रिक्षा भाडे मीटरप्रमाणे न आकारल्यास कारवाई; पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिस आयुक्तांचा इशारा

रिक्षा भाडे मीटरप्रमाणे न आकारल्यास कारवाई; पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिस आयुक्तांचा इशारा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारपासून (ता. 21) रिक्षाचालकांना मीटरप्रमाणे भाडे आकारण्यास बंधनकारक करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरीतील रिक्षा थांब्यावर रिक्षाचा मीटर डाऊन करून या उपक्रमाची सुरुवात केली. शहरात मीटरप्रमाणे रिक्षा भाडे आकारण्यास नकार दिल्यास रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. दरम्यान, हा उपक्रम सुरू झाल्यानंतर पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्वत: मीटर डाऊन करून रिक्षातून प्रवास केला. त्यानंतर रिक्षाचे अठरा रुपयांचे भाडे 'गुगल पे' या ऑनलाइन पेमेंट ऍपच्या माध्यमातून दिले. 

मीटरप्रमाणे रिक्षा सुरू करण्यासाठी पोलिसांनी रिक्षा संघटनांशी चर्चा केली. त्यात त्यांनी सकारात्मकता दाखवली. नागरिकांनी देखील रिक्षा भाडे मीटरप्रमाणे घ्यावे, अशी मागणी होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील रिक्षा थांब्यावर सुरू झालेल्या या उपक्रमास अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, मंचक इप्पर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले, डॉ. सागर कवडे, पिंपरीचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद वाघमारे, चिंचवडचे वरिष्ठ निरीक्षक सुधाकर काटे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे, वाहतूक शाखेचे निरीक्षक राजेंद्र कुंटे, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे आदी उपस्थित होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, "मागील काही दिवसांपूर्वी पोलिसांनी शहरातील हाउसिंग सोसायटी फेडरेशन आणि नागरिकांशी संवाद साधला. त्यात नागरिकांनी शहरातील रिक्षा मीटरप्रमाणे सुरू करण्याची मागणी केली. त्यानुसार हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शहरासाठी हा ऐतिहासिक निर्णय आहे. दरम्यान, रिक्षाचालकांनी मीटरप्रमाणे रिक्षा चालविण्यास नकार दिल्यास नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार करावी. त्यानुसार पोलिस कठोर कारवाई करतील." 

अतुल आदे म्हणाले, "नागरिकांना आता प्रवासी वाहतुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. या स्पर्धेत रिक्षाचालकांनी टिकून राहायला हवे. त्या दृष्टीने काळानुरुप बदल घडवणे गरजेचे आहे. यापुढील प्रवास मीटरप्रमाणेच होईल. रिक्षाचालकांना आरटीओशी संबंधित ज्या बाबींची आवश्‍यकता असेल, त्यात आरटीओकडून सर्व सहकार्य केले जाईल." बाबा कांबळे म्हणाले, की शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा आहे, पण मीटरला परवानगी दिली म्हणजे रिक्षाचालकांचे प्रश्न सुटलेले नाहीत. सध्या शहरात रिक्षा स्टॅण्डची कमतरता आहे. कोरोना काळात रिक्षा बंद असल्याने कर्ज काढून रिक्षा घेतलेल्यांचे हप्ते थकले आहेत. फायनान्स कंपनीचे अधिकारी रिक्षा ओढून नेतात. त्यामुळे याबाबत पोलिसांनी मध्यस्थी करून मदत करण्याची मागणी देखील बाबा कांबळे यांनी केली. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, रिक्षाचालक काही पैशांसाठी मीटरनुसार जाण्यास नकार देत असल्यास नागरिकांना वाहतूक विभागाच्या 9529681078 या हेल्पलाईनवर तक्रार करता येईल. त्यानंतर संबंधित रिक्षाचालकावर कारवाई केली जाणार आहे. 

मीटर रिक्षाचे असे आहेत दर 

  • एक किलोमीटर 18 रुपये 
  • दोन किलोमीटर 25 रुपये 
  • तीन किलोमीटर 37.70 रुपये 
  • पाच किलोमीटर 67 रुपये 
  • 10 किलोमीटर 123 रुपये 

(संपादन : शिवनंदन बाविस्कर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com