चिखलीत मुख्य चौकामधील भर रस्त्यावर अनधिकृत पथारीवाल्यांचे अतिक्रमण

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 January 2021

मोशी-देहू रस्त्याचे महापालिकेच्या वतीने 30 मीटरपर्यंत रुंदीकरण करत हा रस्ता मोठा केला आहे. मात्र पथारीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे हा रस्ता अरुंद झाला आहे.

मोशी (पिंपरी चिंचवड) : चिखलीमधील मुख्य चौकामध्ये भर रस्त्यावर पथारीवाले बसतात. परिणामी पादचारी नागरिकांनाही या रस्त्याने चालणे अवघड झाले आहे. स्थानिकांनी या अनधिकृत पथारीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

मोशी-देहू रस्त्याचे महापालिकेच्या वतीने 30 मीटरपर्यंत रुंदीकरण करत हा रस्ता मोठा केला आहे. मात्र पथारीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे हा रस्ता अरुंद झाला आहे. येथे पादचाऱ्यांना चालण्यासाठी तीन मीटर रुंदीचे पदपथही बांधण्यात आलेले आहेत. मात्र या पदपथांवर या रस्त्यालगत असलेले दुकानदार आपल्या दुकानातील माल विक्रीसाठी आपल्या दुकानासमोर असलेल्या पदपथावर विक्रीसाठी ठेवत आहेत. यापुढे जाऊन आणखी काही अनधिकृत पथारीवाले तर आता या पदपथाच्या खाली म्हणजेच भर वाहतुकीच्या रस्त्यावरच पथारी मांडून बसू लागले आहेत. हातगाड्यांमधून विक्री करणारे आपल्या हातगाड्या आडव्या लावतात. त्यामुळे स्थानिक पादचारी नागरीकांना पायी चालणेही अवघड झाले आहे. वाहनचालकांना तर या गर्दीतून कसरत करतच वाहने चालवावी लागत असल्याचे वाहनचालक हरिष वाघ यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

 

रस्त्यालगतच्या पदपथासह भर रस्त्यावरही हे पथारीवाले बसू लागले आहेत. त्यांच्या वस्तू खरेदी करण्यासाठी या विक्रेत्यांभोवती ग्राहक गर्दी करतात त्यामुळेही रस्त्यावरुन चालणे व वाहन चालविणे अवघड होत आहे.
- गणपत बारवकर, चिखली स्थानिक नागरिक

या गर्दीतून वाट काढत चालणे अवघड आहे. त्यातच काही नागरिक बेशिस्तपणे उलट दिशेने चालतात. त्यामुळे महिलांना येथून चालणे अवघड झाले आहे.
- लक्ष्मी थोरात, पादचारी महिला चिखली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The sidewalks and sidewalks at chikhali chowk are always crowded in the evening making it difficult for pedestrians to walk