Baba Kamble
Baba KambleSakal

सोशल मिडियावर फिरणारे छायाचित्र खोटे; एकनाथ शिंदे नव्हे हे तर बाबा कांबळे

विविध समाज माध्यमांवर रविवारपासून एक कृष्णधवल छायाचित्र जोरदार चर्चेत आले आहे.
Summary

विविध समाज माध्यमांवर रविवारपासून एक कृष्णधवल छायाचित्र जोरदार चर्चेत आले आहे.

पिंपरी - विविध समाज माध्यमांवर रविवारपासून एक कृष्णधवल छायाचित्र जोरदार चर्चेत आले आहे. आपल्या रिक्षा समोर उभा असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे २५ वर्षांपूर्वीचे दुर्मिळ छायाचित्र असा मजकूर यासोबत आहे. मुख्यमंत्री शिंदे तरुण वयात रिक्षाचालक होते. त्यामुळे लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत कौतुक केले आहे. मात्र, `सकाळ’ने याची खातरजमा केल्यावर समजले ही माहिती तद्दन खोटी असल्याचे लक्षात आले.

छायाचित्रात शिंदे नव्हे तर पिंपरी-चिंचवड शहरातील बाबा कांबळे आहेत. ते महाराष्ट्र रिक्षा पंचायत समितीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ही त्यांची स्वत:ची पहिली रिक्षा आहे. एमएच १४- ८१७२ असा तिचा नंबर आहे.

१९९७ साली पिंपरी चौकात रातराणी रिक्षा थांबा होता. त्याकाळी शहर इतके विस्तारलेले नव्हते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नव्हती. लोकसंख्या कमी. गावागावांमध्ये अंतरही खूप होते. पुणे-मुंबई जुना मार्गावरील पिंपरी चौक हा महत्त्वाचा भाग. या दोन्ही मोठी शहरातून येणाऱ्या एसटी बसचा मुख्य थांबा हा चौकच होता. त्यामुळे मुंबईहून रात्री येणारे प्रवासी येथे उतरत. त्यांना आपापल्या भागात जाण्यास सोयीचे व्हावे म्हणून काही रिक्षा चालकांनी मिळून रातराणी हा रिक्षा थांबा तयार केला. रात्री अकरा ते सकाळी सहा अशी याची वेळ होती. यामुळे लोकांची गैरसोय टळली. लोक येथे उतरून रिक्षाने आताची उपनगरे बनलेल्या आणि त्यावेळी ती गावे असलेल्या भागात जायचे. या रिक्षा थांब्याची कल्पना ज्यांना आली ते म्हणजे बाबा कांबळे. तेच संस्थापक-अध्यक्ष बनले.

आता या छायाचित्रा विषयी! श्रावण महिन्यात पूजाअर्चा असतात. या काळात रिक्षाचालकही वर्गणी काढून एका सोमवारी मंडप उभारून पूजा घालतात. महाराष्ट्रात ही प्रथा आजही आहे. यादिवशी सर्व चालक आपापल्या रिक्षा स्वच्छ धुवून आणि विशेष सजावट करून आणतात. त्या ठिकाणी सामुहिक पूजा होते. त्यावेळचा म्हणजे १९९७ मधील श्रावण महिन्यामध्ये रातराणी रिक्षा थांब्यासमोर बाबा कांबळे यांचे स्वतःच्या रिक्षा सोबतचे छायाचित्र आहे. आणि हेच समाज माध्यमावर रविवारपासून फिरू लागले.

छायाचित्र पसरल्याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री शिंदे तरुणवयात रिक्षाचालक होते. यातूनच ते शिवसेना कार्यकर्ता बनले. तेव्हापासून त्यांनी दाढी राखलेली आहे. आणि छायाचित्रात दिसणारे कांबळे यांनीही तरुणवयात त्यावेळी ठेवलेली होती. हे साम्य दिसते. कांबळे यांना या छायाचित्राविषयी अजिबात माहिती नव्हती. मात्र विविध संघटनांच्या माध्यमातून त्यांची महाराष्ट्रभर भ्रमंती असते. सोशल मिडियावर त्यांचे शेकडो ग्रुप आहेत. याच ग्रुपवर हे छायाचित्र विविध ठिकाणांहून येत राहिले. स्वतःचेच छायाचित्र मुख्यमंत्री म्हणून आल्याने ते सुरूवातीला दचकले. मात्र, त्यावरील मजेशीर प्रतिक्रिया वाचून त्यांना मजाही आली. कांबळे यांच्याशी अगदी सुरूवातीपासून परिचय असणाऱ्या व्यक्तींनी त्यांना ओळखले मात्र, अल्पावधीत छायाचित्र इतक्या दूर गेले की खुलासा करता करता साऱ्यांची पुरेवाट झाली आहे.

कांबळे यांचे शिक्षण आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेत झाले आहे. गावोगावी त्यांचे कीर्तनाचे कार्यक्रम होत. १९९७ साली त्यांनी रिक्षाचालक म्हणून अर्थार्जनाचा मार्ग निवडला. बाबा आढाव, शरद राव या कामगार नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम केले. २००७ मध्ये महाराष्ट्र रिक्षा पंचायत संघटनेची स्थापना केली. आता ते कष्टकरी कामगार पंचायत, टपरी-पथारी हातगाडी पंचायत, बांधकाम कामगार पंचायत, हमाल-माथाडी कामगार संघटना यांचे ते अध्यक्ष आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com