पिंपरी-चिंचवडमध्ये खासगी रुग्णालयांकडून मिळतेय वाईट वागणूक; 'सकाळ'च्या पाहणीत वास्तव उघड

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

  • 'सकाळ'च्या पाहणीतील वास्तव 

पिंपरी  : 'आमच्याकडे ऑक्‍सिजन बेड नाही, साधा बेड उपलब्ध आहे', 'तुम्ही ज्यांच्याकडे तपासणी केली, त्या डॉक्‍टरांना फोन करायला सांगा', 'आम्ही स्वॅब घेत नाही, पण, एका लॅबशी आमचे टायअप आहे. तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा', 'आमच्याकडे स्वॅब घेण्याची सुविधा नाही, हे फक्त क्वारंटाइन सेंटर आहे. तुम्ही तालेरा किंवा थेरगाव हॉस्पिटलला जा. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर तेच पेशंटला आमच्याकडे पाठवतील,' ही आहेत शहरातील काही रुग्णालये व कोविड केअर सेंटरकडून मिळालेली उत्तरे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात कोरोना संसर्ग वाढत आहे. पुणे, मावळ, मुळशी, राजगुरुनगर, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्‍यांसह अन्य जिल्ह्यातील रुग्णही उपचारासाठी येत आहेत. त्यात गंभीर रुग्ण आहेत. ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. खासगी रुग्णालयांकडून अधिक रक्कम आकारली जात आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची काळ्या बाजारात विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर 'सकाळ'ने महापालिकेसह खासगी रुग्णालये व क्‍वारंटाइन सेंटरमध्ये रुग्ण व नातेवाइकांना कशी वागणूक दिली जाते, यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

महापालिकेने स्वतःच्या दोन रुग्णालयांसह तीन जम्बो फॅसिलिटी, एक सरकारी व 41 खासगी रुग्णालये आणि 19 क्‍वारंटाइन सेंटर; तेथील डॉक्‍टर, नर्स, कर्मचारी; त्यांचे संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत. त्यांतील काही रुग्णालयांशी संपर्क साधला. महापालिकेचे भोसरी रुग्णालय व घरकूल कोविड केअर सेंटरचा फोन बंद लागला. बालेवाडी कोविड केअर सेंटर व प्राधिकरणातील खासगी रुग्णालयातील फोन रिसिव्ह केला नाही. एका खासगी रुग्णालयाचा रॉंग नंबर लागला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रुग्णालयातून मिळालेली उत्तरे :
(रुग्णाचा नातेवाईक, शेजारी म्हणून चौकशी केली) 

- वाकड खासगी रुग्णालय 
"आमच्याकडे ऑक्‍सिजन बेड शिल्लक नाही. साधा बेड उपलब्ध आहे. पण, तुम्ही अगोदर घराजवळच्या डॉक्‍टरांना दाखवा. ते पेशंटची ऑक्‍सिजन लेव्हल तपासतील. त्यानुसार पेशंटला ऑक्‍सिजन बेड हवा की व्हेंटिलेटर बेड हवा हे ठरवा.'' 

- कृष्णानगर खासगी रुग्णालय 
"आमच्याकडे स्वॅबची सुविधा नाही. पण, चिंचवड स्टेशन येथील लॅबशी आमचे टायप आहे. त्या मॅडम घरी येऊनही तपासतील. आमच्या हॉस्पिटलला तपासले तर दोन हजार रुपये खर्च येतो. त्यांचे घरी येऊन तपासण्याचे चार्जेस मला माहित नाही. तुम्ही त्यांच्याशीच बोलून घ्या. त्यांचा नंबर तुम्हाला शेअर करतो.'' (एसएमएसद्वारे लॅबच्या डॉक्‍टरांचा नंबर मिळाला.) 

- जम्बो हॉस्पिटल, नेहरूनगर 
"आमच्याकडे ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटर बेड आहेत. पण, तुमचा पेशंट ऑक्‍सिजनवर आहे की व्हेंटिलेटरवर आहे. एक काम करा. तुम्हाला आमच्या डॉक्‍टरांचा नंबर देतो. त्यांच्याशी तुमच्या डॉक्‍टरांना बोलायला सांगा. त्यानुसार कोणता बेड हवा, हे ठरवता येईल.'' (क्षणात संबंधित डॉक्‍टरांचा नंबर एसएमएसद्वारे मिळाला.) 

- बालाजी कॉलेज, कोविड केअर सेंटर, ताथवडे 
"आमच्याकडे स्वॅब घेतले जात नाहीत. हे क्वारंटाइन सेंटर आहे. तुम्ही थेरगाव किंवा चिंचवडच्या तालेरा हॉस्पिटला पेशंट घेऊन जा. तिथे स्वॅब घेऊन तपासणी करतील. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला की तेच आमच्याकडे पेशंट पाठवतील. बेड आहेत. काही काळजी करू नका.'' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: private hospitals gives bad treatment for covid 19 in pimpri chinchwad