आयटी पार्कच्या रस्त्यावर नदी ओसरली; मात्र, शेतींला आले तळ्याचे स्वरूप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयटी पार्कच्या रस्त्यावर नदी ओसरली; मात्र, शेतींला आले तळ्याचे स्वरूप

हिंजवडी-माण आयटी पार्कमधील फेज तीनकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाण्याचा निचरा होत नसल्याने रस्त्यावर नदी अवतरल्याचे चित्र होते.

आयटी पार्कच्या रस्त्यावर नदी ओसरली; मात्र, शेतींला आले तळ्याचे स्वरूप

- बेलाजी पात्रे

वाकड - हिंजवडी-माण आयटी पार्कमधील फेज तीनकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाण्याचा निचरा होत नसल्याने रस्त्यावर नदी अवतरल्याचे चित्र होते. मात्र, बुधवारी (ता. १३) दुपारी एकच्या सुमारास पीएमआरडीए प्रशासनाने जेसीबेच्या सहाय्याने रस्ता फोडून चऱ्ह खोदत भोवतालच्या शेतीत पाणी सोडल्याने आता या रस्त्यावरील नदी ओसरली. मात्र, बाजूंच्या शेतींना तळ्याचे रूप प्राप्त झाल्याचे चित्र असून या प्रकारामुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

रस्ता खोदून पाण्याला वाट करण्याच्या कारवाईवेळी पीएमआरडीए नगर रचनाकार विवेक खरवडकर, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता बी. पी. रुईकर, उपअभियंता प्रशांत जोशी, हिंजवडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. येथील मोठाले गृहप्रकल्प व कंपन्यांच्या सांडपाणी, मैल्याच्या ड्रेनेजची व स्ट्रॉम वॉटर लाईनची प्रभावी योजना नसल्याचे वास्तव आहे. मात्र, या सुविधांबाबत स्थानिकांनी जाब विचारल्यास एमआयडीसी, पीएमआरडीए, महापालिका प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवून वेळ मारून नेतात. मात्र या सर्वांनी योग्य समन्वय साधून तोडगा काढल्यास सर्व समस्या सुटू शकतात.

आयटी पार्क फेज दोन ते फेज तीन दरम्यान रस्त्यावर सुमारे पाच ते सहा फुट खोल आणि लांबपर्यंत पावसाचे पाणी साचले होते. याठिकाणी पाण्याचा निचराच होत नसल्याने या समस्येचा आयटीयन्ससह स्थानिक नागरिकांचा प्रचंड मनःस्थाप सहन करावा लागत होता. वाहन चालकांची पाण्यातून वाट काढताना मोठी दमछाक होत असे. पाण्याचा आणि खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागली. तर कार चालकांना जणू नावेत बसल्याची अनुभुती आली.

एमायडीसी प्रशासनाने डेव्हलपमेंट करताना ओढे, नाले, ओव्हाळ हे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत बुजवून सपाटीकरण केले. एमायडीसीने काही भूखंड मोठाल्या शासकीय अधिकाऱ्यांना विकले. त्यांच्याच कृपाशिर्वादाने काही प्लॉटमध्ये मोठाली हॉटेल व अन्य व्यवसाय थाटले गेले आहेत. या सर्वांचा मैला वाहून जाण्याचे कोणतेही नियोजन नसल्याने पाण्याचा निचरा होण्यास कुठेही वाव नाही. त्यामुळेच ही समस्या उदभवली आहे. असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. येथील गवारे वस्तीतील गवारे कुटुंबीयांनी आपल्या शेतीत भात, भुईमूग, सोयाबीन व अन्य पिकांची लागवड केली होती शेतीत पाणी सोडल्याने त्यांची पिके वाया गेली आहेत.

प्रतिक्रिया -

आयटीनगरी परिसरात ढग फुटी झाल्यास काय होईल आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आयटी पार्क मधील मूलभूत सुविधा देखील तेवढ्याच सक्षम हव्यात. नियोजनाचा अभाव असल्याने वारंवार सर्व सामान्य ग्रामस्थ आणि आयटीयन्सना वेठीस धरले जाते. एमआयडीसी, पीएमआरडीए प्रशासनाने समन्वय साधत ह्या सर्व समस्या तात्काळ सोडवाव्यात

- सुरेश पारखी, (माणचे स्थानिक रहिवाशी व कार्याध्यक्ष मूळशी तालुका काँग्रेस)

पाणी जाणारे काही नाले स्थानिकांनी बुजविले आहेत. हा रस्ता एमआयडीसीचा आहे. मात्र, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पीएमआरडीएची जागा असल्याने आपत्ती जनक परस्थिती उद्भवू नये, माणसांना त्रास होऊ नये. म्हणून आम्ही आज कारवाई करीत ते पाणी वळविले आहे.

- विवेक खरवडकर (नगर रचनाकार, पीएमआरडीए)

नागरिकांच्या आणि सर्वांच्या दृष्टीने रस्ता मोकळे होणे गरजेचे होते. रस्ता एमआयडीसीचा आहे. पण दोनही बाजुंना पीएमआरडीएची जागा आहे. पाणी काढण्याबाबत आम्ही विनंती केली होती. त्यानुसार पाणी काढून रस्ता वाहतूकिसाठी मोकळा करण्यात आला आहे.

- बी. पी. रुईकर (कार्यकारी अभियंता एमआयडीसी)

Web Title: River On It Park Road Agriculture Lake Rain Water

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top