पिंपरी : सलूनची दुकाने उद्यापासून सुरू होणार, पण दर 'हे' असतील

टीम ई सकाळ
Saturday, 27 June 2020

शहर परिसरातील सुमारे दोन हजार सलून, केशकर्तनालये उद्या रविवारपासून (ता. 28) सुरु होणार आहेत.

पिंपरी :  शहर परिसरातील सुमारे दोन हजार सलून, केशकर्तनालये उद्या रविवारपासून (ता. 28) सुरु होणार आहेत. मात्र, दुकानदारांसमोर कामगारांचा तुटवड्यांची समस्या उभी राहिली आहे. महापालिकेच्या सूचनेनुसार केवळ कटिंग केली जाणार असून, त्याच्या दरात 30 रुपयांची वाढ झाली आहे. प्रति कटिंगमागे 100 रुपये इतका दर निश्‍चित करण्यात आल्याचे राज्य नाभिक महामंडळाच्या पिंपरी-चिंचवड शाखेने म्हटले आहे. 

शहरात 23 मार्चपासून सलून, केशकर्तनालये बंद राहिली होती. त्यांची संख्या जवळपास 2 हजार इतकी आहे. त्यामध्ये भोसरीत सर्वाधिक 300, काळेवाडी, थेरगाव परिसरात 200, तर दिघी भागांत सुमारे 100 दुकाने आहेत. प्रत्येक दुकानात सरासरी 2 ते 3 कारागीर काम करतात. त्यामध्ये मराठवाड्याबरोबरच अमरावती, नाशिक जिल्हा तसेच उत्तर प्रदेश, बिहारमधील कारागिरांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, हे कारागीर सध्या त्यांच्या गावी परतले आहेत. त्यामुळे दुकानदारांसमोर त्यांच्या तुटवड्याची समस्या राहणार आहे. 

महामंडळाचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष अशोक मगर म्हणाले, "उद्या रविवारपासून सर्व सलून, केशकर्तनालये चालू होतील. टाळेबंदीमुळे व्यवसाय सुरुवातीला मंदीतच राहण्याची अपेक्षा आहे. दुकानदारांना कारागिरांची समस्या भेडसावणार आहे. मात्र, दुकाने चालू झाल्यावर हे कारागीर परततील. सध्या आम्हाला केवळ कटिंगची परवानगी मिळाली आहे. प्रत्येक ग्राहकासाठी नवीन चादर, सॅनिटायजर वापरावे लागणार आहे. तसेच 60 टक्के दुकाने भाड्याने असल्याने आम्हाला कटिंगचे दर वाढवावे लागत आहे. पूर्वी कटिंगचे दर 70 रुपये इतके होते. आता, कटिंगसाठी 100 रुपये दर आकारला जाईल.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salons are starting from Sunday and cutting rates have been increased