आरटीओमध्ये काम करण्यासाठी लाच घेताना खासगी एजंटला अटक

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 January 2021

फिर्यादी यांना त्यांच्या मित्राची गाडी पिंपरी चिंचवड आरटीओकडून पुणे आरटीओकडे ट्रान्सफर करायची आहे. त्यासाठी त्यांना पिंपरी- चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयातून ना हरकत प्रमाणपत्राची आवश्‍यकता होती.

पिंपरी : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) कामे करून देण्यासाठी एक हजार 300 रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी एका खासगी एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा लावून अटक केली. ही कारवाई मोशी प्राधिकरणातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर करण्यात आली. 

अक्षय मारूती माळवे (वय 24, रा. गंगानगर, आकुर्डी, मूळ-सातारा) असे अटक केलेल्या खासगी एजंटचे नाव आहे. याप्रकरणी नीलेश वसंत माटे (रा. वैष्णवी अपार्टमेंट, वारजे माळवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांना त्यांच्या मित्राची गाडी पिंपरी चिंचवड आरटीओकडून पुणे आरटीओकडे ट्रान्सफर करायची आहे. त्यासाठी त्यांना पिंपरी- चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयातून ना हरकत प्रमाणपत्राची आवश्‍यकता होती. दरम्यान, आरोपी अक्षय याने प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी खर्च येईल असे सांगत त्यांच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्यांच्यात तडजोड होऊन एक हजार 300 रुपये देण्याचे ठरले.

दरम्यान, याविरोधात तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क करून माहिती दिली. त्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता.11) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील रस्त्यावर सापळा रचून अक्षय याला एक हजार 300 रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private agent arrested while taking Bribe for doing work in RTO