पिंपरी-चिंचवडमधील शाळांची घंटा वाजणार; महापालिका आयुक्तांनी काढला आदेश

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 December 2020

  • महापालिका आयुक्तांचा आदेश; नववी ते बारावीच्या वर्गांना परवानगी 

पिंपरी : शहरातील महापालिकेच्या व खासगी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सोमवारपासून (ता. 3) सुरू करण्यात येणार आहे, असा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी (ता. 31) काढला. कोविड टेस्ट निगेटिव्ह आलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाच नियुक्त करावे, विद्यार्थ्यांचे पालकांचे संमतिपत्र घ्यावे व शाळा, वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करावे, अशा सूचना सर्व शाळा व्यवस्थापनाला केल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य सरकारच्या आदेशानुसार, नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार होते. मात्र, कोरोना रुग्णसंख्या अधिक असल्याच्या कारणास्तव आयुक्त हर्डीकर यांनी तीन जानेवारीपर्यंत शहरातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्या आदेशाची मुदत रविवारी (ता. 3) संपत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आयुक्तांनी गुरुवारी नवीन आदेश काढला असून, सोमवारपासून (ता. 4) नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार, कोरोना चाचणी निगेटिव्ह आलेल्या व कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाच कामावर हजर करून घेण्यात येणार आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासाठी शाळेतील शंभर टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची "कोविड टेस्ट' बंधनकारक केली आहे. 

शाळांसाठी सूचना 
- शाळा सुरू करण्यापूर्वी स्वच्छता व निर्जंतुकीकरण सुविधा करणे. जंतुनाशक, साबण, पाणी उपलब्ध करणे 
- वाहतूक सुविधांचे निर्जंतुकीकरण नियमित करून उपाययोजनांबाबत व्यवस्थापनाने पडताळणी करणे 
- शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची "कोविड टेस्ट' बंधनकारक असून, त्याचे प्रमाणपत्र शाळेत दप्तरी ठेवावे 
- वर्गखोली व स्टाफ रूममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमानुसार असावी 
- शाळेत मास्कच्या वापराबाबत सूचना लावावी, दोन जणांमध्ये सहा फूट अंतर ठेवण्याबाबत चिन्ह आखावेत 
- शाळेत येण्या-जाण्याचे वेगवेगळे मार्ग निश्‍चित केलेले असावेत, तसे बाण दर्शवून खुणा शाळेने कराव्यात 
- विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी सहमती शाळा प्रमुखांनी प्राप्त करून घ्यावी 
- शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ करून स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जंतुकीकरण करावे 
- विद्यार्थी वाहतूक वाहनांचे दिवसातून किमान दोन वेळा (विद्यार्थी बसण्यापूर्वी व उतरल्यानंतर) निर्जंतुकीकरण करावे 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(संपादन : शिवनंदन बाविस्कर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: school starts from monday in pimpri chinchwad city