एकीकडं पावसामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं, तर मोशीत शेतकऱ्यांना ही चिंता सतावतेय

श्रावण जाधव
मंगळवार, 7 जुलै 2020

- मोशी परिसरामध्ये मंगळवारी (ता. 7) सकाळी 11 पासूनच पावसाला सुरुवात झाली.

मोशी : नव्याने होत असलेली भात लागवड, लावलेले सोयाबीन, ज्वारी, बाजरी या पिकाच्या वाढीसाठी उत्तम असलेला, तर मेथी, शेपू, पालक, कोथिंबीर या पालेभाज्या, टोमॅटो, वांगी, सिमला या फळभाज्या व पपई, टरबूज, कलिंगड या फळशेती पिकांसाठी अपायकारक असलेल्या  मुसळधार पावसाला मोशी परिसरामध्ये मंगळवारी (ता. 7) सकाळी 11 पासूनच सुरुवात झाली. सतत तीन तास म्हणजेच दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु असलेल्या या पावसाने संपूर्ण उपनगर परिसरात पाणीच पाणी झाले. नेहमीप्रमाणे सात जूनला पावसाळा सुरू झाला. मात्र, आषाढ महिना लागूनही किरकोळ दोन वेळा झालेला पाऊस वगळला, तर अपेक्षित प्रमाणात पावसाने सुरुवात केली नव्हती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

गेल्या चार-पाच दिवसांपासून मावळ, मुंबई परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. याच परिसराकडून आलेल्या या पावसामुळे मंगळवारी मोशी, चिखली, डुडुळगाव आदी परिसरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मोशी, चिखली, डुडुळगाव या शेतीप्रधान गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये समावेश झाला आणि तेव्हापासून या परिसरामध्ये विकासाच्या नावाखाली बांधकाम क्षेत्राने जोर धरला. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी बांधकाम व्यवसायिकांना दिल्या, तर काही शेतकऱ्यांनी स्वतः बांधकाम व्यावसायामध्ये उतरत आपापल्या जागेत गगनचुंबी इमारती उभ्या केल्या. त्यातच मोशी प्राधिकरण यासारख्या परिसरामध्येही काही शेतकऱ्यांच्या जमिनी प्राधिकरणाने हस्तांतरित केल्या. त्यामुळेही काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी हातातून गेल्या. 

हेही वाचा- Video : कोरोनाचा कहर तरी, शरद पवारांनी कार्यकर्त्याला श्रद्धांजली द्यायला गाठलं त्याचं घर, वाचा सविस्तर

मोशी प्राधिकरण, मोशी-देहू, मोशी-आळंदी या बीआरटी रस्त्यालगत असलेल्या शेत जमिनींवर मोठ्या संख्येने इमारती उभ्या राहिल्या. एकीकडे शहरासह मोशी उपनगरात होणारी सुंदर बांधकाम यामुळे मोशी उपनगराला कृत्रिम सौंदर्य प्राप्त झाले आहे. मात्र, काही शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी आजही व विकता किंवा विकासकांना विकसित करण्यासाठी न देता टिकून ठेवले आहेत. आजही कुटुंबासह आपला शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याचे दाखवून देत मेथी, शेपू, पालक, कोथिंबीर यासारख्या पालेभाज्या, कांदा, टोमॅटो वांगी, कोबी, फ्लॉवर यांसारख्या फळभाज्या; भात, ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन यांसारखी धान्य शेती, तर काही प्रगतीशील शेतकऱ्यांनी डाळिंब, पपई, टरबूज, कलिंगड, केळी यांसारख्या फळशेतीही मोठ्या प्रमाणावर करण्यावर भर दिला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
      
परिणामी आजही शेतीप्रधान असलेल्या मोशी उपनगरामध्ये सध्या पन्नास टक्क्यांहून अधिक शेतकरी वडिलोपार्जित शेती हाच व्यवसाय करत आहेत. इंद्रायणी नदीच्या तीरावर असलेल्या शेतकऱ्यांना नदीमधील पाण्यापासून तर काही शेतकऱ्यांना शेती परिसरामध्ये असलेल्या विहिरींमधून शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो, तर काही शेतकरी पावसाच्या पाण्यावर आपली शेती करत असतात. म्हणूनच या पावसाळ्यामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू झालेल्या पावसाचा भात लागवड करण्यासाठी तसेच, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका यांसारख्या पिकासाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे. पूर्ण वाढ झालेल्या पालेभाज्या, काही फळभाज्या आणि फळ शेतीसाठी मात्र, नुकसानीचा ठरणार आहे. मृग नक्षत्रामध्ये म्हणजेच जून महिन्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन, ज्वारी, बाजरी, यांसारखी पिकांची पेरणी केलेली आहेत आणि ही पिके निम्म्याहून अधिक उगवून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या इथून पुढे होणाऱ्या वाढीसाठी हा पाऊस फायद्याचा आहे. गायकवाड खोरा, डुडुळगाव आदी ठिकाणी दरवर्षीप्रमाणे करत असलेल्या भातशेतीच्या पेरणीसाठी हा पाऊस वरदान ठरत आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 
सकाळी अकरा पासूनच सोसाट्याच्या वाऱ्यासह मोशी गावठाण, मोशी-देहू, मोशी-आळंदी बीआरटी रस्ता, पुणे-नाशिक महामार्ग, स्पाईन रस्ता, मोशी प्राधिकरणातील पेठ क्रमांक 4, 6, 9 मधील अंतर्गत रस्त्यांवर अचानक आलेल्या या जोरदार पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. अंतर्गत रस्त्यांवरील सखल भागांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना आपल्या साचलेल्या या पाण्यामधून आपल्या वाहनांना वाट करून द्यावी लागत आहे. मात्र, काही पाऊसप्रेमी नागरिकांनी समाधानही व्यक्त केले आहे. 

पूर्ण वाढ होऊन आलेल्या पालेभाज्या, फळभाज्या, फळशेती यांसाठी हा पाऊस काही प्रमाणात नुकसानीचा ठरणार आहे, तर भात लागवड करणे आणि निम्म्याहून अधिक वाढ झालेल्या सोयाबीन, ज्वारी, बाजरी या पिकांसाठी हा पाऊस फायदेशीर आहे. 
- रवी बोऱ्हाडे, प्रगतीशील शेतकरी/ राजू आल्हाट, कृषीमित्र, मोशी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raining in moshi area from eleven o'clock in the morning