विद्यार्थ्यांची पोर्टलवर नोंद होईना! IStudent | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Online

विद्यार्थ्यांची पोर्टलवर नोंद होईना!

पिंपरी - शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या ग्राह्य धरून, संचमान्यता ३० सप्टेंबरपर्यंत केली जात असते. मात्र संकेतस्थळालाच ‘एरर’ आल्यामुळे नवीन विद्यार्थी नोंदणीसाठी रात्रंदिवस ऑनलाइन बसण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली. दुसरीकडे शिक्षण विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे कित्येक शाळांमधील विद्यार्थ्यांची पोर्टलवर नोंद झाली नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

सरकारच्या शालेय विभागाच्या सूचनेनुसार ३० सप्टेंबरपर्यंत शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या ग्राह्य धरून संचमान्यता करणे आवश्‍यक होते. मात्र, महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या नियोजनाच्या अभावामुळे वेळेत टॅब उपलब्ध झाले नाहीत. शेवटच्या दिवशी पाच तासांसाठी टॅब उपलब्ध झाला, पण संकेतस्थळाला ‘एरर’ आल्यामुळे कित्येक शाळांची नवीन विद्यार्थ्यांची पोर्टलवर नोंद झालेली नाही. नवीन विद्यार्थी नोंदणीसाठी शिक्षक मेटाकुटीला आले आहेत. या प्रकाराबाबत अनेक शिक्षक तक्रारी करीत आहेत.

अन्यथा शिक्षक अतिरिक्त

शैक्षणिक वर्ष सुरू होऊन चार महिने झाले आहेत. प्रत्यक्षात वर्ग सुरू नसले तरीही ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. शासनाने सुरू केलेल्या पोर्टलवर शाळांच्यावतीने विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती विद्यार्थी पोर्टलमध्ये भरण्यात येते. यासाठी सरकारच्या पोर्टलचे नियंत्रण विभागस्तरावर केले जात असते. नवीन टॅब उपलब्ध करून दिल्याशिवाय दुसरीपासून पुढील इयत्तेतील विद्यार्थिसंख्या अद्ययावत करता येत नाही. परराज्यांतून आलेले विद्यार्थी, वयानुरूप प्रवेश घेतलेले विद्यार्थी किंवा पोर्टलवर नोंद नसलेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंद करता येत नाही. विद्यार्थी पोर्टलवर असलेल्या विद्यार्थिसंख्येवरून शासनाच्यावतीने शाळांची पटसंख्या निश्चित केली जाते. पोर्टलवर नोंद असलेल्या विद्यार्थ्यांनाच विद्यार्थी लाभाच्या योजना दिल्या जातात. तसेच शिक्षक व शिक्षकेतर संचमान्यता करण्यात येत असते. त्यामुळे काही शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे.

टॅग्स :educationportal