पिंपरी-चिंचवडमधील पेट्रोल पंपावर साधी हवा बंद; नायट्रोजनची सक्ती 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 January 2021

पिंपरी शहरात रस्तोरस्ती पेट्रोल पंपावर कधी हवा बंद दिसते, तर कधी साध्या हवेसाठीही पैसे आकारले जात आहेत. नायट्रोजन हवा चारचाकी व दुचाकीसाठी योग्य असली, तरी त्यासाठी पंप मालकांनी नेमके किती पैसे आकारावे? याला कोणतीही नियमावली व मर्यादाच नाही.

पिंपरी - शहरात रस्तोरस्ती पेट्रोल पंपावर कधी हवा बंद दिसते, तर कधी साध्या हवेसाठीही पैसे आकारले जात आहेत. नायट्रोजन हवा चारचाकी व दुचाकीसाठी योग्य असली, तरी त्यासाठी पंप मालकांनी नेमके किती पैसे आकारावे? याला कोणतीही नियमावली व मर्यादाच नाही. नायट्रोजन हवेतून पैसे मिळतात म्हणून साधी हवा बंद करून तीस ते शंभर रुपये वाहनचालकांकडून आकारणी होत आहे. 

यासंदर्भात काही वाचकांनी "सकाळ'कडे तक्रारी नोंदवल्या आहेत. निगडी गणेश तलावाजवळील ज्येष्ठ नागरिक दिवाकर देशपांडे, भोसरी लांडे वस्तीतील तुषार गव्हाणे, चिंचवडगाव मोरया गोसावी मंदिर शेजारचे आशिष देव, थेरगाव येथील रमेश चव्हाण, अशोक पेटकर या वाचकांच्या मते, साध्या हवेसाठी पाच ते दहा रुपये आकारले जातात. पंपावर नायट्रोजन हवा भरण्यासाठी दुचाकीसाठी 30 रुपये व चारचाकीसाठी 50 रुपये घेतात. बऱ्याच ठिकाणी साधी हवा बंद असल्याने  चालकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. साधी हवा बंद असल्याचे सूचना फलकही ठिकठिकाणी लावले आहेत. त्यामुळे ऑइल कंपन्यांचे पंप चालकांवर नियंत्रणच राहिलेले नाही. "सकाळ'च्या बातमीदारांनीही काही पंपांवर सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत पाहणी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रसंग 1 
गुरुवार (ता. 21). वेळ सकाळी 1.12 मिनिटे. कासारवाडी बीआरटी बसथांब्या शेजारील पुण्याच्या दिशेकडे जाणाऱ्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर साधी हवा बंद असल्याचा फलक लावला आहे. नायट्रोजन हवेसाठी 30 रुपयाचे दर सांगितले. साध्या हवेची विचारणा केल्यावर ती बंदच असल्याचे सांगितले. तसा फलकही झळकत होता. 

प्रसंग 2 
जुनी सांगवी, दापोडी परिसरातील पंपावर काही ठिकाणी हवा विनामूल्य; तर काही ठिकाणी पैसे घेतले जातात. काही पंपावर नायट्रोजन हवेला पैसे घेतात. या परिसरात दुचाकीसाठी 20 ते 30 व मोठ्या वाहनांसाठी 70 ते 80 रुपये घेतात. साधी हवा मोफत असूनही दुचाकीसाठी 10 रुपये दर आकारले जात आहे. यात इंडियन ऑइल, शेल, एचपी या कंपन्यांचा समावेश आहे. 

प्रसंग 3 
भोसरीतील पुणे-नाशिक सेवा रस्ता, आळंदी रस्ता आणि पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग रस्त्यालगत असलेल्या एचपी, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम पंपावर चाकांमध्ये हवा भरण्याची यंत्रणा सुसज्ज होती. कर्मचाऱ्याने चाकांमध्ये हवा मोफत भरली जात असल्याचे सांगितले. 

प्रसंग 4 
मोशी पेट्रोल पंपावर हवा भरण्याची यंत्रणा नादुरुस्त आहे. हवा भरण्याची टाळाटाळ होत असल्याचे एका वाहनचालकाने सांगितले. मोशी, पुणे-नाशिक महामार्ग, देहू-आळंदी बीआरटीएस मार्ग परिसरामध्ये असलेल्या सहापैकी काही पंपावर हवा भरून मिळत नाही. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हवेचे दरपत्रकच नाही 
साधी हवा काढून त्यात पुन्हा नायट्रोजन हवा भरल्यास 100 रुपये, अगोदरच नायट्रोजन असलेल्या चाकांमध्ये पुन्हा हवा भरण्यासाठी 40 ते 50 रुपये घेतले जात असल्याचे राजा शिवछत्रपती चौकातील पंक्‍चर दुरुस्ती करणाऱ्या दुकानदाराने सांगितले. साध्या हवेसाठी 10 रुपये; तर काही ठिकाणी प्रति टायर 5 रुपये आणि नायट्रोजन हवेसाठी 40 ते 100 रुपये घेतात. हवेचे दर पत्रक मात्र, कुठेच आढळले नाही. 

पिंपरी-चिंचवड शहरात प्रत्येक दुकानांतील दर पत्रकानुसारच हवेचे पैसे घेतले जातात; मात्र नायट्रोजन हवेचे दर ठरलेले नसल्याने वेगवेगळे पैसे आकारत आहेत. 
- उन्नीकृष्णन पिल्ले, सचिव, पिंपरी-चिंचवड टायर असोसिएशन 

सध्या पंपावर नायट्रोजन हवेसाठी दर आकारण्याचे अधिकार पंप चालकांना आहेत. मात्र, ते किती असायला हवेत याविषयी नियमावली आहे. त्याचे तंतोतंत पालन गरजेचे आहे. 
- सागर रुकारी, पेट्रोल डिझेल असोसिएशन, पुणे

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Simple air off nitrogen forced at petrol pump in Pimpri Chinchwad