पिंपरी-चिंचवडमधील पथारीवाल्यांचे सर्वेक्षण नोव्हेंबरमध्ये; खासगी संस्थेची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 October 2020

  • खासगी संस्थेतर्फे सर्वेक्षण करून महापालिका देणार ओळखपत्रे 

पिंपरी : पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी शहरातील पथारीवाल्यांचे सर्वेक्षण नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात केले जाणार आहे. त्यानुसार हॉकर्स झोन निर्माण केले जाणार आहेत. सर्वेक्षणासाठी महापालिकेतर्फे खासगी संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

महापालिकेने 2012-13 मध्ये शहरातील टपरी, हातगाडी, पथारी व फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले होते. त्यानंतर बायोमेट्रीक सर्वे झाला. पात्र-अपात्र लाभार्थी ठरविण्यात आले. मात्र, हॉकर्स झोनचा विषय कागदावरच राहिला आहे. आता पुन्हा खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्याचा कालावधी 30 दिवसांचा असेल. महापालिका मतदान वॉर्डनिहाय सकाळी आठ ते रात्री दहा या वेळेत सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धती वापरली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पथविक्रेत्याचा व्यवसाय, त्याच्या छायाचित्रासह माहिती भरायची आहे. यासाठीचे मनुष्यबळ संस्थेने पुरवायचे आहे. महापालिका केवळ अर्जाचा नमुना व ऑनलाइनसाठी सॉफ्टवेअर उपलब्ध करून देणार आहे. माहिती संकलित करणे, अपलोड करणे, ओळखपत्र देणे, हॉकर्स प्रमाणपत्र देणे, त्यात दुरुस्त्या करण्याचे काम संस्थेने करायचे आहे. या अंतर्गत ओळखपत्रासाठी 20 रुपये, हॉकर्स प्रमाणपत्रासाठी लॅमिनेशसह 25 रुपये आणि मनुष्यबळासाठी 75 रुपये असे 120 रुपये खर्च येणार आहे. 

यापूर्वी 10188 विक्रेते 
महापालिकेने 2012-13 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार 10 हजार 188 जणांची नोंदणी झाली होती. त्यातील पाच हजार 900 जणांचे बायोमेट्रिक पूर्ण झाले होते. एक हजार 270 जण अपात्र ठरले होते. चार हजार 288 जणांचे बायोमेट्रिक राहिले होते. त्या वेळी सहा बाय चार फूट लांबी-रुंदीचा गाळा देण्याचे ठरले होते. मात्र, हॉकर्स झोनची ठिकाणे निश्‍चित न झाल्याने हा विषय केवळ कागदावरच राहिला होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पदपथांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यास बाधा आली आहे. हॉकर्स झोनची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी नव्याने सर्वेक्षण केले जाणार आहे. 
- संतोष लोंढे, अध्यक्ष, स्थायी समिती, महापालिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Survey of street vendors in Pimpri-Chinchwad in November