नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्रकारांचे प्रश्न दिल्ली येथे मांडणार - रामदास आठवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdas Athawale

नरेंद्र मोदी यांना पत्रकारांनीही गुजरात येथून दिल्ली येथे पाठविले. पत्रकारांनी मोदींना मोठा पाठींबा दिला. मलाही दिल्ली माहीत नव्हती, मला दिल्लीपर्यंत पोहोचविण्यात पत्रकारांचा मोठा हात आहे.

Pimpri News : नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्रकारांचे प्रश्न दिल्ली येथे मांडणार - रामदास आठवले

पिंपरी - नरेंद्र मोदी यांना पत्रकारांनीही गुजरात येथून दिल्ली येथे पाठविले. पत्रकारांनी मोदींना मोठा पाठींबा दिला. मलाही दिल्ली माहीत नव्हती, मला दिल्लीपर्यंत पोहोचविण्यात पत्रकारांचा मोठा हात आहे. त्यामुळे पत्रकारांचे प्रश्न मोदिंसमोर मी मांडेन, असे आश्वासन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पिंपरी- चिंचवड येथील कार्यक्रमात शनिवारी (ता. १९) दिले.

आठवले म्हणाले की, कायदा झाला तरी अत्याचार होतात. अजूनही दलितांवर अत्याचार होतात. त्यामुळे केवळ कायदे करून चालणार नाही. कायद्याची अंमलबजावणी आवश्यक आहे. कोरोना काळात शासनाने अनेक घटनांना मदत जाहीर केली. तशी पत्रकारांसाठी देखील मदत उपलब्ध होणे आवश्यक आहे. नरेंद्र मोदी हे लोकप्रिय पंतप्रधान आहेत. पत्रकारांनी त्यांना नेहमीच मदत केली आहे. त्यामुळे पत्रकारांच्या समस्या, अडचणी मोदींना माहिती आहेत. त्यामुळे मोदी हे पत्रकारांचे प्रश्न सोडवतील. त्यासाठी मी स्वतः यांना बोलणार आहे.

अमेरिकेतही आरपीआय पार्टी स्थापन करणार

नेपाळमध्ये रिपब्लिकन स्थापन केली आहे. रिपिब्लकन पार्टी अमेरिकेत आहे. तरीही अमेरिकेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या आमच्या पक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच जगभरातील देशांमध्ये पार्टी नेणार आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे सरकार बदलण्यात 'पटाईत'

सध्याचे राज्य सरकार हे पडणार असल्याच्या अफवा पसरवली जात आहे. मात्र हे सरकार जाणार नाही, जाणार असते तर ते कशाला आले असते? हे सरकार यापुढेही २० वर्षे राहणार आहे. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे सरकार बदलण्यात पटाईत आहेत. सगळ्यांना सत्ता मिळत नाही. तशी मंत्रीपदीही सर्वांना संधी मिळत नाही. मात्र, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की, मंत्रीपदी संधी न मिळालेल्या आमदारांमध्ये नाराजी होऊन हे सरकार पडेल, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र सरकार पडणार नाही, असे रामदास आठवले यांनी ठामपणे सांगितले.