विमानातून उतरताच मोदींनी ठेवला अजित पवारांच्या खांद्यावर हात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NARENDRA MODI WITH AJIT PAWAR

विमानातून उतरताच मोदींनी ठेवला अजित पवारांच्या खांद्यावर हात!

पिंपरी : श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहूत पोहोचले आहेत. लोकार्पणानंतर माळवाडीत त्यांची संवाद सभा होईल. दरम्यान श्री संत तुकाराम महाराज संस्थान व प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे. ठिकठिकाणी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षा करून पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आलं.

मोदी यांचे पुण्यात विमानतळावर आगमन झाल्यानंतर पालकमंत्री अजित पवार त्यांच्या स्वागतासाठी गेले. यावेळी विमानातून बाहेर पडताच मोदींनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवला. यावेळी पवारांनी त्यांना हात जोडून नमस्कार केला.

या कार्यक्रमाची महिनाभरापासून तयारी सुरु आहे. संवाद सभेसाठी राज्यासह देशाच्या विविध भागातून भाविक येणार आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. पावलोपावली खडा पहारा दिसून येत आहे. परिसरातील वाहतूक मार्गातही बदल केले आहेत. मुख्य देऊळवाड्याला फुलांची सजावट करण्यात आलीय. मुख्य मंदिरात आगमन होताना चारशे वारकरी त्यांच्या स्वागताला उपस्थित होते.

येथे उपस्थित राहणाऱ्या वारकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. सर्वत्र दौऱ्याची लगबग असून देहूवासियांमध्येही उत्साह आहे.संवाद सभेसाठी मोठ्या प्रमाणात भाविक हजर आहेत. येथे सुरक्षिततेच्या दृष्टीने सभास्थळी पर्स, बॅग, रिमोट चावी, पाणी बाटली, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पॉवर बँक आदी वस्तू नेण्यास परवानगी नाही. रंगीत तालीम झेंडेमळा येथे हेलिपॅड केले असून तेथून मोटारीने पंतप्रधान देहूतील मुख्य मंदिरात जाणार आहेत. लोकार्पण कार्यक्रमानंतर सभास्थळी येतील. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या ताफ्याची सोमवारी रंगीत तालीम घेण्यात आली.

असे आहे शिळा मंदिर

तुकोबारायांचा अभंग गाथा इंद्रायणी नदीत बुडविल्यानंतर नदीकाठच्या दगडी शिळेवर बसून तुकोबारायांनी १३ दिवस अनुष्ठान केले. ही शिळा मुख्य देऊळवाड्यात आहे. या शिळा मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. नव्याने बांधलेले शिळा मंदिर संपूर्ण दगडात आहे. मंदिराला दोन सुवर्ण कळस आहेत. मुख्य गाभारा, मंडप यासह मंदिराच्या चार कोपऱ्यावर चार कळस आहेत. तुकोबारायांची नवीन मूर्ती बनविण्यात आली आहे.

असा असेल दौरा

दुपारी १.१५ - पुणे विमानतळावरून देहू हेलिपॅडकडे प्रयाण

१.३५ - देहू हेलिपॅड येथे आगमन

१.४० - श्री संत तुकाराम महाराज मंदिराकडे मोटारीने प्रयाण

१.४५ - मंदिर लोकार्पण व संवाद सभा

३.०५ - हेलिपॅडकडे प्रयाण

Web Title: Prime Minister Narendra Modi Visit Dehu Shila Temple Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top