महावितरणच्या डिपीजवळच साठतायेत भंगार; आग लागण्याचा धोका

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 January 2021

मोशी, चिखली, जाधव वाडी, कुदळवाडी आदी परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर भंगार मालाची गोडाऊन आहेत. या गोडाऊन मध्ये तसेच या गोडाऊनच्या बाहेरही हे गोडाऊन मालक मोठ्या प्रमाणावर भंगार माल साठवतात. 

मोशी : जाधववाडी-चिखली रस्त्यावरील एका उच्च दाब विद्यूत रोहित्राजवळ मोठ्या प्रमाणावर भंगार साठविण्यात आले आहे. काही कारणास्तव यदाकदाचित जर या विद्यूत रोहित्राचा स्फोट झाला आणि त्यातून विजेच्या ठिणग्या पडल्या तर याठिकाणी मोठी आग लागून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधितांवी वेळीच उपाययोजना करत ही मोठी दुर्घटना होण्यापासून थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी पादचारी नागरीक बबन पाटील, संजय हाके, दिनेश केदार आदींनी केली आहे. 

मोशी, चिखली, जाधव वाडी, कुदळवाडी आदी परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर भंगार मालाची गोडाऊन आहेत. या गोडाऊन मध्ये तसेच या गोडाऊनच्या बाहेरही हे गोडाऊन मालक मोठ्या प्रमाणावर भंगार माल साठवतात. 

त्यातच या ठिकाणी विविध कारणांनी आजपर्यंत मोठमोठ्या आगी लागण्याचे प्रकार या अगोदर घडलेले आहेत. या आगीमध्ये अनेक आर्थिक हानी झालेली असताना मात्र  जाधववाडी-चिखली या रस्त्यावरील एका गोदाम मालकाने आपला भंगार माल येथील महावितरणच्या एका उच्च दाब विद्युत रोहित्राचा अगदी खेटूनच मोठ्या प्रमाणावर भंगार साहित्य ठेवले आहे. 

ही बाब अत्यंत धोकादायक असून या विद्युत रोहित्राचा जर कोणत्याही कारणास्तव स्फोट झाला अन त्यातून बाहेर पडलेल्या आगीमुळे जर येथील या भंगार मालाने पेट घेतला तर मोठी आगीची दुर्घटना घडू शकते. या रस्त्याने पादचारी नागरिक ये-जा करत असून वाहतूकही सुरु असते. त्यामुळे संबंधितांनी या भंगार गोडाऊन मालकाला समज देत येथील भंगार उचलण्यास सांगून संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी स्थानिक नागरिकांसह पादचारी नागरिकांनी केली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Source text Possibility of fire due to placing scrap material near MSEDCL high pressure power plant

Tags
टॉपिकस
Topic Tags: