'पीएमआरडीए'च्या वेबसाइटमध्ये अनेक त्रुटी; सोशल मीडियावरही इनअॅक्टिव्ह

सुवर्णा नवले
Tuesday, 29 September 2020

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) विस्तार सर्वाधिक मोठा आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड हद्दीलगतच्या गावांना पुरेशी माहिती मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पीएमआरडीएचे वेबसाइट आहे.

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) विस्तार सर्वाधिक मोठा आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड हद्दीलगतच्या गावांना पुरेशी माहिती मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पीएमआरडीएचे वेबसाइट आहे. मात्र, पीएमआरडीएची स्थापना होऊन तब्बल पाच वर्ष उलटले असूनही अद्याप वेबसाइटच्या कामकाजाला प्रशासनाकडून मुहूर्त लागलेला नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पीएमआरडीएने 2017 च्या सुरुवातीलाच वेबसाइटचे काम हाती घेतले होते. सोशल मीडिया चालवण्यास सुरुवात केली. मात्र, पीएमआरडीए प्रशासनाला प्रशासकीय कामकाजात उदासीनता असल्याचेच दिसून येत आहे. कंत्राटी पद्धतीने हे कामकाज दिले असल्याने वेबसाइट चालकाला कॉल करून वेळोवेळी पाचारण करावे लागते. त्यानंतर वेबसाइट अपलोडिंग आणि परवानगी घेण्यातच अर्धा दिवस उलटतो. वेबसाइटची सोपी प्रक्रिया किचकट झाल्याने विभागप्रमुखही वेबसाइटवर महत्त्वाच्या सूचना व कागदपत्रे देण्यास काणाडोळा करत आहेत. 

कंत्राटीवर वेबसाइटचा कारभार 

पीएमआरडीएकडे वेबसाइट व इतर कामकाज पाहण्यासाठी यंत्रणाच नाही. कित्येकदा तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे कामकाज सोपवले जात आहे. वेबसाइटचे कामकाज विद्या ऑनलाइन या खासगी कंपनीला दिले आहे. मात्र, पाच वर्ष उलटूनही या कंपनीकडून कामकाज पूर्ण झाले नाही. अद्याप वेबसाइटचे लायसन्स, सिक्‍युरिटी प्रमाणपत्राबरोबरच विविध प्रमाणपत्रे देखील पीएमआरडीएच्या ताब्यात आले नाहीत. या खासगी कंपनीला वेबसाइटसाठी 13 लाख रुपये पीएमआरडीएने मोजले आहेत. कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे वेबसाइटचे 'तीन तेरा' वाजले आहेत. वेबसाइटसाठी तांत्रिकदृष्ट्या स्वतंत्र विभाग असणे गरजेचे आहे, तो देखील अद्यापपर्यंत अस्तित्वातच आला नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोशल मीडियाला घरघर 

पीएमआरडीएने ट्‌विटर, फेसबुक अंकाउंट काढले. मात्र, ते अपडेट करण्यासाठी वालीच नाही. नियमित कोणत्याही सूचना किंवा नोंदी उपलब्ध सोशल मीडियावर नसतात. सध्या डिजिटलचा जमाना असूनही पीमएआरडीए यापासून कोसो दूरच आहे. बैठकांबरोबरच महत्त्वाच्या अपडेट्‌स सोशल मीडियावर नसतात. उच्च पदस्थ अधिकारीच सोशल मीडिया वापरत नसल्याने उदासीनताच दिसून येत आहे. पीएमआरडीएमध्ये जवळपास सात विभाग आहेत. या विभागांमध्ये नेमके काय कामकाज चालते किंवा त्यांच्या नोंदी नागरिकांपर्यंत पोचत नाहीत. केवळ निविदा प्रकिया अपलोडींग मात्र वेळेत होते. नागरिकांनी अधिक माहितीसाठी pmrda.gov.in या वेबसाइटला भेट दिली असता माहिती मिळेल. तसेच पीएमआरडीएचे ट्टिवटर @officialPMRDA आहे. Pune Metropolitan Region Devlopment Authority या नावाने फेसबुक पेज आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Several errors in PMRDA's website