
पिंपरी - ‘प्लाझ्मा थेरपी उपचारासाठी प्लाझ्मादात्याची गरज आहे...’ अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली. कारण, रुग्णांची प्रकृती खालावत होती. त्यांच्या पोस्टवर काही तासांत प्रतिसाद मिळाला. प्लाझ्मा उपलब्ध झाला. रुग्णाला दिला गेला. मात्र, खालावलेल्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकली नाही आणि दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी रुग्णाचा मृत्यू झाला. तेव्हा, प्रश्न निर्माण झाला प्लाझ्मा वेळेवर उपलब्ध झाला असता तर... हे प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्याला प्लाझ्मा किती अनमोल आहे, हे या उदाहरणावरून स्पष्ट होते. त्या माध्यमातून रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची लुबाडणूक होऊ नये, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्लाझ्माचे दर निश्चित केले आहेत. खासगी रुग्णालयांना त्यासाठी सहा हजार रुपये मोजावे लागणार आहेत. महापालिका व सरकारी रुग्णालयांतील रुग्णांसाठी केवळ चारशे रुपयांत प्लाझ्मा उपलब्ध होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने अद्याप प्लाझ्मा बॅगचे शुल्क निर्धारित केलेले नव्हते. त्यामुळे पूर्वीचाच पूर्ण रक्तातून वेगळा केलेल्या प्लाझ्मा बॅगचा दर प्रतिबॅग ४०० रुपये खासगी रुग्णालयातील रुग्णांकरिता आकारला जात होता. याशिवाय, वायसीएम रक्तपेढीकडे मोठ्या प्रमाणात महापालिका हद्दीतील व हद्दीबाहेरील खासगी रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण प्लाझ्मा घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज करतात. त्या अनुषंगाने वायसीएम रुग्णालय, महापालिका रुग्णालये, सरकारी रुग्णालयांमधील रुग्णांसाठी प्लाझ्मा मोफत करण्यास आणि खासगी रुग्णालयांमधील रुग्णांसाठी ॲफेरेसीस प्लाझ्मा बॅगेकरिता सहा हजार रुपये आकारण्यास स्थायी समितीने यापूर्वीच मान्यता दिली आहे.
सरकारची सूचना
कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवरील उपचारासाठी प्लाझ्मा उपचार पद्धतीचा वापर करण्याच्या सूचना राज्यातील सर्व सरकारी, महापालिका, खासगी, निमसरकारी रुग्णालयांना सरकारने केल्या आहेत. त्यानुसार प्लाझ्मा दात्यांकडून वायसीएम रक्तपेढी स्वयंचलित मशिनद्वारे ‘ॲफेरेसीस’ प्लाझ्मा वेगळा केला जात आहे. एका बॅगमध्ये २०० मिलिलिटर प्लाझ्मा असतो.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
किमान किंमत निश्चित
खासगी, विश्वस्त रक्तपेढ्या व रुग्णालयांना प्रतिडोस प्लाझ्मा बॅगसाठी सर्व करांसहित पाच हजार पाचशे रुपये कमाल शुल्क आकारण्यास राज्य सरकारने २४ सप्टेंबर रोजी मान्यता दिली आहे. तसेच ‘केमिलुमिनेसन्स’ चाचणीसह प्लाझ्मा उपलब्ध करून दिल्यास या चाचणीसाठी कमाल दर पाचशे रुपये प्लाझ्मा बॅग किमती व्यतिरिक्त आकारण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे एका बॅगेची किंमत सहा हजार आहे.
अशी असते प्रक्रिया
वायसीएममधील रक्तपेढीत केमिलुमिनेसन्स चाचणीद्वारे प्रतिजैविकांची पातळी तपासणी केली जाते. त्यानंतर योग्य अशा प्लाझ्मा दात्याकडून ‘अफेरेसीस’ मशिनद्वारे प्लाझ्मा वेगळा करून इतर सर्व पेशी दात्याला परत केल्या जातात. एका दात्याकडून दोन प्लाझ्मा बॅग तयार केल्या जातात.
रुग्णाचे नातेवाईक म्हणतात...
माझ्या नातेवाईक महिलेवर बाणेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या ५० वर्षांच्या होत्या. त्यांची प्रकृती खालावत होती. प्लाझ्माची गरज होती. म्हणून सोशल मीडियाद्वारे आवाहन केले. कोथरूड येथील खासगी रक्तपेढीतून प्लाझ्मा उपलब्ध झाला. त्यांना शुक्रवारी प्लाझ्मा देण्यात आला. मात्र, शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. कदाचित लवकर प्लाझ्मा मिळाला असता तर, त्या वाचू शकल्या असत्या, अशी भावना तीस वर्षीय तरुणाने व्यक्त केली.
कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांच्याच रक्तातील प्लाझ्माची गरज असते. मात्र, अनेक जण प्लाझ्मा देण्यासाठी घाबरतात. त्यांच्या मनातील भीती घालविण्याची गरज आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्लाझ्मादात्यांना आवाहन करीत आहे. आजपर्यंत जवळपास पंधरा दात्यांनी प्रतिसाद देऊन प्लाझ्मादान केला आहे.
- डॉ. विजय पाटील, चिंचवड
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.