पिंपरी-चिंचवडकर म्हणतायेत, 'पाणी ओसरलं, पण दुर्गंधीचं काय?' 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

शहर परिसरात पावसाने विश्रांती घेतली आहे. सखल भागात, सोसायट्यांत साचलेले पाणी ओसरले आहे.

पिंपरी : शहर परिसरात पावसाने विश्रांती घेतली आहे. सखल भागात, सोसायट्यांत साचलेले पाणी ओसरले आहे. घरांमध्ये शिरलेले पाणी नागरिकांनी बाहेर काढले आहे. पण, आता गाळ, दुर्गंधी व डासांचा त्रास होऊ लागला आहे. शुक्रवारी (ता. 16) अनेक घरांमध्ये भांडी, गृहोपयोगी वस्तू धुण्याचे काम सुरू होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बुधवारी (ता. 14) रात्री शहर परिसरात सुमारे साडेतीन-चार तास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नाल्यांना पूर आला. रस्त्यांवर पाणी साचले होते. सखल भागातील व नाल्यांच्या काठांवरील घरांमध्येसुद्धा पाणी शिरले होते. अनेकांच्या दुचाकी व चारचाकी पाण्याखाली गेल्या होत्या. तब्बल 41 ठिकाणी पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे नागरिकांनी रात्र जागून काढली होती. गुरुवारी (ता. 15) दिवसभर पाण्याचा निचरा करून गाळ साफ करण्याची कामे सुरू होती. रस्ते व सोसायट्यांमधील सांडपाणी वाहिन्यांचे चेंबर मोकळे करण्याचे काम मजूर करीत होते. काही घरांमध्ये अडीच-तीन फुटांपर्यंत पाणी शिरल्याने गृहोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे भिंती सादळल्या असून, ओलावा निर्माण झाला आहे. दुर्गंधीही पसरली आहे. आरोग्य विभागातर्फे कीटकशानक व जंतुनाशक फवारणी व धुरळणीचे काम सुरू होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आमच्या भागातील सर्वच घरांमध्ये पाणी शिरले होते. आता पाणी ओसरले आहे. मात्र, घरांमध्ये गाळ साचला होता. तो साफ करून घरांची साफसफाई सुरू आहे. यापुढे रस्त्यांवरील चेंबर तुंबून अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेने प्रयत्न करायला हवेत. 
- अरुण काळे, दत्तवाडी, आकुर्डी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Situation in Pimpri Chinchwad after rains