Video : वयाच्या ६९ व्या वर्षी सायकलरून सेव्हन सिस्टर्सची भ्रमंती

seven sisters solo cycle at age of 69 pimpri chinchwad
Wednesday, 26 August 2020

चारचाकी विकून सायकलवर व्यायाम; कोरोनानंतर पुन्हा भ्रमंतीचा निर्धार

पिंपरी : आयुष्यात प्रत्येकाला हटके जगायचे असते मलाही वाटले सेवानिवृत्तीनंतर सायकल सोबतच दोस्ती करावी. नुसते धनसंपन्न असून, चालत नाही. शारीरिक संपत्ती कमावणे गरजेचे आहे. मी माझ्या फिटनेससाठी चारचाकी विकली. हातातले स्टेअरिंग अन्‌ पॅडलवरच खरे समाधान मिळाले. मात्र, स्वप्नातही वाटले नव्हते की, देशातील सौंदर्यात भर टाकणाऱ्या सेव्हन सिस्टर्सची भ्रमंती सायकलवरुन करेल. जावयाने प्रेरणा दिली. त्यामुळे स्फूर्ती मिळाली. आजही भल्या पहाटे मी शंभर किलोमीटरपर्यंत ग्रुपने सायकलिंग करतो. आता हे सवयीचे झाले आहे, त्याशिवाय दिवस मला सुनासुना वाटतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपळे सौदागर येथे राहणारे अनिल पिंपळीकर सायकलवरील भ्रमंतीचा अनुभव सांगत आहेत. मूळचे ते नागपूरचे. खासगी बॅंकेत ते अधिकारी होते. सेवावृत्तीनंतर त्यांनी नर्सरीचा व्यवसाय हाती घेतला. मात्र, त्यात मन रमले नाही. २०११ पासून सायकलिंगला खऱ्या अर्थाने त्यांनी सुरुवात केली. लॉकडाउनपूर्वी ९ मार्चला सेव्हन सिस्टर्ससाठी त्यांनी सायकलवरुन भ्रमंती सुरू केली. त्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी लागणार होता. दिल्लीवरुन त्यांनी विमानाने प्रवास करुन इंफाळ गाठले. तेथून कोणाच्याही मदतीविना सायकलिंगला सुरुवात केली. त्यांनतर मणीपूर, नागालॅंड, आसाम पूर्ण केले. मात्र, अचानक लॉकडाउन लागला. त्यांना अरुणाचल प्रदेशाच्या सिमेवरच थांबावे लागले. निवाऱ्याचा प्रश्‍नही निर्माण झाला. त्यांनी तिथूनच सायकलवरून गुवाहाटीकडे प्रवास केला. मात्र, उरलेले तीन राज्य ते कोरोना गेल्यांनतर पूर्ण करणार आहेत. एकूण १७०० किलोमीटरपैकी त्यांचा ५५० किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. उर्वरित मिझोराम, सिक्कीम, मेघालय, अरुणाचल प्रदेश पूर्ण करण्याचे स्वप्न अर्धवटच राहिले. एकूण १२ दिवसांतच ते माघरी परतले. दरम्यान सोबत त्यांनी सायकलसोबत सायकल पंक्‍चर कीट, टायर व इतर साहित्य सोबत ठेवले होते. 

हा आहे फिटनेस फंडा 

सेव्हन सिस्टर्स सोडून त्यांनी दिल्ली, कन्याकुमारी, पंढरपूर, नाशिक-हातगड या ठिकाणी ४५० ते ५०० किलोमीटरचे प्रत्येकी सायकलिंग केले आहे. दिवसभरात ते शंभर जोर बैठकाही काढतात. त्याचबरोबर रनिंग, बॅडमिंटन, फुटबॉलचाही छंद जोपासला आहे. स्पोर्टसमध्ये त्यांनी कॅप्टनच पद भूषवले आहे. आठवड्यातील सोमवार व बुधवार चांदणी चौक, मंगळवारी तळजाई डोंगर, गुरुवार व शुक्रवार कल्याणीनगर, शनिवारी व रविवारी रावेतला ते नियमित सायकलिंग करीत आहेत. दिल्लीवरुन सायकलिंग करत असताना त्यांना वसईत थोडी दुखापत झाली होती. मात्र, ते डगमगले नाहीत त्यांनी प्रवास पूर्ण केल्याची ते आठवण सांगत आहेत. 
 

सध्या आरोग्य जपणे सर्वांत महत्त्वाचे आहे. सायकलमुळे वजनही आटोक्‍यात राहते. कित्येकजणांना सायकलिंगमुळे नवी उर्जा प्राप्त होते. उत्साह संचारतो. हाच उत्साह दिर्घकाळ टिकवून प्रफुल्लित राहण्यासाठी व्यायाम निकडीचा आहे. जीवनातील खरा आनंद मी आता अनुभवत आहे.
- अनिल पिंपळीकर, सायकलपटू, पिंपळे सौदागर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seven sisters solo cycle at age of 69 pimpri chinchwad