महामार्गावरील छेद रस्त्यामुळे अपघाताचा धोका

महामार्गावरील छेद रस्त्यामुळे अपघाताचा धोका

पिंपरी, ता. ११ : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील निगडी ते देहूरोड या मार्गावर ठिकठिकाणी छेद रस्ते करण्यात आले आहेत. मात्र, या छेद रस्त्याच्या ठिकाणी पांढरे पट्टे, सूचना फलक नाहीत. दरम्यान, याठिकाणी एखादे वाहन महामार्गावर आल्यास अथवा वळण घेतल्यास महामार्गावरून जाणाऱ्या इतर वाहन चालकांचा गोंधळ उडतो. अपघाताचा धोकाही निर्माण होतो. तरी छेद रस्त्याच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना राबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

निगडी ते देहूरोड हा पाच किलोमीटर अंतराचा रस्ता खूपच अरुंद होता. यामुळे अपघाताचे प्रमाण अधिक होते. दरम्यान, काही वर्षांपूर्वी रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. रस्ता दुभाजकही करण्यात आला. यामुळे वाहन चालकांची चांगली सोय झाली. दरम्यान, या मार्गालगत शाळा, रहिवासी वस्ती, हॉटेल, रेस्टॉरंट, डेपो असल्याने देहू फाटा, गार्डन सिटी, केंद्रीय विद्यालय, डीएडी डेपो, दत्तनगर याठिकाणी छेद रस्ते ठेवण्यात आले आहेत. येथे पांढरे पट्टे, रबर रीम्बलर, सूचना फलक आवश्यक आहेत. यामुळे वाहन चालक सावध होतील. वाहनाचा वेग नियंत्रित ठेवून पुढे जाऊ शकतील. मात्र, येथे अशी यंत्रणा उपलब्ध नाही. या छेद रस्त्याच्या ठिकाणाहून वाहने अचानक रस्त्यावर येतात, वळण घेतात. त्यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या इतर वाहन चालकांचा गोंधळ उडतो. रात्री बाजूच्या रस्त्यावर येणारे वाहन नजरेस पडत नाही. यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो. तरी या ठिकाणी उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे. देहूफाट्यावरून अनेक वाहने महामार्गावर येतात. तसेच, महामार्गावरून वळण घेऊन देहूच्या दिशेने जातात. त्यामुळे याठिकाणी वाहन चालकांसह पादचारी नागरिकांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना राबविणे आवश्यक आहे.

‘‘या मार्गावरून जाताना वाहनांचा वेग अधिक असतो. दरम्यान, छेद रस्त्याच्या ठिकाणी अचानक वाहन आडवे आल्यास चालकाचा गोंधळ उडतो. त्यामुळे छेद रस्त्याच्या ठिकाणी, सूचना फलक, पांढरे पट्टे, रबर रीम्बलर, लाल दिवे आदी असणे आवश्यक आहे. यामुळे वाहन चालकांना माहिती मिळेल.’’
- उत्तम सपाटे, वाहन चालक.

‘‘या रस्त्याची पाहणी केली जाईल. ज्याठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. तेथे अंलबजावणी केली जाईल.’’
- एम. डी. काजरेकर, उप अभियंता, रस्ते विकास महामंडळ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com