esakal | शाळा सुरू होणार, पण सुरक्षेचं काय? शिक्षक, मुख्याध्यापकांना सतावतायेत अनेक प्रश्न
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा सुरू होणार, पण सुरक्षेचं काय? शिक्षक, मुख्याध्यापकांना सतावतायेत अनेक प्रश्न

राज्यातील शाळांची घंटा सोमवारपासून (ता. 23) वाजणार आहे, पण सगळी जबाबदारी स्थानिक प्रशासनावर टाकली आहे. स्थानिक प्रशासनाला योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात, अशा सूचना दिल्या आहेत.

शाळा सुरू होणार, पण सुरक्षेचं काय? शिक्षक, मुख्याध्यापकांना सतावतायेत अनेक प्रश्न

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : "सरकारने शाळा सुरू करण्याबाबतचा अध्यादेश 10 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केला. परंतु, स्थानिक प्रशासनाकडून तब्बल दहा दिवसांनी आदेश दिल्यामुळे अनेक शाळा संभ्रमात आहेत. या दोन दिवसात शाळा सॅनिटाईज कधी होणार? शिक्षकांची अँटिजेन टेस्ट पूर्ण कधी होणार? ऑक्‍सिमीटर, थर्मल स्कॅनर व सॅनिटायजर साहित्य कधी पुरविण्यात येणार?'', असे अनेक प्रश्‍न शिक्षक व मुख्याध्यापकांना सतावत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातील शाळांची घंटा सोमवारपासून (ता. 23) वाजणार आहे, पण सगळी जबाबदारी स्थानिक प्रशासनावर टाकली आहे. स्थानिक प्रशासनाला योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात, अशा सूचना दिल्या आहेत. परंतु, महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी (ता. 20) आदेश जारी केले आहेत. त्यात सलग शनिवार आणि रविवारच्या सुट्या आल्यामुळे शिक्षकांची तपासणी कधी होणार? त्यात केवळ महापालिका व अनुदानित शाळांमध्येच सॅनिटाईज करण्यात येणार आहे. विनाअनुदानित शाळांमधील मुलांचे काय? ऑक्‍सिमीटर, थर्मल स्कॅनर व सॅनिटायझरचा खर्च कोण करणार? असे अनेक प्रश्‍न शिक्षकांनी उपस्थित केले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुख्याध्यापक, पालक म्हणतात... 

नीलेश गायकवाड (मुख्याध्यापक, जिजामाता हायस्कूल) : एका दिवसात शहरातील सर्व शिक्षकांच्या तपासण्या होणार का? एवढे दिवस प्रशासनाने नियोजन का केले नाही. 

अभिजित कदम (शिक्षक, पीडीए इंग्लिश मीडियम स्कूल) : स्थानिक प्रशासनाकडून उशिरा माहिती मिळाली, तोपर्यंत शिक्षकांची तपासणी सुरू केली आहे. शाळांची स्वच्छता करून घेतली. 

दत्तात्रेय भालेराव (पर्यवेक्षक, श्री शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय) : महापालिका प्रशासनाकडून उशिरा माहिती मिळाल्यामुळे अनेक शाळांमधील शिक्षकांची कोविड टेस्ट झाली नाही. साहित्य कोण देणार? अद्याप सगळ्याच गोष्ट अस्पष्ट आहे. 

एकनाथ बुरसे (प्राचार्य, एच. ए. माध्यमिक स्कूल) : संस्थेच्या खर्चातून दोनवेळा सॅनिटाईज करून घेतले. पालकांचे ऑनलाइन संमतिपत्र भरून घेतले आहे. 

जागृती धर्माधिकारी (संस्थापक, सरस्वती भुवन इंग्लिश मीडियम स्कूल) : शाळा उशिरा सुरू करण्याबाबत सरकारकडे मागणी करणार आहे. आता मुले गावावरून परतली आहेत. अनेकांच्या संपर्कात ते आले आहेत. 

राजेंद्र पडवळ (पालक) : शाळा व्यवस्थापनाकडून स्वच्छता करण्यात आली आहे. त्यामुळे मुलांना शाळेत पाठविण्यास उत्सुक आहोत. 

सीमा जाधव (पालक) : शाळा सुरू होत असल्याचा आनंद आहे. परंतु, भीतीदेखील आहे. शाळा सुरू झाल्यावर खरी परिस्थिती लक्षात येईल.