पिंपरी-चिंचवडला ऑक्सिजन प्लान्ट ठरताहेत संजीवनी

गेल्या वर्षीपर्यंत महापालिकेसह खाजगी रुग्णालये खासगी कंपन्यांकडून ऑक्सिजन विकत घेत होते.
Oxygen Plant
Oxygen PlantSakal
Summary

गेल्या वर्षीपर्यंत महापालिकेसह खाजगी रुग्णालये खासगी कंपन्यांकडून ऑक्सिजन विकत घेत होते.

पिंपरी - गेल्या वर्षीचा मार्च, एप्रिल व मे महिना सर्वांसाठीच धोकादायक वाटत होता. कोरोना संसर्गामुळे (Corona Infection) अत्यवस्थ रुग्णांची (Patient) संख्या वाढत होती. बेड (Bed) मिळत नव्हते. ऑक्सिजनचा (Oxygen) तुटवडा होता. त्यावेळी तातडीने उपाययोजना करीत महापालिकेने (Municipal) स्वतःचेच चार मेडिकल ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प (Oxygen Production Project) उभारले. तेच आज व उद्या शहरासाठी संजीवनी ठरणार आहेत. ऑक्सिजनच्या बाबतीत महापालिकेची रुग्णालये स्वयंपूर्ण झाली आहेत.

गेल्या वर्षीपर्यंत महापालिकेसह खाजगी रुग्णालये खासगी कंपन्यांकडून ऑक्सिजन विकत घेत होते. शहरात केवळ वायसीएम रुग्णालयाच्या आवारात एकच युनिट होते. त्याची क्षमताही केवळ वायसीएम इतकीच मर्यादीत होती. कोरोना काळात खाजगी संस्थांच्या मदतीने नेहरूनगर येथील मगर स्टेडियमच्या मैदानावर व चिंचवड येथील ऑटोक्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये जम्बो रुग्णालये उभारली होती. त्यांची बेड क्षमता अनुक्रमे आठशे व दोनशे होती. मगर स्टेडियम जम्बोसाठी संबंधित संस्थेनेच ऑक्सिजन प्लॅंट उभारला होता. आता तो त्यांनी काढून नेला आहे. ऑटो क्लस्टरसाठी महापालिकेने प्लान्ट उभारला होता. तो आता महापालिकेल्या अन्य रुग्णालयांच्या आवारात स्थलांतरीत केला जाणार आहे. शिवाय, गेल्या दोन वर्षात महापालिकेचे पिंपरीतील नवीन जिजामाता, नवीन थेरगाव, नवीन भोसरी आणि आकुर्डीतील कुटे अशी चार नवीन रुग्णालये कार्यान्वित झाली. तिथेही कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यांच्यासाठी महापालिकेने स्वतः स्वतंत्र ऑक्सिजन प्लॅंट उभारले आहेत. आता रुग्णालयांमध्ये कोरोनाचे रुग्ण नाहीत. सर्व रुग्णालयांच सर्वसामान्य रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत. या चारही रुग्णालयांत आयसीयू व व्हेंटिलेटर बेडस् आहेत. त्यांच्यासाठी ऑक्सिजन प्लान्ट उपयुक्त ठरत आहेत.

प्लान्टची क्षमता

भोसरी, जिजामाता व आकुर्डी रुग्णालयांतील ऑक्सिजन निर्मिती क्षमता ९६० एलपीएम अर्थात लिटर प्रतिमिनिट आहे. तर, थेरगाव रुग्णालयातील प्लान्टची क्षमता १०५० एलपीएम आहे. या चारही रुग्णालयांच्या माध्यमातून निर्माण होणारा ऑक्सिजन सुमारे ४५० ऑक्सिजन बेड आणि ५० व्हेंटीलेटर बेडला पुरवला जाऊ शकतो.

प्लान्टचा खर्च

थेरगाव, भोसरी, जीजामाता आणि आकुर्डी रुग्णालयांतील ‘मेडिकल ऑक्सिजन जनरेटींग प्लान्ट’ थेट पद्धतीने खरेदी केले आहेत. थेरगावच्या एका युनिटसाठी एक कोटी ९० लाख रुपये अधिक जीएसटी आणि भोसरी, आकर्डी व जीजामाता रुग्णालयांतील प्रत्येकी एक युनिटसाठी एक कोटी ४० लाख रुपये अधिक जीएसटी इतका खर्च आला आहे.

अशासाठी मेडिकल ऑक्सिजन

रुग्णालयांत वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिजनला ‘मेडिकल ऑक्सिजन’ म्हणतात. वेगवेगळ्या वैद्यकीय उपचारसाठी हा ऑक्सिजन वापरतात. श्वसनक्रिया, ह्रदयाचा झटका, शॉक, कार्बन मोनोऑक्साइडची विषबाधा आणि गंभीर रक्तस्त्राव अशा रुग्णांसाठी ऑक्सिजन वापरला जातो. त्यामुळे शरिरातील पेशींमधील ऑक्सिजनची पातळी पुरेशी ठेवली जाते.

अशी होते निर्मिती...

उच्च शुद्धतेचा मेडिकल ऑक्सिजन तयार करताना क्रायोजेनिक एअर सेपरेटर अर्थात अंत्यत कमी तप्त हवा विभाजक पद्धतीचा वापर केला जातो. या प्लांटमध्ये एक हवा विभाजक युनिट असते. ते वातावरणातील मुबलक हवा घेते आणि वेगळी करते. त्यावर अनेक प्रक्रिया करून त्या हवेतील ऑक्सिजन, नायट्रोजन, आर्गन असे घटक वेगळे केले जातात.

तेव्हा १४ टन, आता १ टन

गेल्या वर्षी कोविड काळात वायसीएम रुग्णालयासाठी दररोज १२ ते १४ किलोलिटर (टन) ऑक्सिजन लागत होता. आता आठवड्याला आठ ते नऊ किलोलिटर म्हणजेच दिवसाला एक टनच्या आसपास ऑक्सिजन लागत आहे. त्या वेळी वायसीएममधील सर्व ७५० बेड कोविडसाठीच होते.

न्यूमोनिया, ह्रदयविकार यांसह फुप्फुसाची क्षमता कमी झालेल्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागते. वायसीएममधील ऑक्सिजन प्लान्टसाठी खासगी कंपनीकडून लिक्विड घेतले जाते. गेल्या वर्षी दिवसाला दोन टॅंकर मागवावे लागत होते. आता आठवड्यावला एक किंवा दोन टॅंकर लागतात. वायसीएमची बेड क्षमता ७५० असून ५५० बेडला ऑक्सिजन पुरवठ्याची सोय आहे. रुबी अलकेअरसह ९० बेड आयसीयूचे आहेत.

- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम हॉस्पिटल, महापालिका

कोविड काळात पाच ठिकाणी ऑक्सिजन प्लान्ट उभारले आहेत. त्यातील ऑटो क्लस्टर जम्बो हॉस्पिटल तात्पुरते होते. तेथील ऑक्सिजन निर्मिती प्लान्टद्वारे २०० बेडला ऑक्सिजन पुरवठा केलेला होता. आता तो प्लॅंट वायसीएम किंवा नवीन थेरगाव रुग्णालयात स्थलांतरीत करण्याचे नियोजन आहे. नवीन थेरगाव, आकुर्डी, जिजामाता, नवीन भोसरी रुग्णालयांच्या आवारातील ऑक्सिजन निर्मिती क्षमता १० किलोलिटर आहे.

- डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com