपयोग आपल्या या केशकर्तन व्यवसायामध्ये करु लागले आहेत. परिसरात औद्योगिक वसाहत असल्याने या परिवारातील असंख्य नागरिकांना गुरूवारी साप्ताहिक सुट्टी असते त्यामुळे नाभिक व्यावसायिकांकडे प्रत्येक ग्राहकांची संख्या अधिक असते. त्यामुळे वीज गेल्याने याही व्यावसायिकांना या वीजेच्या समस्यला तोंड द्यावे लागत आहे. 

लाँड्री व्यवसाय :
परिसरामध्ये दहा ते बारा लाँड्री व्यावसायिक आहेत. येथेही कपडे धुणे, स्टार्च करणे, इस्त्री करणे आदी सर्वच कामे वीजेवरच होतात. त्यामुळे याही व्यवसायात गुरुवारी व इतर वेळी वीज गेल्याने नुकसान सोसावे लागते व दिवसा वीज गेल्याने रात्री नाइलाजास्तव उशीरापर्यंत काम करावे लागते. 

व्यापारी संकुले : 
परिसरामध्ये तीन मोठी व्यापारी संकुले असून यामध्ये झेरॉक्स, हाॅटेल, बँका, पतसंस्था, दैनंदिन गरजा असलेल्या विविध वस्तूंचे विविध व्यवसाय, लहान दवाखाने, मोठी रुग्णालये, वसतीगृहे, पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांबरोबरच लहान मोठी विविध कार्यालये मोठ्या प्रमाणावर या परिसरामध्ये आहेत. 
 गुरुवारी व अन्य दिवशीही काही तासांसाठी का होईन वीज गेल्यास झेरॉक्स, संगणकावरील कामे, इस्त्री यांसारखी वीजेवर चालणार्‍या व्यावसायिकांचे काही प्रमाणात का होईना नुकसान होत आहे. 

मोठा निवासी परिसर :
 मोशी प्राधिकरणातील पेठ क्रमांक 4, 6, 9 आदी पेठांमध्ये शेकडो नागरिकांनी स्वतःचे बंगलो बांधून तर हजारो नागरिक गगनचुंबी इमारतींमधील सदनिकांमध्ये राहत आहेत. सध्या लाॅकडाऊन सुरु असल्याने असंख्य विद्यार्थी घरीच आहेत तर काही नोकरदारांचे उद्योग व्यवसाय सुरु न झाल्याने असे काही नागरिकही घरीच आहेत. अशा वेळी वीजेच्या लंपडावामुळे घरामध्ये गरम होणे, विद्यार्थ्यांना अभ्यास करणे तर गृहिणींना स्वयंपाकासाठी अत्यावश्यक असलेले मिक्सर चालविता येत नाहीत अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

विशेषत : पेठ क्रमांक 4 मध्ये जास्त समस्या : 
मोशी प्राधिकरणातील पेठ क्रमांक 6 व 9 मध्ये ही समस्या कमी आहे मात्र पेठ क्रमांक 4 मध्ये वीज जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या मोशी परिसरातील पेठ क्रमांक 4 सह पेठ क्रमांक 6 व 9 परिसरामध्ये अनेक दिवसांपासून असलेला हा वीजेचा लपंडाव थांबवून महावितरणच्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी या समस्येवर त्वरीत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी राजेश किबीले, विठ्ठल वाळुंज, संजय आहेर, विजय पिरंगुटे, साहेबराव गावडे, नेताजी पाटील, राधा शिंपी, अनिता किबीले, शरद चव्हाण, अशोक गुजाळ आदींसह अनेक स्थानिक नागरीकांनी केली आहे. 

''जवळच कचरा डेपो आहे. येथे पेठ क्रमांक 4 मध्ये असलेल्या फिडरवरुनच वीज जोड दिलेले आहेत. कचरा डेपो व प्राधिकरण परिसरामध्ये कावळ्यांचे प्रमाण जास्त असून वीज उपकरणांवर कावळे बसल्याने फिडर नादुरुस्त होतात. त्यामुळे ज्या ज्या वेळी असे प्रकार घडतात त्या त्या वेळी किमान 10 ते 20 मिनिटांसाठी वीज जाते. तसेच काही वीजेसंबंधीत असलेली दुरुस्तीची कामे गुरुवारीच करावी लागतात. त्यामुळे दर गुरुवारी नाही तर, काही गुरुवारीच ही दुरुस्तीची कामे करावी लागली आहेत. त्यामुळे काही गुरुवारी वीज पुरवठा बंद करावा लागला होता. अन्य वेळी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.''
- विक्रांत वरुडे, साहाय्यक अभियंता महावितरण, मोशी विभाग. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com