स्टॅंपची जादा दराने विक्री; पिंपरी-चिंचवडमधील प्रकार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 4 October 2020

सरकारी काम वेळेत पूर्ण होण्यासाठी नागरिकांची खटाटोप सुरू असते. त्याचा गैरफायदा स्टँप विक्रेते घेत असून, 100 रुपये किमतीचा स्टँप 120 ते 140 या जादा दराने विक्री करत आहेत.

पिंपरी : सरकारी काम वेळेत पूर्ण होण्यासाठी नागरिकांची खटाटोप सुरू असते. त्याचा गैरफायदा स्टँप विक्रेते घेत असून, 100 रुपये किमतीचा स्टँप 120 ते 140 या जादा दराने विक्री करत आहेत. नागरिकांची स्टँप विक्रेत्यांकडून आर्थिक लुबाडणूक सुरू आहे. मात्र, आपले काम वेळेत पूर्ण होण्यासाठी नागरिक मौन बाळगत आहेत. जे पक्षकार जादा पैसे देत नाहीत, त्यांना विक्रेत्यांकडून टाळाटाळ केली जाते, अशी तक्रार ऍड. पी. डी. नांगरे यांनी केली आहे. या प्रकाराकडे सहजिल्हा निबंधक कार्यालयाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड शहरात साधारणत: 25 ते 30 स्टँप विक्रेते आहेत. याठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी सरकारकडून स्टँप विक्रेत्यांची नेमणूक केली आहे. विक्रेत्यांचे दोन वर्ग ठरवून दिले आहेत. यामध्ये पहिल्या वर्गात स्टँप विक्रेता, तर दुसऱ्या वर्गात स्टँप लिहिणारा असे वर्गीकरण केले. असे असताना नियम धाब्यावर बसवून स्टँप विक्रेता स्टँप लिहित आहे आणि लिहिणारा स्टँप विक्री करत आहे. नागरिकांना व पक्षकारांना जमीन खरेदी-विक्री, तारण गहाण, बॅंक कर्ज, दत्तकपत्र, मृत्युपत्र, संचकारपत्र, हक्कसोडपत्र तसेच सरकारी विविध योजनेसाठी प्रतिज्ञापत्र तयार करण्यासाठी स्टँपचा वापर केला जातो. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

स्टँपच्या मिळण्यावर व लिहिण्यावरच पुढील सर्व शासकीय कामाची रूपरेषा ठरते. परिणामी 100 रुपये किमतीचे स्टॅंप 120 ते 140 आणि 500 रुपये किमतीचे 530 रुपये, असे जादा दराने विक्री करत आहेत. स्टँपवरील 10 ते 20 रुपये आपल्या हक्काचे आहे. प्रत्येक स्टँपमागे विक्रेत्यांना कमिशन मिळते, तरी यानुसार सर्रासपणे विक्री करत आहेत. या गंभीर बाबीकडे मात्र, सहजिल्हा निबंधक कार्यालयाकडून सोईस्कर दुर्लक्ष होत असल्याचे पिंपरी-चिंचवड नोटरी असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. दीपक ओव्हाळ यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरकारच्या नव्या नियमानुसार सुटीच्या दिवशी व कार्यालयीन कामकाज बंद झाल्यानंतर स्टँपची विक्री करणे, हे बेकायदेशीर आहे. मात्र, विक्रेत्यांकडून रात्री कामकाज बंद झाल्यावर व सुटीच्या दिवशी येणाऱ्या पुढील कामाच्या दिवसाची तारीख टाकून बेकायदेशीररीत्या जादा दराने स्टँप विक्री सुरू आहे. 
- ऍड. पी. डी. नांगरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड नोटरी असोसिएशन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sale of stamps at an extra rate in Pimpri-Chinchwad