लाच स्विकारताना स्थायी समिती अध्यक्ष व स्वीय सहायकासह पाच जण ताब्यात

ठेकेदाराकडून एक लाख १८ हजार रुपयांची लाच स्विकारताना स्थायी समिती अध्यक्षांच्या स्वीय सहायकासह चार जणांना सापळा लावून रंगेहाथ पकडले.
PCMC
PCMCSakal

पिंपरी - ठेकेदाराकडून (Contractor) एक लाख १८ हजार रुपयांची लाच (Bribe) स्विकारताना पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षांच्या (Standing Committee Chairman) स्वीय सहायकासह चार जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता. १८) सापळा लावून रंगेहाथ पकडले. त्यांच्यासह अध्यक्षांना ताब्यात घेतले आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, त्यांचा स्वीय सहायक व मुख्य लिपिक ज्ञानेश्‍वर किसनराव पिंगळे, लिपिक विजय शंभुलाल चावरिया, संगणक चालक राजेंद्र जयंतराव शिंदे आणि शिपाई अरविंद भीमराव कांबळे यांना ताब्यात घेतले आहे. जाहिरात फलक उभारणी ठेकेदार तरुणाने तक्रार केली आहे. महापालिकेच्या जागेत होर्डिंग्ज उभारणीसाठी त्यांनी २८ निविदा भरल्या होत्या. त्या मंजूर आहेत. त्यांची वर्क ऑर्डर न निघाल्याने ठेकेदार हे लांडगे व पिंगळे यांना भेटले होते. त्यांनी वर्क ऑर्डर मिळवणे व करारनाम्यावर सही करण्यासाठी निविदा बोली रकमेच्या तीन टक्के रक्कम दहा लाख रुपयांची मागणी केली.

PCMC
बुधवारी पिंपरी-चिंचवड शहरात १७२ नवीन रुग्ण

तडजोडीअंती दोन टक्के रक्कम सहा लाख रुपये घेण्याचे मान्य केले. त्यातील सहा करारनाम्यांच्या फाईल्सवर सही शिक्का देण्यासाठी दोन टक्के प्रमाणे एक लाख १८ हजार रुपयांची मागणी केली. ती चावरिया, शिंदे व कांबळे यांच्या मार्फत स्विकारल्यावर त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे १३ ऑगस्टपासून पडताळणी सुरू होती. त्यानुसार बुधवारी सापळा लावून कारवाई करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक सीमा मेहेंदळे तपास करीत आहेत. त्यांच्यासह पोलिस उपअधीक्षक श्रीहरी पाटील, पोलिस निरीक्षक गिरीश सोनवणे, हवालदार सरिता वेताळ, अश्पाक इनामदार, अंकूश माने, नाईक अविनाश इंगुळकर, कर्मचारी चंद्रकांत कदम यांच्या पथकाने पोलिस उपायुक्त राजेंद्र बनसोडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुरज गुरव व सुहास नाडगौडा यांच्या नेतृत्वाखाली कारवाई केली.

शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास टोल फ्री क्रमांक १०६४, दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१२२१३४, ०२०-२६१३२८०२ आणि पुणे व्हॉट्सऍप क्रमांक ७८७५३३३३३३ व मुंबई क्रमांक ९९३०९९७७०० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिस उपायुक्त राजेंद्र बनसोडे यांनी केले आहे.

PCMC
पिंपरी चिंचवड महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक बैठक बुधवारी दुपारी दोन वाजता ऑनलाइन झाली. त्यानंतर आयुक्तांच्या दालनात नदी सुधार प्रकल्पाबाबत सादरीकरण झाले. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सादरीकरण संपवून स्थायी समिती अध्यक्ष व अन्य पदाधिकारी त्यांच्या दालनात आले. त्यानंतर अवघ्या पाच-दहा मिनिटांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थायी समिती अध्यक्षांचे स्वीय सहायक व अन्य चौघांना ठेकेदाराकडून पैसे घेताना पकडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com