esakal | पुणे-नाशिक महामार्गावर मोशी-प्राधिकरणातील राजे शिवछत्रपती चौकात एक रुपयामुळे ज्येष्ठ महिलेचा गेला बळी
sakal

बोलून बातमी शोधा

A senior woman met with an accident on Pune-Nashik highway at Raje Shivchhatrapati Chowk in Moshi Authority.jpg

भोसरीकडून मोशीकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरची ध्रुपदाबाई गजरे (वय 70) या महिलेला धडक बसली आणि तिच्या पायावर चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला.

पुणे-नाशिक महामार्गावर मोशी-प्राधिकरणातील राजे शिवछत्रपती चौकात एक रुपयामुळे ज्येष्ठ महिलेचा गेला बळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : नेहमीप्रमाणे ती सिग्नलला भीक मागत होती. मोटार थांबली की, चालक व सहप्रवाशांकडे एक-एक रुपया मागत होती. कोणी दिवाळीचा फराळ देत होते. महामार्गावर वर्दळ अधिक असल्याने ट्रॅफिक वॉर्डनने आवाज दिला. सिग्नलपासून रस्त्याच्या कडेला जबरदस्तीने नेले. पण, पुन्हा दुभाजकावरील सिग्नलजवळ आली आणि भरधाव कंटेनरखाली सापडली. जागीच तिचा मृत्यू झाला. कंटेनरचालक न थांबताच निघून गेला. तिच्या सोबत चौकातील दुसऱ्या बाजूच्या सिग्नलवर थांबून तिचे नातवंडेही भिक मागत होती. आजीला चिरडून कंटेनर गेल्याचे दिसताच त्यांनी हंबरडा फोडला.

भर दुपारी बाराच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर मोशी- प्राधिकरणातील राजे शिवछत्रपती चौकात हा अपघात घडला आणि शहरातील भिकाऱ्यांचा प्रश्‍न पुन्हा उपस्थित झाला. शहरातून पुणे-नाशिक, पुणे-मुंबई आणि मुंबई-बंगळरू (देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग) जातात. या तिन्ही महामार्गांसह औंध-सांगवी ते रावेत बीआरटी मार्गावरील चौकांमध्येसुद्धा भिकारी भिक मागताना दिसतात. हे चारही रस्ते चौपदरी आहेत. चारही रस्त्यांवर दुभाजक आहेत.

वाहनचालकांच्या मार्गदर्शनासाठी व वाहतूक नियंत्रणासाठी चौकाच्या चारही बाजूला सिग्नल यंत्रणा बसवलेली आहे. याच चौकांमधील चारही बाजूच्या सिग्नलच्या खांबांचा व दुभाजकांचा आधार घेऊन भिक्षेकरी भिक मागत असतात. यात तीन-साडेतीन वर्षांच्या मुलांपासून ७०-८० वर्षांच्या आजी-आजोबांपर्यंतच्या व्यक्तींचा समावेश असतो. एखाद्या स्त्रीच्या कडेवर तान्ह बाळही असतं. भिक मागून उदरनिर्वाहासाठी पैसे मिळविणे हाच हेतू यामागे असतो. 

विक्रीसाठी चुकीचे ठिकाण 

सिग्लनवर थांबलेले काही जण 'यूज अँड थ्रू बॉलपेन', डस्टबीनसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या, खेळणी, वाहनांच्या काच साफ करणाऱ्या 'ग्लास क्‍लिनर' यांची विक्री करून दोन पैसे मिळवत असतात. रोजगारासाठी वस्तू विक्री करणे भिक मागण्यापेक्षा चांगलेच आहे. मात्र, त्यासाठी निवडलेले ठिकाण चुकीचे ठरत आहे. कारण, रेड सिग्नल लागल्यानंतर वाहने थांबली की, प्रत्येक वाहनापुढे जाऊन ही मंडळी वस्तू घेण्याचा किंवा भिक देण्याचा आग्रह करते. ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर दुभाजकावर येण्यासाठी त्यांची घाई असते. तर, वाहन दामटण्याच्या तयारीत चालक असतो आणि अपघात होतो. 

रुपयाचं नाणं तिच्या हातात
 
उंच वाहनांमुळे गाडीजवळ कोण उभे आहे, हे लवकर दिसू शकत नाही. किंवा ग्रीन सिग्नल बंद होऊन रेड सिग्नल लागण्यापूर्वी काही सेकंद येलो सिग्नल लागतो. वास्तविकतः तो वाहनचालकांना थांबण्यासाठीचा इशारा असतो. मात्र, काही वाहनचालक 'रेड सिग्नल लागेपर्यंत आपण निघून जाऊ' हा विचार करून वाहनाचा वेग वाढवून सुसाटे निघून जातात, अशा वेळी अपघात होऊ शकतो. मंगळवारची (ता. 17) पुणे-नाशिक महामार्गावरील घटना अशाच प्रकारे घडल्याचे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले. भोसरीकडून मोशीकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरची ध्रुपदाबाई गजरे (वय 70) या महिलेला धडक बसली आणि तिच्या पायावर चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला. कोणत्या तरी वाहनचालकाने दिलेले फराळ व एक रुपयाचे नाणे तिच्या हातात होते. 

इथे आहेत भिकारी 

महापालिकेने पिंपरी कॅम्पालगत निवारा केंद्र सुरू केले आहे. मात्र, भिक्षेकरी रस्त्याच्या कडेलाच जागा मिळेल तिथे पाल टाकून राहात आहेत. पुणे-मुंबई महामार्गावर नाशिक फाटा चौक, पिंपरी चौक, मोरवाडी चौक, चिंचवड स्टेशन चौक, अहिंसा चौक, आकुर्डी खंडोबा माळ चौक, निगडी टिळक चौक, पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी पीएमटी चौक, मोशीतील राजे शिवछत्रपती चौक, मोशी गावठाण चौक, मोशी टोलनाका, औंध-रावेत बीआरटी मार्गावर सांगवी फाटा, काळेवाडी फाटा, डांगे चौक, मुकाई चौक आणि कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर वाकडमधील भुजबळ चौक, भुमकर चौक आदी ठिकाणी भिकारी थांबलेले असतात.