मावळातील बहीण-भावाच्या नात्याची वीण 'या' कारणामुळे विस्कटली, वाचा सविस्तर

मावळातील बहीण-भावाच्या नात्याची वीण 'या' कारणामुळे विस्कटली, वाचा सविस्तर

कामशेत (ता. मावळ) : तिला माहेरची ओढ... नजरेसमोर माहेरचे अंगण... घर... तुळशी वृंदावन आणि धगधगती चूल... मनात आठवणींचा कल्लोळ... ज्या भावांनी हाताला धरून शाळेत सोडले... त्या भावाच्या हातावर राखी बांधायचा दिवस म्हणजे रक्षाबंधन... आज रक्षाबंधनाचा सण... पण आज ती त्या हातावर राखी बांधायला निघाली नाही... तो भाऊही तिच्या वाटेकडे नजरा लावून बसला नाही... या दुराव्याचे कारण होते... तिचा बापाच्या संपत्तीतील हिस्सा मागणे... संपत्तीच्या या मोहाने बहीण-भावातील नात्यातील वीण गुंफण्याऐवजी विस्कटली. ती तिच्या घरातील अंधाऱ्या खोलीत कोणालाही न दिसता धाय मोकलून रडली, तर तिच्या दादाच्या डोळ्याच्या कडा तिची वाट पाहून पाणावल्या...

ज्या अंगणात तिचे बालपण गेले. जिथे ती लहानाची मोठी झाली. तो माहेरचा उंबरठा तिला पोरका झाला. वयस्कर आई-वडील तर देवाघरी निघून गेले. ज्या दादाने आयुष्यभर चोळी, बांगडी करायची, त्या भावाच्या पुढे राहायची हिंमत ती हरली. तर बहिणीने संपत्ती हिस्सा घेतला म्हणून तिला तडातडा बोलून शिव्या घालणारा भाऊराया आजही त्या बोलण्याने खचून गेला. तिला दोषी ठरवून तिच्यावर रागावलेला बंधूराया खचून गेला. बहीण-भावंडांचा रागरोष वाढला तरीही आजच्या दिवशी हे नातं पुन्हा जागलं, पण बहिणीने भावाला राखी बांधली नाही, की भावाने मोठ्या मनाने तिला व्हिडिओ कॉल केला नाही, हे चित्र मावळाच्या कित्येक घरांनी अनुभवलं. तर कित्येक घराघरात रक्षाबंधन उत्साहात साजरा करण्यात आला. बहीण-भावाच्या नात्याची अतूट वीण राखीच्या धाग्याने आज अधिक घट्ट विणली. बहिणीने भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. भावाने बहिणीच्या संरक्षणाची जबाबदारी घेत, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. घराघरात पुरणपोळीसह नारळाच्या वड्या करण्यात आल्या होत्या. लाडक्या भावाला राखी बांधयला बहिणी मोठ्या प्रेमाने माहेरी आल्या होत्या. बहिणीला साडी-चोळीची भेट देण्यात आली. काही घरांमध्ये हे चित्र असलं, तरी काही ठिकाणी मात्र बहीण-भावाच्या नात्यातील वितंडवाद कायम राहिला. विशेषत: जागा जमिनीच्या वादावरून झालेल्या बहीण-भावाचा दुरावा वाढला आणि तो कायम राहिला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अख्ख्या मावळात जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे वडिलोपार्जित जागा जमिनीत लेकींना हिस्सा देण्याचा निर्णय झाला. हा निर्णय स्तुत्य असला तरी, लेकीची इच्छा नसतानाही त्यांच्या मुलांनी मामांकडे किंवा नवऱ्याने सासऱ्यांकडे हिस्सा मागितल्याने बहीण-भावांच्या नात्यात दुरावा वाढला. नात्यातील हा दुरावा वाढण्याचे प्रमाण कमी असले तरी, रक्षाबंधनसारख्या सणाला दुरावा झालेल्या बहीण-भावाच्या डोळ्याला पाणी येते. पण हे पाणी आता येऊन काय उपयोग. कित्येक विवाहित महिलांनी आई किंवा वडील यांच्या संपत्तीत समान हिस्सा घेतला. त्याचा परिणाम हा त्या नात्यावर झाला. त्यामुळे कित्येक विवाहित महिलांचे माहेरपण बंद झाले. माहेरच्या उंबरठ्यावर जायला त्यांना मज्जाव करण्यात आला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बरं हा दुरावा त्यांनी स्वत: केला आहे, का तर याचं उत्तर नाही असेच येईल. भावाच्या संपत्तीत हिस्सा घ्यावा, असे कोणत्याच बहिणीला वाटत नाही. पण ती अबला ठरले नवऱ्यापुढे, मुलांपुढे. नवऱ्यापेक्षा तिच्या पोटची लेकरं तिच्यावर दबाव आणतात. मामाच्या जमिनीत आईचे नाव आहे. त्याचा हिस्सा मिळाला पाहिजे. तिने मुलांना दाद दिली नाही तर, नवरा दबाव आणतो. असे झाले नाही, तर गावागावातील जमिनीचे दलाल सातबारा उताऱ्यावर नाव असलेल्या भूलथापा देऊन, खोटेनाटे सांगून बहिणीला भावाच्या संपत्तीत हिस्सा घ्यायला भाग पडतात. दोन टक्के कमिशनसाठी बहीण-भावाच्या नात्यातील जखमा कायम खोलवर गेल्या आहेत. त्या काही अजून भरल्या नाहीत. गावागावातील सरपंच, पोलिसपाटील, विविध संस्थांचे अध्यक्ष, राजकीय पक्षाचे पदाधिकारी हेच जमिनी खरेदी-विक्री व्यवसाय करू लागले आहेत. तर सरकारी बाबू तर जमिनीची माहिती दलालांना पुरवतात, अशीही ओरड सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com