प्रभावशाली नेतृत्व

Sunil-Shelake-with-Ajit-Pawar
Sunil-Shelake-with-Ajit-Pawar

अजितदादा पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावशाली नेतृत्व आहे. राज्यातील प्रत्येक समाज बांधवांना न्याय कशा पद्धतीने देता येईल, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेत असताना शेतकरी बांधवांना न्याय कशा पद्धतीने देता येईल, अशी नेहमी तळमळीची भावना असणारे दादा आहेत. आज उपमुख्यमंत्री म्हणून काम करणारे दादा मी जवळून पाहतो आहे. ते वेळेला व दिलेल्या शब्दाला महत्त्व देत आहेत. ज्या व्यक्तीला वेळ देतील, त्या वेळेला त्या व्यक्तीसाठी दादा हजर असतात. ज्याला शब्द देतील तो शब्द पूर्ण करणे ही दादांची ख्याती आहे. प्रशासनावर असलेली दादांची पकड वाखाणण्याजोगी आहे. सध्या महाराष्ट्राच्या हितासाठी जे निर्णय घेतले, ते अमलात आणणारच, ही त्यांची वेगळी ओळख आहे. दादांना मी जे जवळून अनुभवले ते म्हणजे, त्यांच्या कामाचा आवाका व निर्णय क्षमता म्हणून. दादांशी माझा आठ-दहा महिन्यांपूर्वी संबंध आला. म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंधरा दिवस अगोदर. पण, माझ्यासारख्या युवकांनी किंवा लोकप्रतिनिधींनी दादांकडे पाहून शिकणे किंवा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणे, हे नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मावळ लोकसभा मतदारसंघातून खासदारकीसाठी जेव्हा पार्थ पवार उभे होते. तेव्हा दादांचा मला फोन आला होता. ते म्हणाले, ‘पार्थ उभा आहे. त्याला तुम्ही मदत करा.’ तेव्हा मीही दादांप्रमाणे स्पष्टपणे बोललो की, ‘दादा मी भाजपचा जबाबदार पदाधिकारी आहे. माझ्याकडून कुठलीही अपेक्षा ठेऊ नका. मी माझ्या पक्षाचे काम करायला बांधील आहे.’ त्यावेळी दादा म्हणाले होते, ‘ठीक आहे, मदत करू नका. पण काही सहकार्य करता आले तर करा.’ हे माझे आयुष्यातील दादांबरोबरचे पहिले संभाषण. नंतर काही महिन्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून मी पूर्ण इच्छुक होतो. आणि जर प्रकर्षाने डावलले तर काय करायचे? हेही मनात निश्चित केले होते. त्या दृष्टीने निवडणुकीच्या पंधरा दिवस अगोदर दादांशी फोनवर संपर्क साधला. मी त्यांना म्हणत होतो, ‘मला पुरस्कृत करा. पक्षाने मला डावलले तर राष्ट्रवादीचा मला पाठिंबा द्या.’ त्यावेळी ते म्हणाले होते की, ‘पाठिंबा बिठिंबा मी काही देणार नाही. तिकिट घेऊन लढणार असाल तर मी देतो.’ मी त्यांना म्हणालो, ‘मला राष्ट्रवादीचे तिकिट नको आहे. ठिक आहे, पुढे बघू,’ म्हणत त्यांनी फोन ठेवून दिला. काही तासांनी भाजपची मावळातील उमेदवारी जाहीर झाली. त्या दिवशी रात्री साडेदहा अकराला दादांचा फोन आला, ‘सुनील काय करतोय? मी म्हणालो, ‘निवडणुकीत उभे राहणे माझे ठरले आहे. कार्यकर्त्यांशी बोलून उद्या कळवतो.’ दुसरा दिवस उजाडला. कार्यकर्त्यांसोबत मिटिंग चालू आहे आणि दादांचा फोन आला. त्यांनी माझी उमेदवारी फायनल करून टाकली. दुपारी तीन-चारच्या सुमारास दादांना भेटायला गेलो. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्यत्व दिले. तेव्हापासून आजपर्यंत दादांची आणि माझी भेट होत गेली. दादा मला भावत गेले. समजत गेले.

दादा वेळेला खूप महत्त्व देतात. याचा अनेकदा अनुभव आला. सुरुवातीला मला याबाबत माहीत नव्हते. दादांनी एकदा दहाची वेळ दिली. मी साडेदहाच्या सुमारास पोचलो. एकदा दुपारी एकची वेळ दिली, मी दीड-पावणेदोनला पोचलो. पण, दादा दिलेल्या वेळेत हजर झालेले होते. तेव्हा कळले की, दादा वेळेला खूप महत्त्व देतात. तेव्हापासून मीही वेळेला महत्त्व देऊ लागलो. प्रत्येक वेळेला दादांनी दिलेल्या वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर त्या ठिकाणी हजर राहू लागलो. हजर राहतो आहे.

दादा जो निर्णय घेतील तो मान्य करणे, त्याच्याशी ठाम राहणे. कारण, जे काम हाती घेतले आहे, ते काम पूर्ण करणे, हा त्यांचा स्वभाव आहे. दादा अनेकदा कार्यकर्त्यांवर, सहकाऱ्यांवर रागावतात, हा स्वभाव आता सर्वांना मान्य झाला आहे. जे आहे ते तोंडावर बोलायचे, असा त्यांचा स्वभावही सर्वांना मान्य केला आहे. समजा, मी कोणाविरुद्ध तक्रार केली किंवा इतरांनी कोणी केली की, ते दोघांनाही समोरासमोर बोलविणार. मागेपुढे, छक्केपंजे असे काही नाही. जे आहे ते स्पष्टपणे तोंडावर बोलतात. असे असले तरी, दादा हे व्यक्तिमत्व खूप हळव्या स्वभावाचेही आहे. हळव्या स्वरुपाचे आहे. संवेदनशील मनाचे आहे. एखाद्या कुटुंबातील वडीलधारी मंडळी जशी, रागावते व लगेच माया लावते, असा त्यांचा स्वभाव आहे.‌ त्यामुळे अनेक कार्यकर्ते असे आहेत की, दादा कितीही रागावले, ओरडले तरी ते दादांना सोडून जात नाहीत.

राजकीय जीवनात किंवा कारकिर्दीत दादांकडून एकच अपेक्षा केली की, माझ्या मावळ तालुक्याला न्याय द्या. माझा तालुका मला विकसित करायचा आहे. माझ्या तालुक्यातील युवकांनाही रोजगार मिळाला पाहिजे. त्यावेळी दादांनी एकच सांगितले की, ‘सुनील, बारामती तालुका असेल, जुन्नर तालुका असेल, इतर तालुक्यांप्रमाणे तुला देखील झुकते माप देईन.’ मलाही अभिमानाने सांगायला आवडेल की, बारामती, इंदापूर, आंबेगाव तालुक्यांखालोखाल माझ्या मावळ तालुक्याला देखील दादांनी न्याय दिलेला आहे. पहिल्याच अर्थसंकल्पात भरीव तरतूद दिली आहे. या लाॅकडाउनच्या काळात सुद्धा अनेक प्रकल्प दादांनी मार्गी लावले, हे आवर्जून सांगायला मला नक्कीच अभिमान वाटतो.

मावळातील पवना धरणग्रस्तांच्या तीन पिढ्यांचा प्रश्न आजपर्यंत सुटलेला नव्हता. तो आता दादा मार्गी लावत आहे. येणाऱ्या काही दिवसांत तो सुटणार आहे. या आठ महिन्यांत तालुक्यातील सहा पूल मंजूर केले. लोणावळा व कान्हे फाटा येथील उपजिल्हा रुग्णालये मंजूर केली. सात-आठ वर्षांपासून हे प्रश्न रखडले होते. आजपर्यंत एक पेपरही हलत नव्हता. सहा महिन्यांत प्रश्र्न मार्गी लावला आहे. जवळपास 63 कोटी रुपये त्यासाठी मंजूर केले आहेत.

आम्ही राजकीय व्यक्ती म्हणून दादांकडे पाहात नाही, तर कुटुंबवत्सल म्हणून पाहत असतो. कारण, त्यांच्या जवळ ज्युनिअर, सिनिअर असा भेदभाव नाही. आम्ही इतकी वर्षे राजकारणात आहोत, तुम्ही आता आमदार झालात, असा भेद त्यांनी कधी ठेवला नाही. ते कायम सलोख्याने व आपुलकीने वागतात. पुन्हा एकदा सांगतो, ज्या दादांवर मावळ तालुक्यातील, पुणे जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी कायम आरोप केले. कायम दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत आले. दादांबाबत राजकारण करत आले. त्याच नेत्यांनी दादांना सोबत घेऊन, महाराष्ट्राच्या विकासाचा दृष्टिकोन दादांकडे आहे, हे स्वीकारून सत्ता स्थापन केली. त्याच दिवशी दादाही मला भावले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com