इंग्लंडहून आलेल्या तिघांचे स्ट्रेन रिपोर्ट पॉझिटीव्ह; पुणे शहरात 146 नवीन रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 January 2021

इंग्लंडहून आलेले व मुंबई विमानतळावर उतरलेल्या शहरातील 268 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे.

पिंपरी, ता. 7 : इंग्लंडहून आलेले शहरातील सात जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यांचे रिपोर्ट "इंग्लंड स्ट्रेन' तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले असून तीन निगेटीव्ह आहेत. एक रिपोर्ट प्रतीक्षेत आहे. 
इंग्लंडहून आलेले व मुंबई विमानतळावर उतरलेल्या शहरातील 268 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 188 प्रवाशांची तपासणी केली असून 181 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. एकूण सात जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. 50 प्रवाशी बाहेरगावी गेले आहेत. निगेटीव्ह आढळलेल्या सात जणांचे नमुने स्ट्रेन तपासणी (नवीन कोरोना) अर्थात जिनोम सिक्केसिंगसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्यातील तिघांचा रिपोर्ट दोन दिवसांपूर्वीच आला होता. चार जणांचे रिपोर्ट प्रलंबित होते. त्यातील तीन आज महापालिकेला प्राप्त झाले आहेत. याबाबत अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे म्हणाले, "युके स्ट्रेन पॉझिटीव्ह आढळलेल्या तिघांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चांगली असून लक्षणे आढळलेले नाहीत. चौदा दिवस त्यांना निरीक्षणाखाली ठेवले जाणार आहे.'' 

दरम्यान, शहरात गुरुवारी 146 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या 97 हजार 442 झाली आहे. आज 91 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 93 हजार 997 झाली आहे. सध्या एक हजार 678 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील एक हजार 767 आणि बाहेरील 735 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या महापालिका रुग्णालयांत 639 रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार 39 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील 774 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील दोन हजार 799 जणांची तपासणी केली. 818 जणांचे आज विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 92 हजार 635 जणांचे विलगीकरण केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune New corona strain update 3 affected by new strain in pune