MP Shrirang Appa Barne : नगरसेवक ते महासंसदरत्न लक्षणीय प्रवास

खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची ‘सकाळ’च्या व्यासपीठावर मुलाखत
MP Shrirang Appa Barne
MP Shrirang Appa Barnesakal

महापालिकेत श्रीरंग आप्पा बारणे पाच वेळा नगरसेवकपदी निवडून आले. सलग दोन वेळा मावळ लोकसभा मतदारसंघातून बाजी मारली. या दहा वर्षांत आठ वेळा संसदरत्न, एक वेळा महासंसदरत्न आणि एक वेळा संसद विशेषरत्न पुरस्कार प्राप्त केला. या कामगिरीबद्दल ‘सकाळ’ने ‘संसदरत्न श्रीरंग आप्पा’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन गुरुवारी (ता. १४) उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ‘सकाळ’चे सहयोगी संपादक जयंत जाधव आणि मुख्य बातमीदार मंगेश कोळपकर यांनी बारणे यांच्याशी संवाद साधला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात चार वेळा नगरसेवक पदावर काम केल्यानंतर दोन वेळा खासदार झालात. त्यावेळी काम करण्याच्या पद्धतीत काही बदल करावा लागला का?

बारणे : माझ्या राजकीय जीवनाची सुरवात माझे थोरले बंधू हिरामणशेठ बारणे राजकारणात होते, तेव्हापासून १९८६ पासून झाला. त्यापूर्वी ते उपसरपंच होते. मी १९९७ मध्ये महापालिकेत निवडून आलो. गेल्या वीस वर्षांमध्ये पाच वेळा महापालिकेच्या निवडणुका लढलो. एकदा काँग्रेस पक्षामध्ये नगरसेवक असताना राजीनामा दिला. त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा नगरसेवक म्हणून निवडून आलो. सगळा राजकीय प्रवास पाहता महापालिका ते लोकसभेच्या पीठासीन अधिकारी पदावर बसण्याचा मान मला मिळाला. मी अनेक स्थित्यंतरे पाहिली. त्यामध्ये स्थायी समितीची निवडणूक मी जवळपास ४२ दिवस लढवली. ती यशस्वीपणे पार पाडली. नंतर चार-पाच वर्षे महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. हा सगळा प्रवास करताना जाणवते की लोकसभा सभागृहातील माझा पाया महापालिकेतच मजबूत झाला होता. त्या अनुषंगाने मला काम करण्याची चांगली संधी मिळाली.

सोळाव्या व सतराव्या लोकसभेत तुमची सर्वोच्च कामगिरी राहिली. ते कसे शक्य झाले?

बारणे : सुरवातीला माझे हिंदी व्यवस्थित नव्हते. हिंदी बोलताना मराठीचे शब्द त्यात यायचे. माझ्या पाठीमागे बसलेले माझे सहकारी मित्र काही मराठी शब्द हिंदीमधून वापरले तर हसायचे. मी म्हणतो, माझा पाया त्यामुळे मजबूत होत होता. मी त्यांना सांगायचो, तुम्ही मला हसा, माझ्या चुका दाखवून द्या. मी पुढे बोलत राहील. नंतर मी अनेक प्रश्न लोकसभेत मांडले आणि पहिल्या दिवसापासून बोलण्याचा प्रयत्न केला. तो आजपर्यंत यशस्वी झाला. तारांकित प्रश्‍न, शून्य प्रहर असतो. त्यामध्ये काही प्रश्न घेता येतात. खासगी विधेयके मांडता येतात. सतराव्या लोकसभेमध्ये मी थोडा सीनियर झालो होतो. माझ्या ज्येष्ठतेमुळे हक्काने मी काही गोष्टी मागून घेत होतो. म्हणून मला बोलण्यासाठी जास्तीत जास्त वेळ मिळत होता.

खासदार निधीचा वापर करण्यात यश कसे मिळाले?

बारणे : खासदाराचा निधी हा सहा विधानसभा मतदारसंघांसाठी वापरला जातो. मागच्या सरकारकडून आम्हाला निधी मिळत नव्हता. मात्र, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर खासदारांना मोठा निधी राज्य सरकारकडून मिळाला. केंद्र सरकारच्या अनेक योजना राज्य सरकारकडून राबविल्या जातात. केंद्र सरकारच्या निधीतून आपण शहरात रस्त्यांचे मोठे जाळे उभे केले आहे. अटल सेतू हा राज्य सरकार व केंद्र सरकारने राबविला आहे. केंद्र सरकारच्या बऱ्याचशा योजना सर्वसामान्यांना माहिती नसतात. कारण त्या लोकप्रतिनिधीला राबविण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे पंतप्रधान घरकुल आवास सारख्या या योजनांचे श्रेय नगरसेवक व आमदार घेतात. मात्र, त्यात ५० टक्के सहभाग हा केंद्राचा असतो.

केंद्र सरकारच्या अर्थ, संरक्षण, पर्यटन, रस्ते वाहतूक, भाषा आदी वेगवेगळ्या समित्यांवर काम करताना काय शिकायला मिळाले?

बारणे : वेगवेगळ्या समित्यांवर काम करण्याची संधी मिळाल्याने अर्थ विषयक, संरक्षणविषयक बाबी शिकायला मिळाल्या. देशातील सर्व भाषा टिकून राहिल्या पाहिजे, या समितीवरही काम केले. सीमेवरील जवानांशी संवाद साधता आला. लढाऊ विमानात बसण्याचा योग आला. या काळात अनेक दिग्गज नेत्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. अनेक अनुभव आले. माझ्या आयुष्यातील हे अनुभव कायमस्वरूपी स्मरणात राहतील.

आठ वेळा संसदरत्न, एक वेळा संसद महारत्न व एक वेळा संसद विशेष रत्न पुरस्कार मिळवण्याची किमया कशी साध्य केली?

बारणे : अरुण जेटली, लालकृष्ण अडवानी, सुषमा स्वराज, अर्जुन मेघवाल अशा दिग्गज नेत्यांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यामुळे सुरवातीला मला वाटले नव्हते की मला हे पुरस्कार मिळतील. परंतु; ठरवले की आपण आपल्या कामावर लक्ष द्यायचे. अनेकांना असे वाटते की, खासदारांचा हा पुरस्कार ‘मॅनेज’ तर नसेल ना! किंवा हा पुरस्कार देत असताना हा विशिष्ट कुणाला तरी डोळ्यापुढे ठेवून दिला का? पण, तसे नाही, ‘लोकसभा डॉट इन’ या अधिकृत संकेतस्थळावर देशातील ५४३ लोकसभा आणि राज्यसभा खासदारांचा डाटा आपल्याला पाहायला मिळतो. खासदाराची उपस्थिती, मांडलेले प्रश्न, विधेयके, चर्चेत सहभाग ही सर्व नोंद होते. किती निधी खर्च केला, तेही रेकॉर्डवर असते. माझे रेकॉर्ड पाहून पुरस्कार मिळाला आहे. मी नऊ वर्षांमध्ये एक नंबर किंवा दोन नंबर असाच क्रमांक सातत्याने गाठत आलेलो आहे.

सर्वच पक्षांतील नेत्यांमध्ये मित्रत्वाचे संबंध कसे?

बारणे : राजकारणामध्ये एका मर्यादेपर्यंत राजकारण ठेऊन मित्रत्वाला प्राधान्य दिले तर आपण सर्वांशी चांगले संबंध ठेवू शकतो. मी राजकारणात आमदार लक्ष्मण जगताप यांच्याशी १० वर्षे संघर्ष केला. मात्र, देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, तुम्ही स्वतः त्यांची भेट घ्या. त्या दिवसापासून मी ठरविले की, राजकारणात कोणालाच विरोधक समजायचे नाही. मी महापालिकेत असताना योगेश बहल यांच्याशी आमचे शाब्दिक वाद व्हायचे, मात्र सभागृहाबाहेर आम्ही कधीच कटुता ठेवली नाही. राजकारण हे क्षणिक असते. संबंध टिकवल्यास त्याचे फायदे होतात. राजकारणात आपल्या सोबत राहणारी लोक हे सातत्याने राहतील असे नाही. मित्रत्वाच्या नात्याने अनेक माणसे जोडण्याचे काम राजकारणात केले, तर आपण विजयी ठरू शकतो. श्रीकांत शिंदे, राम नायडू यांच्यासारख्या नवीन खासदारांसोबतच आठ वेळा निवडून आलेले भर्तृहरी मेहताब हे चांगले मित्र झालेत. त्यामुळे मैत्रीला वयाचे बंधन नाही.

कोणते प्रश्‍न सोडविल्याचे समाधान आहे?

बारणे : राज्यात ठाणे लोकसभा मतदारसंघानंतर मावळ लोकसभेत सर्वात जास्त मतदार आहेत. माझ्या मतदारसंघातील दुर्गम भागात केंद्र सरकारच्या दीनदयाळ ग्रामज्योती योजनेच्या माध्यमातून ६५ कोटींचा निधी नेला. कर्जत तालुक्यातील तुंगी या गावात ७४ वर्षे पाणी व वीज नव्हती. तेथील मतदान केवळ १५-२० एवढे आहे. २५ लाख मतदार असलेल्या मतदारसंघात त्यांच्याकडे कोणी लक्ष दिले नव्हते. मात्र मते किती मिळतात, हे महत्त्वाचे नाही. त्यांना सुविधा देण्याचे काम केले, याचे मला आत्मिक समाधान आहे. मावळमधील धनगरवाड्यात पीएमआरडीएच्या माध्यमातून रस्ता व वीज पोचविले. मी पुणे- लोणावळा रेल्वेच्या तिसरा व चौथा ट्रॅकसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी देहूरोड सेंट्रल पॉंईंट ते वाकडपर्यंत साडेआठ किलोमीटरचा पूल प्रस्तावित आहे. त्यासाठी सहा हजार सहाशे कोटींची निविदा प्रसिद्ध होत आहे. लोणावळा ते चाकणला जाणाऱ्या मार्गावर देखील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने निविदा प्रसिद्ध झाली आहे. इंद्रायणी व पवना उगमापासून स्वच्छ करण्याचा मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने घेतला आहे. येत्या काही दिवसांत तो मी पूर्ण करणार.

उद्धव ठाकरे यांची साथ तुम्ही का सोडली? एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जावेसे का वाटले? त्यावेळी मनात द्वंद्व निर्माण झाले होते का?

बारणे : उद्धव ठाकरे यांनी २०१९ ची निवडणूक झाल्यानंतर वेगळा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांच्यासह आम्हाला तो निर्णय पटला नाही. त्यावेळेस मध्यस्थीची भूमिका मी व माझे सगळे सहकारी करत होतो. त्यामध्ये पक्ष तुटू नये, ही भावना आमची होती. परंतु ते साध्य झालं नाही. आम्ही अडीच वर्षाचा कालावधी हा महाविकास आघाडीचा जवळून पाहिला. आम्हाला निधीच्या बाबतीत राज्य सरकारच्या माध्यमातून कुठल्याच प्रकारचे सहकार्य होत नव्हते म्हणून तो निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला.

राजकारण व समाजकारणात सक्रिय असताना कुटुंबीयांना पुरेसा वेळ देता येतो का?

बारणे : कुटुंबाला जास्त वेळ देता येत नाही, हे खरं आहे. मी बारा-तेरा तास घराबाहेरच असतो. रात्री उशिरा घरी येतो. मुलांना माझ्याशी बोलायचं असेल तर ते वाट बघत बसतात. रात्री बारा-एक वाजेपर्यंत चर्चा करतो. नंतर झोपतो. जेवणसुद्धा कधी एकत्र नसतं. मात्र, सकाळचा नाश्ता आम्ही एकत्र घेतो पण, आम्ही वर्षातून एकदा- दोनदा परिवारासह बाहेर फिरायला जातो. विश्वजित व प्रताप ही माझी दोन्ही मुले आज व्यवसायामध्ये स्वतःच्या पायावर उभे आहेत. सक्षम झाली आहेत. वडील म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो.

घरी पुण्यात असताना आणि दिल्लीत असताना तुमची साधारण दिनचर्या कशी असते?

बारणे : माझा दिवस सकाळी साडेसहाला चालू होतो. दिल्लीत जास्त वेळ वाचन व व्यायामाला जातो. दिल्लीतील वेळापत्रक निश्चित असते. पण पिंपरी-चिंचवडमध्ये वेळा निश्चित नसतात. भेटीसाठी येणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यांना वेळ देणे गरजेचे असते.

पिंपरी-चिंचवड या कर्मभूमीबाबत तुमचे व्हीजन काय?

बारणे : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून देहूरोड सेंट्रल पॉईंट ते वाकडपर्यंत साडेआठ किलोमीटरचा पूल पिंपरी-चिंचवड हद्दीत केंद्र सरकार उभारणार आहे. आगामी कालावधीत प्रशस्त रस्ते, निगडी-किवळे मेट्रो, किवळे-वाकड मेट्रोला हिंजवडीशी जोडणे, नाशिक फाटा ते चाकण मेट्रो व महामार्गावर एलिव्हेटेडचे काम, मेट्रो व रेल्वेचे जाळे संपूर्ण परिसरामध्ये निर्माण करून वाहतुकीचा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. पाण्याची समस्या भविष्यात गंभीर होऊ शकते. त्यासाठी मुळशी धरणातील अतिरिक्त १० टीएमसी साठ्यापैकी पिंपरी-चिंचवडला पाच टीएमसी पाणी देणे, आंद्रा व भामा-आसखेड प्रकल्पातून लवकरात लवकर शहरात २६७ एमएलडी पाणी आणणे, नदी प्रदूषणाची समस्या सोडविण्यावर भर देणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे यायला पाहिजे, अशी मागणी आमदार सुनील शेळके यांनी केली आहे. त्याबाबत तुम्ही काय सांगाल?

बारणे : पक्ष म्हणून प्रत्येक पक्षाच्या नेत्याला, कार्यकर्त्याला उमेदवारी मागणे हा त्यांचा अधिकार आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली आहे, अबकी बार ४०० पार. त्यामुळे प्रत्येक जागा ही महत्त्वाची आहे. कोणी मागत असेल किंवा काही बोलले असतील, त्याच्यावर उलट प्रतिक्रिया मी कधी दिलेली नाही. ज्यांनी मागणी केली, ते आमदार शेळके माझे मित्र आहेत. त्यांनी मला सहकार्य केले आहे. महायुतीचे नेते उमेदवारी घोषित करतील. उद्या किंवा परवा बहुतेक घोषणा होईल. उमेदवार कोण आहे? हे अधिकृतपणे आपल्यासमोर येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com