सरकारला जाग आणण्यासाठी रिक्षा बंद; पिंपरी-चिंचवडमधील रिक्षाचालक काय म्हणतायेत वाचा 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष मिरगे यांची माहिती; मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कचेरीसमोर निदर्शने करणार 

पिंपरी : "कोरोनाने रिक्षाचालकांचे जगणे मुश्‍कील झाले आहे. त्यामुळे चालकांची हलाखीची परिस्थिती झाली आहे. कमी प्रवाशांना दिलेल्या परवानगीमुळे व्यवसाय निम्म्यावर आला. यासाठी झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी 1 ऑक्‍टोबरला एक दिवस रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे,'' अशी माहिती रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष अशोक मिरगे यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शाहूनगर-केएसबी चौकात रिक्षा पंचायतीच्या वतीने जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला भोसरी, निगडी, पिंपरी आणि काळेवाडीतून सहभागी झालेल्या रिक्षाचालक व मालकांनी 'चलो जिल्हाधिकारी कचेरी एक साथ! भव्य निदर्शने' अशा माहितीचे पोस्टर हातात घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली. मागण्यांच्या पूर्ततेसाठी 1 ऑक्‍टोबरला पुणे जिल्हाधिकारी कचेरीसमोर सकाळी 11 वाजता निदर्शने करण्यात येणार आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रिक्षाचालक म्हणताहेत... 

काशिनाथ शेलार व फजल शेख : राज्य सरकारने जिल्हानिहाय रिक्षा, टॅक्‍सी चालक कल्याणकारी मंडळ ताबडतोब स्थापन करावी. 

आत्माराम नाणेकर व नजीर सय्यद : शेतकरी कर्ज मुक्तीप्रमाणे रिक्षाचालकांचे कर्जाचे हप्ते सरकारने भरावे. 

शैलेंद्र गाडे व संजय मस्के : चार महिने रिक्षा बंद असल्याचे प्रमाणपत्र पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने देऊन त्या महिन्यांचा विमा हप्त्याचा परतावा परत करावा. 

सुनील माने व पूनम पाखरे : नवीन रिक्षामुक्त परवाना बंद करावा. रिक्षा पंचायतीच्या ऍपबेस रिक्षासेवा प्रस्तावाला त्वरित परवानगी द्यावी. 

गौतम गाडे : रिक्षाचे उत्पन्न घटल्याने लहान वस्तूंच्या (पार्सल) वाहतुकीस परवानगी द्यावी. 

संजय जाधव व दत्ता मस्के : रिक्षा फिटनेस प्रमाणपत्रासाठी 35 किलोमीटर लांब दिवे घाट येथे जावे लागते. रिक्षा पंचायतीच्या प्रयत्नाने "रोलर ब्रेक टेस्टर'साठी खासदार निधीतून 50 लाख मिळवून दिले. त्याचे काम लवकर पूर्ण करावे. 

पप्पू जाधव व बबलू गायकवाड : तीन प्रवाशांच्या वाहतुकीस परवानगी द्या. 

रमेश राऊत व स्वप्नील ठोसर : रिक्षाचे कर्ज राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये वर्ग करावे. आळंदी रस्त्यावर मंजूर ट्रॅक्‍टरचे काम त्वरित पूर्ण करावे. 

अमोल कदम : पीएमपी कर्मचाऱ्यांच्या किमान वेतन इतके दरमहा चौदा हजार रुपये द्यावेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rickshaw close on one october by drivers