मावळातील 'या' चौदा गावांमध्ये होणार उद्यापासून सर्वेक्षण

ज्ञानेश्वर वाघमारे
Tuesday, 22 September 2020

कोरोना रुग्ण संखेचे हॉटस्पॉट ठरलेल्या तळेगाव, वडगावसह चौदा गावांमध्ये बुधवारपासून ( ता. २३ ) सरकारच्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेंतर्गत सर्वेक्षण होणार आहे.

वडगाव मावळ (पुणे) : कोरोना रुग्ण संखेचे हॉटस्पॉट ठरलेल्या तळेगाव, वडगावसह चौदा गावांमध्ये बुधवारपासून ( ता. २३ ) सरकारच्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेंतर्गत सर्वेक्षण होणार आहे. यामध्ये २१ हजार ७२७ कुटुंबातील ९९ हजार ६६८ नागरिकांची तपासणी होणार आहे.  नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी केले आहे. 

तहसीलदार बर्गे यांनी या मोहिमेची माहिती  दिली. कोरोनाची साखळी तोडून साथ नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम सुरू केली आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव, वडगावसह चौदा गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडले आहेत. हॉटस्पॉट ठरलेल्या या गावांमध्ये बुधवार ते शनिवार या चार दिवसात सर्वेक्षण होणार आहे. बुधवारी वडगाव, कामशेत, कार्ला, वराळे व नवलाख उंब्रे, गुरुवारी तळेगाव, शुक्रवारी सोमाटणे, कडधे, कुणे नामा, कान्हे व नायगाव, शनिवारी कुसगाव बुद्रूक, इंदोरी, सुदुंबरे, टाकवे बुद्रुक व काले या गावांमध्ये सर्वेक्षण होईल. या दिवशी संबधित गावांमध्ये लॉकडाउन असेल. 

२१ हजार ७२७ कुटुंबातील ९९ हजार ६६८ नागरिकांच्या तपासणीसाठी ४६२ पथके व त्यात ९७६ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. तपासणीसाठी १६ हजार किटची व्यवस्था आहे. १४ ठिकाणी स्वॅब घेण्याची व रॅपिड अँटिजेन टेस्टची व्यवस्था आहे. घरोघरी सर्वेक्षणात लक्षणे आढळलेल्या रुग्णांची रॅपिड अँटिजेन टेस्ट व स्वॅब घेतले जातील. पॉझिटिव्ह आलेल्या मात्र, लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृहविलगीकरण केले जाईल. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर सरकारमार्फत कोविड केअर सेंटरमध्ये, मध्यम व गंभीर रुग्णांना उपचार केंद्रात पाठवले जाईल. नागरिकांनी तपासणी पथकाला सहकार्य करावे व तपासणी करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार बर्गे यांनी केले आहे.

वडगावमध्ये १३० कर्मचारी

वडगाव नगरपंचायत हद्दीत ६ हजार ५०० कुटुंबांचे सर्वेक्षण होणार आहे. त्यासाठी १३० कर्मचारी व १ हजार किटची व्यवस्था आहे. १७ प्रभागात ६८ झोन केले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: survey will be conducted in 14 villages of maval from wednesday 23 september 2020