esakal | दोघेही पुण्याचे लढवय्ये; एक 80 वर्षांचा तर दुसरा 30 वर्षांचा, दोघेही जिंकले
sakal

बोलून बातमी शोधा

दोघेही पुण्याचे लढवय्ये; एक 80 वर्षांचा तर दुसरा 30 वर्षांचा, दोघेही जिंकले
  • इच्छाशक्ती अन् डॉक्टरांच्या प्रयत्नांचा विजय
  • पुण्यातील 80 वर्षीय आजोबांनी कोरोनाला हरविले
  • आयसीयूत उपचार घेतलेले 80 वर्षीय आजोबा आणि 30 वर्षांच्या तरुणाने कोरोनाला हरविले

दोघेही पुण्याचे लढवय्ये; एक 80 वर्षांचा तर दुसरा 30 वर्षांचा, दोघेही जिंकले

sakal_logo
By
पीतांबर लोहार

पिंपरी : ते दोघे पुणे स्टेशन परिसरातील रहिवासी. पण, एकमेकांशी ओळख नाही. एकाचे वय 80 आणि दुसऱ्याचे अवघे 30. एकाकडे कुटुंबातील ज्येष्ठत्व तर, दुसऱ्यावर कुटुंबांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी. म्हणून त्याने पुणे स्टेशन परिसरात हातगाडी लावून फळे विक्रीचा व्यवसाय सुरू केला. मात्र, एक दिवस त्याला कोरोनाने गाठला आणि पॉझिटिव्ह केला. मित्राच्या ओळखीने तो पुणे सोडून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाला होता. तर, आजोबा नातेवाइकांकडे चिंचवडला आले होते. तेथून ते दिघी परिसरात राहणाऱ्या नातलगाकडेही गेले होते. परंतु, एक दिवस त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. ताप भरला. नातेवाइकांनी वायसीएममध्ये दाखल केले. तपासणी केली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

योगायोगाने पुण्याच्या एकाच परिसरात राहणारे पण, एकाच दिवशी पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालयांत दाखल झालेले हे दोघे. दोघांचीही प्रकृती चिंताजनक झाली. डॉक्टरांनी आयसीयूमध्ये हलविले. ऑक्सिजनची व्यवस्था केली. उपचार सुरू झाले. बघता बघता चौदा दिवस संपले. दोघांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठवले. रिपोर्ट आला निगेटिव्ह आणि डॉक्टरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्यांच्या अथक परिश्रमांना यश आले होते. कारण, 80 वर्षांच्या आजोबांनी कोरोनावर मात केली. आणि ३० वर्षांचा युवकही ठणठणीत बरा झाला. त्यामुळे दोघांना आज (शुक्रवार, ता. 16) डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी वायसीएमचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे व मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. प्रविण सोनी उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

14 दिवस होम क्वारंनटाइन

''दोन्ही रुग्णांची स्थिती खालावलेली असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तथापि डॉक्टरांनी केलेले योग्य उपचार व परिश्रमाने त्यांना बरे करण्यात यश आले. १४ दिवस उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मात्र, १४ दिवस होम क्वारंटाइन होण्याच्या सूचना देण्यात आल्या," असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

...हे होते कोरोना योद्धा

पुण्यातील रहिवासी मात्र, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल 80 व 30 वर्षांच्या रुग्णांवर डॉ. किशोर खिल्लारे, डॉ. अनिकेत लाठी, डॉ. स्मिता पानसे, डॉ. कौस्तुभ कहाने, डॉ. अभयचंद्र दादेवार , डॉ. अक्षय शेवाळे, डॉ. वालिद , परिचारिका मेघा  सुर्वे, संगीता पाटील आदींनी उपचार केले.

loading image