हिंजवडी आयटी पार्क परिसरात साडेसहा लाखांचा गांजा जप्त

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 September 2020

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गांजा बाळगणाऱ्या एकाला हिंजवडी आयटी पार्क परिसरातून अटक केली.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गांजा बाळगणाऱ्या एकाला हिंजवडी आयटी पार्क परिसरातून अटक केली. त्याच्याकडून साडेसहा लाख रुपये किमतीचा 25 किलो गांजा जप्त केला आहे. 

योगेश्वर गजानन फाटे (वय 23, रा. सर्व्हे नंबर 101, जनता वसाहत, गोखलेनगर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. हिंजवडी आयटी पार्क परिसरातील बोडकेवाडी येथील फेज दोनमधील हायकल कंपनीच्या संरक्षक भिंतीजवळ एक जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून योगेश्वरला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सहा लाख 40 हजार 150 रुपये किमतीचा 25 किलो 606 ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. 

ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पोळ, सहायक निरीक्षक प्रशांत महाले, सहायक फौजदार शाकीर जिनेडी, कर्मचारी राजन महाडीक, प्रदीप शेलार, राजेंद्र बांबळे, शकुर तांबोळी, संदीप पाटील, संतोष दिघे यांच्या पथकाने केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: six and a half lakh cannabis seized in hinjewadi it park area