esakal | बीज सोहळ्याची तयारी पूर्ण; देहूला छावणीचे स्वरूप, दोन दिवस संचारबंदी!
sakal

बोलून बातमी शोधा

बीज सोहळ्याची तयारी पूर्ण; देहूला छावणीचे स्वरूप, दोन दिवस संचारबंदी!

जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज सोहळा उद्या मंगळवारी (ता. 30) आहे. या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थान आणि देहू नगरपंचायतीतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे.

बीज सोहळ्याची तयारी पूर्ण; देहूला छावणीचे स्वरूप, दोन दिवस संचारबंदी!

sakal_logo
By
मुकुंद परंडवाल

देहू : जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज सोहळा उद्या मंगळवारी (ता. 30) आहे. या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थान आणि देहू नगरपंचायतीतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणारा बीज सोहळा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ 50 जणांच्या उपस्थितीत होणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने देहू नगरपंचायतीच्या हद्दीत दोन दिवस संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे देऊळवाडा आणि गावाला छावणीचे स्वरूप आले आहे.

संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन सोहळ्याचे 373 वे वर्ष आहे. या बीज सोहळ्यावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट आहे. त्यामुळे परंपरेनुसार आणि सरकारच्या आदेशाचे पालन करत संस्थानच्या वतीने 50 जणांच्या उपस्थितीत सोहळा पार पडणार आहे. संस्थानच्या वतीने दिंडीकरी आणि भाविकांना घरूनच सोहळा साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, सर्व दिंडीकरांना संस्थानने देहूत येऊ नये, असे कळविले आहे. बीज सोहळ्याची संस्थानने तयारी पूर्ण केली आहे. देऊळवाड्यात स्वच्छतेची कामे करण्यात आली. तसेच, संपूर्ण देऊळवाडा तळेगाव येथील अग्निशामक दलाचा बंब मागवून धुऊन काढण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दररोज देऊळवाडा सॅनिटाईज करण्यात येत आहे. ज्या 50 जणांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न होणार आहे, त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. वैकुंठस्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरासमोर भजनी मंडप उभारण्यात आला आहे. मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नगरपंचायतीच्या वतीने गावात स्वच्छतेची कामे करण्यात आली. याशिवाय, इंद्रायणीचा घाट स्वच्छ करण्यात आला आहे. गावात ग्रामस्थांनी कोरोना काळात घराबाहेर पडू नये, जीवनावश्यक सेवा वगळता इतर दुकाने दोन दिवस बंद राहणार आहेत, असे फिरत्या वाहनांतून सांगण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवडकरांसाठी नवी नियमावली; आयुक्तांच्या आदेशामुळे निर्बंध वाढले

चोख पोलिस बंदोबस्त

बीज सोहळ्यानिमित्त पोलिसांनी अतिरिक्त पोलिसांची मागणी केली आहे. सहा पोलिस निरिक्षक, 16 सहाय्यक निरिक्षक आणि पोलिस उपनिरिक्षक, 125 पोलिस, 30 महिला पोलिस, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्यांचा समावेश आहे. सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांना पोलिसांच्या वतीने पास देण्यात येणार आहे. त्यांची यादी संस्थानकडे मागण्यात आली आहे. बीज सोहळ्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. गावाच्या चारही प्रवेशद्वारावर वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बंडातात्या कराडकरांना पाठिंबा नाही

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी 29 मार्चला देहूत येण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थान, आळंदी येथील प्रमुख वारकरी आणि पिंपरी-चिंचवडचे आयुक्त यांनी शनिवारी (ता. 27) बैठक घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या आदेशाचे पालन करण्यात येईल आणि बंडातात्या कराडकरांच्या आंदोलनास पाठिंबा देणार नसल्याचे सांगितले आहे, असे प्रसिद्धीपत्रक विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त आनंद भोईटे यांनी काढले आहे.

Breaking : चिंचवडमध्ये नगरसेविकेच्या मुलाची स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या

बीज सोहळ्याचा कार्यक्रम
परंपरेनुसार बीज सोहळ्याचा कार्यक्रम मुख्य देऊळवाड्यात पहाटे तीन वाजता काकड्याने सुरू होईल.
1) पहाटे चार वाजता श्रींची महापूजा संस्थानचे अध्यक्ष विश्वस्त यांच्या हस्ते होईल.
2) पहाटे चार वाजता शिळा मंदिरात संस्थानचे अध्यक्ष, वंशजांच्या हस्ते महापूजा होईल.
3) पहाटे सहा वाजता वैकुंठस्थान येथे महापूजा.
4) सकाळी दहा वाजता मुख्य देऊळवाडा ते वैकुंठस्थान मंदिराकडे पालखीचे प्रस्थान.
5) सकाळी दहा ते दुपारी 12 वाजेपर्यत वैकुंठस्थान मंदिर येथे वैकुंठगमन सोहळ्याचे किर्तन.
6) दुपारी 12.30 वाजता पालखीचे परत वैकुंठस्थान ते देऊळवाड्याकडे आगमन.
 

loading image
go to top