
Sudhir Mungantiwar : मराठी जगभरात पोहचण्यासाठी पोर्टल उभे करणार; सुधीर मुनगंटीवार
पिंपरी : जगातील बोली भाषत आपली मराठी १० व्या क्रमांकावर आहे. मराठी भाषा सांस्कृतिक शक्ती, ऐतिहासिक वारसा सांगणारी, प्रचंड वांडमय, आध्यात्म देणारी आहे. मराठीची ही शक्ती विश्वकल्याणासाठी आहे.
ही भाषा ज्ञानाची व्हावी. मराठीच्या श्रेष्टत्वासाठी, जगभरात पोहचण्यासाठी राज्य सरकार वेगाने पोर्टल उभे करणार असल्याची घोषणा महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी (ता. ८) पिंपरी येथे केली.
जागतिक मराठी अकादमी आणि पुणे-पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ आयोजित ‘शोध मराठी मनाचा मनाचा २०२३’ १८ व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार, गोव्याचे सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे, माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे, स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, उपाध्यक्ष गिरीश गांधी, अमेरिकेतील बृहन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष संदिप दीक्षित, डॉ. सोमनाथ पाटील, डॉ. यशराज पाटील उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले की, जगातील हजारो भाषा नष्ट होण्याची भिती व्यक्त केली जाते, केवळ २०० ते ३०० भाषा राहतील असे बोलले जात आहे. त्यामुळे ‘स्टोरी टेल’ प्रमाणे ‘महाराष्ट्र टेल’ ॲप बनविण्याचा विचार आम्ही केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला २०२४ मध्ये ३५० वर्षे पुर्ण होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्यभिषेकात रस नव्हता. राजमाता जिजाऊ यांनी त्यांना महत्व समजावून सांगितले. त्यानिमित्ताने सांस्कृतिक विभागातील पोर्टलवर जिाजऊंचा हा भाग घेणार आहोत.
जगातील सासंकृतिक वारस्यात आम्ही पहिल्या १० मध्ये आहोत. अशावेळी ज्ञानेश्वर मुळे यांनी फक्त चारच मागण्या केल्या. महाराष्ट्र सरकार तुमच्या पाठीशी राहील. मराठीत इतके ज्ञान आहे की जगातील संपत्ती ओवळून टाकली तरी ती कमी पडणार आहे. मराठी पाऊल पडते पुढे या पध्दतीने आपणाला काम करायचे आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, मराठी माणूस हा देशात, जगात कसा पुढे जाईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जिल्हा पातळीवर आम्ही ‘प्री आयएएस ट्रेनिंग सेंटर’ सुरु केले आहेत. त्यातील सहा केंद्र चांगली उभी राहत आहेत.
दिल्लीत युपीएससीची तयारी मराठी मुलांना आम्ही शिष्यवृत्ती देतोय. मराठी माणूस शिक्षणानंतर नोकरीतच अडकतो. धंदा-व्यावसायात कमी पडतो. बाहेर देशात सोडा राज्याच्या नव्हे तालुक्याच्या बाहेर जायला नको म्हणतो. देशात, जगात मराठी टक्का वाढवायचा असेल तर; धाडस केले पाहिजे. मराठी माणूस पुढे जाण्यासाठी पाठींबा देण्याची व्यवस्था केली पाहिजे.
गोविंद गावडे म्हणाले की, जीवनात पुढे जायचे असेल तर मातृभाषा खुप महत्वाची आहे. भाषाच नसती तर काय झाले असते, माणूस व प्राणी यात फरक राहिला नसता. भाषेमुळे माणूस जगाला समजू लागला. माणसाने जेवढ्या भाषा येतील तेवढ्या शिकाव्यात. मात्र; मन, डोळे मातृभाषेलाच जोडलेले असावेत.
दत्तोपंत ठेंगडी यांनी मराठी संवर्धनासाठी, पुढे नेण्यासाठी सूचविलेल्यस सूचना आजही लागू पडत आहेत. गोव्यातील फर्मागढी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांचा इतिहास चित्रफितीच्या माध्यमातून मांडण्याचा आमचा विजार आहे. मराठी पाउल पुढे पडावे हाच आमचा मानस आहे.
प्रास्तविकात ज्ञानेश्वर मुळे म्हणाले की, जगात ३ कोटी २० लाख भारतीय आहेत. तर १० लाख मराठी लोक विविध देशात आहेत. त्यांच्यासाठी आपण काही तरी केले पाहिजे. भारतभर पसरलेल्या महाराष्ट्राच्या, मराठीच्या खुणा ग्वाल्हेर, इंदौर, अटक ते कटक, तंजावर आदश हरात आहेत. याची यादी करुन त्या स्मारकांची माहिती नवीन पिढीला द्यावी.
देशाला वैचारीक परंपरा देण्याची गरज आहे. देशात विविध ठिकाणीची मराठी मंडळे बरखास्त होवू लागलीत, अशा संस्थांना सरकारने मदत करावी. दिल्लीत १० हजार मराठी मुले-मुली युपीएससी परिक्षेची तयारीसाठी येतात. त्या विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह, र्नालेज संकुल उभे करावे.
संमेलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या अकादमीच्या पदाधिकाऱ्यांचा व विद्यापीठातील प्राध्यापकांचा प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. डॉ. पी. डी. पाटील यांनी स्वागत केले. सूत्रसंचालक स्नेहल दामले यांनी केले. सचिन इटकर यांनी आभार मानले.