विकासाचा महामेरू

Prashant-Shitole with Ajit Pawar
Prashant-Shitole with Ajit Pawar

खंबीर नेतृत्व, ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेब यांच्या मुशीत तयार झालेले अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. नुसती घेतली नाही तर त्यांनी समर्थपणे पेलली. सत्ता असताना विकासप्रक्रिया कशा पद्धतीने पुढे न्यायची, याचा आदर्श दादांनी घालून दिला आहे. नेतृत्व कशाला म्हणायचे, याचा परिपाठ दादांनी नव्या पिढीला घालून दिला आहे. सवंग लोकप्रियतेला टाळत दादांनी विकासाच्या बळावर राज्यभर झंझावात दाखवून दिला. विकासातून नेतृत्वसिद्धतेची परीक्षा अतिशय चांगल्या मार्काने उत्तीर्ण होणारे दादांचे व्यक्तिमत्व काही अनोखेच.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अजितदादा म्हटले, की प्रशासनावर पकड असणारा नेता असे समीकरण सर्वांनाच माहीत आहे. कामाचा झपाटा हा त्यांचा गुण आहे. कडक स्वभावामुळे दादा नेहमी चर्चेत राहतात. खरे तर त्यांची कामावर असलेली निष्ठाच त्यांच्या कडक स्वभावात परिवर्तित होते. ज्याप्रमाणे काही गोष्टींसाठी कटूता स्वीकारून सत्याला न्याय द्यावा लागतो, या तत्त्वातील दादांचे व्यक्तिमत्व आहे. कामात वेग आणि अचूकता ही त्यांच्या कामातील बलस्थाने आहेत. या दोन्ही गोष्टी एकत्र असणारी खूप कमी व्यक्तिमत्व आहेत. त्यात दादा अग्रस्थानी आहेत. विकासाच्या कामात वैयक्तिक हितापेक्षा समाजहित जपण्याला दादांनी नेहमी प्राधान्य दिले आहे. कठोर निर्णय घेतल्याने दादांना राजकीय जीवनात अनेकदा किंमतही मोजावी लागली. पण त्यांनी त्याला कधी भीक घातली नाही. स्वत:कडे वाईटपणा घेऊन जीवनात सत्याची कास धरत दादांनी यशाच्या पायऱ्या सर केल्या.

त्यामुळेच आजही दादांचा प्रशासनावर विशेष ठसा असलेला पाहायला मिळतो. समाजाचे हित हा केंद्रबिंदू माणून दादा पुढे जात आहेत. त्यामुळे त्यांना बेरजेच्या राजकारणाचा बादशहा म्हटले जाते. विकासाचे काम म्हटले की ते दादा समाजहित लक्षात घेतात. म्हणजे पक्षविरहित काम करणे हा दादांमधील प्रगल्भता दर्शविते. सत्तेत असो वा नसो, जिथे समाजाचा विचार येतो, तेव्हा काम आणणारा कोणत्या पक्षाचा आहे, हे दादा पाहत नाही.

राजकीय जीवनात केवळ आपणच यशाची शिखरे चढायची हा दादांचा स्वभाव नाही. आपल्यासोबतचे कार्यकर्तेही मोठे झाले पाहिजे, असा दादांचा नेहमी दृष्टिकोन राहिला आहे. त्यामुळेच पक्षकार्यात सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते सध्याच्या काळात मोठ्या पदांवर दादांनी विराजमान केले आहेत. धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांवर दादांनी कधी अन्याय केला नाही. त्यांनी अनेकांना वेगवेगळ्या स्तरांवर संधी उपलब्ध करून दिल्या.

राजकीय जीवनात काम करणाऱया जुन्या जाणत्यांकडून बाळकडू घेणाऱ्यांना दादांनी कायम सन्मानाची वागणूक दिली. त्याचबरोबर नव्या पिढीला योग्य दिशा देण्याचे काम दादांनी केले. त्यांचा स्पष्टवक्तेपणा हा त्यांना कायम फायदेशीर ठरला. जे योग्य आणि सत्य आहे, त्याची कास दादा सोडत नाही.

मग त्याच्या परिणामाच्या विचाराला दादा दुय्यम स्थान देतात. दादांकडून आलेले काम प्रशासनाच्या पातळीवर त्याच पद्धतीने पुढे सरकते. त्याचे कारण ते वेळेत झाले नाही तर दादांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी अधिकाऱ्यांना करावीच लागते. परिणामी दादांकडून आलेल्या कामांना गती दिली जाते. अधिकाऱ्यांनाही एक गोष्ट माहीत आहे की, दादांनी सांगितलेले काम म्हणजे नियमातच असणार. दादा कधीही नियमबाह्य काम सांगणार नाही, हा त्यांच्याबद्दल अधिकाऱ्याना असलेला विश्वास त्यांच्यातील आदर अधोरेखीत करतो.

दादा ज्या गोष्टीत लक्ष घालतात. त्याचा कायापालट केल्याशिवाय राहत नाही. मर्यादित कामे करावी पण तिच्या गुणवत्तेत कुठेही हयगय दादांकडून केली जात नाही. त्यामुळे त्यांनी हातात घेतलेले कोणतेही काम गुणवत्तापूर्णच असते. क्षेत्र कोणतेही असो, त्यातील सखोल माहिती, त्यांचे नियम याचा सारासार विचार करून ती कामे पू्र्ण करण्याचा प्रयत्न करतात. कोणतेही काम ते कोणाला बायपास करून करीत नाही. त्याच्या अखत्यारित संबंधित काम नसेल तर ते संबंधित मंत्र्यांशी संवाद साधून ते पूर्ण करण्यासाठी संबंधितांची मदत घेतात. पण ते काम पुर्णत्वास नेतात, हा दादांचा गुण वाखण्यासारखा आहे.

२२ जुलै हा दादांचा वाढदिवस. दादांवर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते विविध उपक्रमांमधून त्यांचा वाढदिवस साजरा करतात. धडाडीचे नेतृत्व म्हणून उभ्या महाराष्ट्राला दादांची ओळख आहे. केवळ बारामती, पिंपरी-चिंचवड नव्हे तर राज्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी दादा नेहमी पुढाकार घेतात.

आधिकाधिक विकासाची कामे करण्यासाठी दादांची धडपड असते. माझा विचार केला तर माझ्या विकासात दादांचा सिंहाचा वाटा आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पिंपरी-चिंचवड शहराचा नगरसेवक म्हणून मी २००२ मध्ये निवडून आलो. तेव्हा दादांनी मला, राहुल कलाटे, पोपट जम, राजू लोखंडे राष्टवादीची उमेदवारी दिली. नव्या दमाच्या मुले निवडून आली पाहिजे, असा दादांचा आग्रह होता. अर्थांत तेव्हा दादाही चाळीशीत म्हणजे तरुणच होते. तेव्हा शहरातील रथी-महारथी निवडणूक रिंगणात होते. म्हणून दादांनी त्यांच्या विरोधात आम्हा तरुणांना रिंगणात उतरवले होते. दादांनी जीवाचे रान केले. त्यांनी महापालिका निवडणुकीची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. दादा म्हटले की कार्यकर्त्यांचा फौजफाटा आलाच.

राष्ट्रवादी कॅाग्रेस स्थापनेपूर्वी दादांनी युवक कॅंाग्रेसमध्ये असताना तरुण कार्यकर्त्यांची महाराष्ट्रात एक फळी तयार केली होती. ती कायम दादांसोबत राहिली. त्यामुळेच राष्ट्रवादीत आल्यानंतरही तोच कार्यकर्त्यांचा गराडा दादांभोवती कायम राहिला. मी गेल्या वीस वर्षापासून दादांबरोबर काम करीत आहे. तेव्हा मला विशेष वाटायचे की इतका मोठा माणूस पण सकाळी सहाला काम सुरू करतो, मी दादांना सकाळी साडेसहा वाजता भेटायला सर्किटहाऊसला अनेकदा गेलो. तेव्हा पुणे जिल्ह्यातून तसेच राज्यातील अधिकारी दादांना भेटताना दिसतात. तेच चित्र आजही २०२० मध्ये आहे.दादांचा टापटीपपणा, आवाजातला भारदस्तपणा, स्वच्छतेतील चूक हेरण्याची नजर, चुकणाऱ्याला जागेवरच समज देणे. हो किंवा नाही जागेवरच निर्णय स्पष्टवक्तेपणा या सर्व गोष्टी आजही तशाच आहेत. दादांचा वक्तशीरपणाचे अनेक किस्से सर्वश्रृत आहेत. त्यामुळेच दादांबद्दल आदरयुक्त दरारा संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतो.

सन २०११ माझ्यावर खुनाच्या आरोपात खोटे गंभीर आरोप झाले होते. तेव्हा अजितदादांनी रत्नागिरींमधून मीडियाला जाहीरपणे प्रशांत असा कार्यकर्ता नाही, असे सांगितले होते. तो खुनासारख्या आरोपात असूच शकत नाही, अशी भूमिका मांडली होती, हे साऱ्या महाराष्ट्राने पाहिले होते. म्हणजे दादा सच्या कार्यकर्त्यांबरोबर नेहमी ठामपणे उभे राहतात. त्याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतला. त्यामुळेच न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केली व आजही त्याचा प्रत्यय कार्यकर्ते, नागरिकांनाही येत आहे. कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा स्वभाव असल्याने त्यांना खोटेपणा चालत नाही, हेच मला अनुभवायला मिळाले. कार्यकर्ते हीच दादांची ताकद आहे, त्यामुळे त्यांना संभाळण्याला दादा कायम प्राधान्य देतात.

पिंपरी-चिंचवड शहराचा विकास दादांनी झपाट्याने केला. यात नाशिक फाटा पूल, भूमकर चौक, वाकड रस्ता, सायन्स पार्क, ॲटोक्लस्टर, दापोडी निगडी रस्ता, बर्ड व्हॅली, अप्पूघर, अण्णाभाऊ साठे पुतळा, भक्ती शक्ती, भोसरी प्रकल्पांचा समावेश आहे. सकाळी सात वाजता अचानक पाहणी केल्यानंतर आयुक्त व अधिकाऱ्यांची होणारी तारांबळ मी पाहिली आहे. दादांनी मॉडेल वॉर्ड संकल्पना २००६ मध्ये मांडली. तेव्हा आयुक्त दिलीप बंड हे होते. पिंपरी-चिंचवडचा सांगवीतील पहिला मॉडेल वॉर्ड ही संकल्पना मी राबवत असताना त्या कामाचे भूमिपूजन सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी दादांनी केले होते. ते रस्ते अद्याप दुरुस्त करावे लागले नाहीत. मॉडेल वॉर्ड करताना कामातील दर्जाला सर्वांधिक माहिती देणारे दादाही मी अनुभवले. सांगवीतील शिवसृष्टी उद्यानाचे उद्‌घाटन करताना सांगवीतील उमेश ठाकर यांनी केलेल्या कलाकृतींना मनापासून दाद दिली. त्याच्या उद्‌घाटनावेळी फुलांच्या रांगोळी वर पाय पडू नये म्हणून ओरडणारे व फुलांवर वृक्षवेलीवर प्रेम करणारे दादा ही मी पाहिले आहेत. सांगवी भागात मुळा नदीच्या बाजूने ड्रेनेज लाईन व्यवस्था नव्हती. त्या व्यवस्थेसाठी मुळानगर येथे केलेल्या पंपहाउसच्या छोट्या कार्यक्रमाच्या उद्‌घाटनाला येणारे दादाही माझ्यासह सांगवीकरांनी पाहिले आहेत.

सांगवीतील मधूबन येथील उद्यानाला ढोरे परिवारातून त्यांच्या कुटुंबीयांचे नाव देण्याची मागणी होती. दादांना हा प्रश्नही ढोरे कुटुंबीयांना कुठेही कमीपणा होणार नाही. याची काळजी घेत आपल्या नावाचा यथायोग्य सन्मान होईल, असे ढोरे कुटुंबीयांना आश्वासन दिले. सांगवी फाटा येथील पुणे व पिंपरी चिंचवड शहराचे प्रवेशद्वार असलेल्या महात्मा जोतिबा फुले उड्डाणपुलाशेजारील सबवेला ढोरे पाटील सबवे असे नाव देणारे दादा आम्ही पाहिले. गावकी भावकीचे राजकारण करू नका, हाच संदेश आमच्याही अनुभवाला आला आहे.

नानासाहेब शितोळे यांच्या घरी यापूर्वी अनेक वेळा शरद पवारसाहेब व दादा येत असत. तेव्हा आम्ही शाळा कॉलेजला जात होतो. त्यामुळे सांगवीला साहेब व दादा कायम भेटायचे. दादांची स्वच्छता व खाण्यापिण्याची आवड टापटीपपणा आदर्शवत आहे. स्वतःच्या घरातही कागदाचा तुकडा दिसला तरी तो स्वतः उचलणारे दादा, सोफ्यावरील सेटिंग चुकीची असेल तर ओरडणारे, उशिर झाला तर सर्व कार्यकर्त्यांना जेवण घालणारे दादा मला पाहता आले. कोणत्याही कामाचे नियोजन समजून घेऊन जागेवरच निर्णय घेणारे दादा मी अनुभवत आहे. विकासाच्या दृष्टीने दादांचा हात कोणीच धरू शकणार नाही. विकास म्हणजे काय हा प्रश्न पडला असेल तर सध्याचे पिंपरी-चिंचवड शहर पाहावे. लोककल्याणासाठी सातत्याने जिवाचे रान करणाऱ्या दादांना परमेश्वराने उदंड आयुष्य द्यावे हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com